मुंबई : मराठा मंडळ मुलुंड या आमच्या मान्यवर संस्थेतर्फे दरवर्षी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले जातात. मंडळातर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी, शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता मुलुंडमधील गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांकरीता असाच एक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आपल्या मुलुंडमध्ये मोठ्या संख्येने सहकारी गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यापैकी अनेक सोसायट्या या तीस वर्षाहून अधिक काळ जुन्या आहेत. त्यातील बऱ्याच सोसायट्या पुनर्विकासासाठी जाण्याच्या तयारीत आहेत. या सोसायट्यांतील सदस्यांना पूनर्विकास आणि पुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया आदीबाबत कायदेशीर मार्गदर्शनाची आवश्यकता भासते. पुनर्विकासाची प्रक्रिया पार पाडताना विकासकाशी होणारे वाद टाळले जाणे आणि पुनर्विकास प्रक्रिया सुलभ तसेच पारदर्शक ठेवणे फार महत्त्वाचे असते. या संदर्भात योग्य मार्गदर्शन होणे हेही तेवढेच गरजेचे असते. त्याकरीता मंडळातर्फे मुलुंडमधील गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांकरीता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सुप्रसिध्द कायदेतज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीचे तज्ज्ञ संचालक ॲड. श्रीप्रसाद परब (बी.ई.सिव्हिल, एल.एल.एम.) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान व प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होईल.
ज्येष्ठ पत्रकार आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री. कुमार कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न होणाऱ्या या कार्यशाळेच्या माध्यमातून मुलुंडमधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे सदस्य त्याचबरोबर तेथील प्रशासन व व्यवस्थापन, मॅनेजिंग कमिटीने अंमलात आणावयाचे आवश्यक नियम आदीबाबत उपयुक्त माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे आणि सोसायट्यांमध्ये समान बंधुत्वाची संकल्पना साध्य करण्यास हातभार लावणे असा मराठा मंडळाचा प्रयत्न आहे.
तरी आपल्या मुलुंडमधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन मराठा मंडळाच्या पुढाकाराने होत असलेला हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन आहे.