५१वी कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

सांगली: यजमान सांगली, पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, रायगड, कोल्हापूर, परभणी यांनी ५१व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात विजयी सलामी दिली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असो.ने युवक मराठा मंडळाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सांगलीवाडी, सांगली येथील चिंचबाग मैदानावर राज्य संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुलांच्या उद्घाटनिय सामन्यात सांगलीने ह गटात नाशिक शहराचा प्रतिकार ४८-३३ असा मोडून काढला. दोन लोण देत मध्यांतराला सांगलीने २८-१४ अशी आघाडी घेतली. नंतर मात्र नाशिककरांनी त्यांना बरोबरीची लढत दिली. सामन्यात ४ अव्वल पकड करीत चुरस कायम राखली. आदित्य येसुगडे, व्यंकटेश वडार, प्रतीक जाधव यांचा चतुरस्त्र खेळ व स्थानिक रसिकांचा मिळालेला पाठिंबा यामुळे हे शक्य झाले. स्वयम् मालोदे, रेहान शेख यांनी उत्कृष्ट खेळ केला.  पिंपरी-चिंचवडने चुरशीच्या लढतीत अहमदनगरला ३४-३१ असे रोखले. विश्रांतीला १३-१७ अशा पिछाडीवर असलेल्या पिंपरी-चिंचवडने विश्रांती नंतर जोरदार लढत देत ही किमया साधली. श्रीधर कदम, शुभम बिटके, कृष्णा चौहान पिंपरी-चिंचवड कडून तर विशाल ब्राम्हणे, वेदांत उंदरे, योगेश खराडे अहमदनगर कडून उत्कृष्ट खेळले.
पुणे ग्रामीणने क गटात लातूरला ३१-१७ असे नमविले. प्रणव बांगर, साहिल माने, देव शिर्के यांच्या दर्जेदार खेळाने पुणेकरांनी हा विजय साकारला. अजिंक्य काळे, तुषार माने लातूर कडून बरे खेळले. नंदुरबारने ड गटात पहिल्या डावातील १७-१९ अशा पिछाडीवरून नांदेडला ४१-३१ असे रोखले. पृथ्वीराज गलांडे-पाटील, असीम शेख, अतुल राठोड यांच्या चढाई पकडीच्या खेळाला याचे श्रेय जाते. आर्यन धावले, ऋषिकेश घागरे यांचा अनुभव थोडा कमी पडला. रायगडने फ गटात बीड वर ४६-३२ अशी मात केली. दोन्ही डावात एक-एक लोण देत आघाडी आपल्याकडेच कशी राहील याची दक्षता घेतली. राज मोरे, नीरज मिसाळ यांच्या अष्टपैलू खेळाला या विजयाचे श्रेय जाते. बीडच्या शुभम गर्जे, रोहित राठोड, कृष्णा उबाळे यांनी चांगली लढत दिली.  पिंपरी-चिंचवड ने ब गटात सातारा संघाला ६६-१८ असे लोळवित बाद फेरीतील आपला प्रवेश निश्र्चित केला. झंझावाती सुरुवात करीत ४ लोण देत ४८-११ अशी मोठी आघाडी घेत सातारची हवा काढून घेतली. श्रीधर कदम, कृष्णा चौहान यांच्या भन्नाट खेळाला याचे श्रेय जाते.
अहमदनगरने ब गटात औरंगाबादला ४३-१७ असे नमवित पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. युवराज गवारे, विशाल ब्राम्हणी यांच्या चढाई पकडीच्या खेळाने हा विजय साकारला. पुणे ग्रामीणने क गटात अर्जुन धडास, साहिल माने यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर जळगांव संघाचा ५९-२१ असा पराभव केला. जळगांवचा धीरज चौधरी चमकला. ठाणे शहरने नंदुरबार वर ३८-२२ असा विजय मिळविला. मध्यांतरापर्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात १४-१३ अशी ठाण्याकडे आघाडी होती. आफताब मंसुरी, सोहम जाधव यांच्या दुसऱ्या डावातील झंझावाती खेळाने ठाण्याने सामना एकतर्फी केला. नंदुरबारचा असीम शेख बरा खेळला. मुंबई उपनगर पश्र्चिमने अ गटात मुंबई शहर पश्र्चिमचा ५२-४६ असा पराभव केला. या दुसऱ्या पराभवाने मुंबई शहरचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ओम् कुदळे, अभिषेक यादव, प्रशांत पवार यांच्या चतुरस्त्र खेळाने उपनगरचा हा विजय साकारला. रोहन तिवारी, अनिकेत पिंपरे शहर कडून बरे खेळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *