रायगड : मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील रस्त्याला एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला असल्याने त्या ठिकाणी दुर्घटना टाळण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ हा रस्ता दि ०२ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२.०० पासून ते दि ०५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजेपर्यंत आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतुदीनुसार व शासन गृह विभागाचे दि. १९ मे १९९० चे अधिसूचनेनुसार बंद करण्याचा मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे डॉ.सुहास दिवसे यांनी जारी केला आहे.*
पुणे ते माले गाव ते पुणे रायगड जिल्हा हद्द ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ एफ चे रुंदीकरणाचे कामकाज चालू असून पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील ताम्हिणी घाट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मौजे आदरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वर साखळी क्र. ६३/००० येथे दरड कोसल्यामुळे महामार्ग पूर्णतः बंद केला होता. या दुर्घटनेमुळे महामार्गाच्या कडेला महामार्गाच्या हद्दीत पिकनिक फॅमिली हॉटेलमधील एक व्यक्ती मयत व एक व्यक्ती जखमी झाला होता.दि.०१ ऑगस्ट २०२४ रोजी मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील साखळी क्र.६१/६५० ते ६१/६८० मध्ये रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला आहे. सदरचे ठिकाण हे ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात असून अतिमुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम चालू आहे व वाहतूक सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सुरु असून आता महामार्गावरील वाहतूक सदर ठिकाणी एका बाजूनेच चालू ठेवलेली आहे. तसेच पुढील काही दिवसात अतिवृष्टी झाल्यास सदर रस्ता अजून खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे. तरी शनिवार व रविवार या दिवशी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटनासाठी अनेक लोकांची गर्दी होत असून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ हा बंद करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *