अथर्व सोनीला विजेतेपद

ठाणे : आपल्यापेक्षा सरस गुणांकन असलेल्या वरिष्ठ बुद्धिबळपटूंना मागे टाकत १५ वर्षीय अथर्व सोनीने रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आयोजित २५ व्या रोचेस खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. स्पर्धेत अव्वल स्थान पटकावताना अथर्वने सात फेऱ्यांमध्ये साडे सहा गुणांची कमाई करत पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस आपल्या खिशात टाकले. अनिरुद्ध पोतवाड आणि ऋषी कदम अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले.
सहाव्या फेरीअखेर विजेतेपदासाठी चुरस निर्माण झाली होती. साडे पाच गुण असलेल्या अथर्वने सातव्या फेरीत फिडे मास्टर  अनिरुद्ध पोतवाडला मात देत विजयासह आपले वर्चस्व राखले. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी चौघांमध्ये चढाओढ होती. सहा गुणांसह बरोबरीत असलेल्या अनिरुद्ध आणि ऋषीने  जास्त गुणाकणांची नोंद करत इतरांना मागे टाकले. वडील सत्यभान सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व वयाच्या सहाव्या वर्षांपासून बुद्धिबळाचे धडे गिरवत आहे. अथर्व बदलापूर येथील एअरसन इंग्लिश स्कुलमध्ये नवव्या इयत्तेत शिकत आहे. स्पर्धेत दीडशेहून अधिक बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. त्यात ७७ आंतरराष्ट्रीय गुणांकन असलेल्या बुद्धीबळपटूंचा समावेश होता.
स्पर्धेतील इतर निकाल : ८ वर्षे वयोगट मुले : शिवांश करीआ, निवेश पांचाळ, सात्विक प्रधान. मुली : मिराई सरदाना, डेलिया खैरनार, मनवा पारकर.
११ वर्षे वयोगट मुले : आराध्य पार्टे, नीद्वयुष आनंद, आर्यन पांडे. मुली : मेहूली मुखर्जी, त्रिशा पांचाळ आराध्या धेंडे.
१५ वर्षे वयोगट : सोनी अथर्व, विवान सरदाना, हिंदोळ घोष. मुली : गिरिशा पै, जीअना धरमसी, महती रामकुमार.
सर्वोत्तम वयस्कर बुद्धिबळपटू : अनिल सनदांशी. सर्वोत्तम महिला खेळाडू : वनश्री कुन्नेकर. बिगर गुणांकित : ऋषी मोटवानी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *