ठाणे : मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारचे नेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मिश्कील टीप्पणी केली आहे. “घोडा माझा लाडका” अशी नवीन योजना आली असल्याचे डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
ब्रिटीश काळात मुंबई पोलिस दलात अश्वदल कार्यरत होते. काळानुसार हे दल बंद करण्यात आले होते. मात्र, आता हे पथक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी विनोदी शैलीत भाष्य केले आहे. “बातमी आलेय की, मुंबई पोलीस दलातील अश्वदलाची पुनर्निर्मिती करणार! पूर्वीच्या मुंबईत पोलीस घोड्यावरून गस्त घालत होते. आता ती पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्तपत्रातील बातमीतून समजले. आता भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी ‘खेचरं’ येतील. जिथे माणसांना चालायला जागा नाही; तिथे घोडे कुठे नेणार आहेत? निर्णय घेता येतो, म्हणून असा निर्णय घ्यायचा ?  ही नवीन योजना आहे, ” माझा लाडका घोडा” आणि हो, हे घोडे जेव्हा मुंबईत फिरतील; तेव्हा त्यांच्या मागे कुत्रे लागतील ते वेगळेच!!”, अशी एक्स पोस्ट डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी करून सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडविली आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *