ठाणे : ठाण्यासारख्या मोठ्या शहरातील वस्ती मध्ये विचारांना चालना देणारा वंचितांचा रंगमंच उपक्रम ११ वर्ष सातत्याने चालू राहणे हे त्या समाजातील मुलांच्या वैचारिक प्रगतीसाठी अतिशय महत्वाचे आहे. छोटी शहरे आणि गावांतूनही असे उपक्रम झाले पाहिजेत; तिथेही मुलांमध्ये अभिव्यक्तीची प्रेरणा वाढवली पाहिजे, असे विचार मुरबाड येथे आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी अनेक वर्ष कार्य करणाऱ्या श्रमिक मुक्ति संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्या ॲड. इंदवी तुळपुळे यांनी नाट्यजल्लोष कार्यक्रम बघून व्यक्त केले.
सुप्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका सुप्रिया मतकरी विनोद म्हणाल्या, वंचित समाजातील मुलामुलींच्या अभिव्यक्तीला मुक्त वाव देणारा वंचितांचा रंगमंच हा माझ्या बाबांनी म्हणजेच श्रेष्ठ साहित्यिक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून उभा राहिला पण त्याला पुढे ११ वर्ष, मतकरी सरांच्या मागे सुद्धा, सतत साकारण्याचे काम समता विचार प्रसारक संस्थेने नेटाने केलं, हे खरंच कौतुकास्पद आहे.
या वेळी ‘बालरंग’ या संस्थेचे संस्थापक सुप्रसिद्ध नाट्यकर्मी श्रीनिवास नार्वेकर उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून म्हटले की वंचित समाजातूनच आतापर्यंत श्रेष्ठ कलाकार रंगमंचाला प्राप्त झाले आहेत; अशा उपक्रमामधून अनेकांना संधी उपलब्ध होईल. सुप्रसिद्ध अभिनेते दीपक कदम या वेळेस मुलांचे कौतुक करण्यास आवर्जून हजर होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नाट्यजल्लोषच्या संयोजिका हर्षदा बोरकर यांनी केले.नाटिका, नृत्य, कथाकथन, मुशायरा अशा रंगारंग कार्यक्रमांच्या सादरीकरणाने वंचितांच्या रंगमंचावर नाट्यजल्लोषचे ११ वे पर्व काल संपन्न झाले. दर वर्षी प्रमाणे ठाण्यातील अनेक वस्तीतील मुलांनी विविध कलाविष्कारा द्वारे वेगवेगळ्या विषयांबाबत आपले विचार व्यक्त केले. रमाबाई आंबेडकर गटाने ‘मुलगी शिकलीच पाहिजे’ या विषयावर नाटिका सादर केली. धर्मवीर नगर गटाने ‘संघर्ष स्त्रियांचा’ हा विषय अतिशय सुविहित नाटिकेद्वारे सादर केला. मनोरमा नगर विभागाने ‘समता’ हा विषय पथनाट्यातून सादर केला. किसन नगर  गटाने चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनकार्यावर नाटिका सादर केली. दिशा अहिरे हिने मी सावित्रीबाई बोलते हा एकपात्री प्रयोग सादर केला. राबोडी येथील मुलींनी त्यांच्या शिक्षिका रेहान चिपळूणकर यांच्या साथीने मुशायरा पेश केला. घणसोली येथील वी नीड यू सोसायटी च्या मुलींनी खेळ मांडला.. या गाण्यावर नृत्य सादर केले. मनोरमा नगर येथील मुलींनी लाठी – काठी आणि तलवार बाजीची प्रात्यक्षिके सादर केली. कळवा विभागातील मुलींनी नृत्य सादर केली. ज्ञानसाधना महाविद्यालयातील NSS गटाने HIV विषयी जागृतता निर्माण करणारे पथनाट्य सादर केले. संस्थेचे संस्थापक संजय मंगला गोपाळ, जगदीश खैरालिया, लतिका सु. मो. यांच्या पुढाकाराने ‘प्रेममय साने गुरुजी’ या कार्यक्रमात नीलिमा सबनीस, मोनाली, पल्लवी, सृष्टी दळवीआणि श्रद्धा गायकवाड यांनी साने गुरुजींच्या कथा कथन केल्या. त्यावेळी राबोडी फ्रेंड सर्कल या शाळेतील मुला मुलींनी साने गुरुजींची खरा तो एकची धर्म … ही प्रार्थना ‘ धर्म तो एकही सच्चा, जगत को प्यार देव वो…’ हिंदीतून सादर केली. संस्थेच्या हितचिंतक सीमा साळुंखे यांनी मुलांबरोबर श्यामची आई हा चित्रपट बघतानाचा अनुभव सांगितला.या कार्यक्रमात ज्या मुलामुलींनी चांगला अभिनय वा लेखन केले त्यांना सुप्रिया मतकरी विनोद यांच्या कडून विशेष बक्षिसे देण्यात आली. त्यात, सम्यक साळवे, तेजस्वी जाधव, ईशा शेलार, अथर्व कदम, दीक्षा अहिरे, गुडिया बिंद, शेख झोया आरिफ, अरिंजय येरवदे, पल्लवी लंके, करण औताडे यांचा समावेश आहे. कार्यक्रमास जयंत कुलकर्णी, भारती पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम, उपाध्यक्ष सुनील दिवेकर, कार्यकारी सचिव अजय भोसले यांनी विशेष मेहनत घेतली.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *