स्वाती घोसाळकर
मुंबई : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यावरून उसळलेल्या जातीय दंगलीनंतर उद्भवलेला तणाव अजून शमलेला नाही. आता त्याचे लोण ठाण्यापर्यंत पोहचले. दंगलीला संभाजीराजे छत्रपती हेच जबाबदार असून त्यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. त्यानंतर संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज ठाण्याजवळ जितेंद्र आव्हाडांच्या कारवर हल्ला केला. आव्हाड ठाण्याकडे जात असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवत त्यांच्यावर हल्ला केलाय. सीएसटीएम कडून इस्ट्न फ्री वे वर जाताना त्यांच्या कारवर हल्ला झालाय. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ल्या केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने घेतली आहे.
महाराष्टरातील राजकारण कधी नव्हे ते हिंसक झाले असून हा दोन दिवसातील दुसरा हल्ला आहे. यापुर्वी राज ठाकरेंवर टिका केली म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी दंगल घडवली असून त्यांनी छत्रपती शिवाजी आणि शाहू महाराजांच्या विचारांशी गद्दारी केलीय अशी कडवट टिका जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. हल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी त्यांना छत्रपती संभाजी आणि राजे बोलत होतो, पण दंगल घडवून त्यंनी शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांशी प्रतारणा केलीय. त्यामुळे आता यापुढे त्यांना मी त्यांना राजे म्हणणार नाही. हल्ला करणारे तिघेच होते. माझ्याकडे चार पोलीस आणि त्यांच्याकडे चाळीस गोळ्या होत्या. मी याला हल्ला म्हणणार नाही. हे भ्याड कृत्य आहे असे आव्हाड म्हणाले.
आपले वडील खासदार झाले हा त्यांच्या मनातली राग आहे. स्वतः च्या वडिलांनी तुमचा निषेध केला आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी महाराष्ट्राची माफी मागावी त्यांच्यामुळे मशीद तोडली गेली असेही आव्हाड म्हणाले. तसेच मी मेलो तरी माफी मागणार नाही. मी वैचारिक लढाई सोडणार नाही. शिवाजी, शाहू, फुले आंबेडकर ही नाव घेऊन आम्ही जगतो आणि मरू देखील. असेही आव्हाडांनी स्पष्ट केले.