स्वाती घोसाळकर
वाढीव दराने काढले होते टेंडर० दोन हजार कोटींचा बसणार होता फटका० भरत गोगावलेंनी आचारसंहीतेपुर्वी घेतला होता घाईघाईत निर्णय
मुंबई : ना खाऊंगा ना खाणे दुंगा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ध्येयानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेचे विद्यमान मंत्री आणि मावळत्या सरकारमधिल एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंना दणका दिलाय. भरत गोगावलेंनी विधानसभेच्या निवडणूकची आचारसंहीता लागण्यापुर्वी घाईघाईत काढलेल्या एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या टेंडरला आज स्थगिती दिलीय. भरत गोगावलेंना हा मोठा धक्का मानला जातोय.
या निर्णयानुसार वाढीव दराने बसेस भाडेतत्वार घेतल्याने एसटी महामंडळाला सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा फटका बसणार होता. मुख्यमंत्री फडणवीसांच्या ही बाब लक्षात आणून देताच त्यांनी तात्काळ या निर्णयाला स्थगिती दिली.
विधानसभा निवडणूक जाहिर होण्यापुर्वी काही काळ आधी भरत गोगावलेंना एसटी महामंडळाचे अध्यक्ष बनविण्यात आले होते. गेल्या सरकारमध्ये मंत्रीपद हुकल्यामुळे त्यांची महामंडळावर वर्णी लावण्यात आली होती. त्या थोड्या अवधीत गोगावलेंनी हा प्रताप केल्याचे उघडकीस आले आहे. १३१० बसेस भाडेतत्ववावर घेतल्या जाणार होत्या, यासाठी डिझेल खर्च वगळून प्रतिकिमी ३४.३० रूपये व ३५.४० रूपये दराने कंपन्यांना इरादापत्र दिले गेले होते. परंतु डिझेल खर्च प्रतिकिमी २० ते २२ रूपयांचा भार एसटी महामंडळावर पडणार होता. त्यामुळं जुन्या निविदेच्या तुलनेत प्रतिकिमी 12 रूपये अधिक खर्च महामंडळाचा होणार होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विभागाची आढावा बैठक घेताना निर्णयाला स्थगिती दिली आहे. या पूर्ण प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.
महायुतीचे नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व विभागांचा कार्यभार होता. याच काळात संबंधित कंपन्यांना इरादा पत्र देण्यात आल्याचे उघडकीस आले. मुख्यमंत्र्यांनी महामंडळाच्या कारभारावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे याबाबत नाराजीही व्यक्त केल्याचेही सांगण्यात येतंय.