पुणे ग्रामीण, रायगड, ठाणे शहर उपांत्य फेरीत
सांगली:- पुणे ग्रामीण, रायगड, ठाणे शहर यांनी ५१व्या कुमार/ कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमार गटात उपांत्य फेरी गाठली. यजमान सांगलीला मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी “सुवर्ण चढाई” पर्यंत झुंजावे लागले. सांगली विरुध्द पुणे ग्रामीण आणि ठाणे शहर विरुध्द रायगड अशा उपांत्य लढती होतील. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असो.ने युवक मराठा मंडळाच्या सहकार्याने राज्य संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सांगली,सांगलीवाडी येथील चिंचबाग मैदानावर सुरू असलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सांगलीने सुवर्ण चढाईच्या डावात नंदुरबारचा ३०-२९ असे चकवित उपांत्य फेरी गाठली. सुरवातीपासून अतितटीने खेळला गेलेल्या या सामन्यात पूर्वार्धात १३-१२ अशी आघाडी सांगलीकडे होती. पण नंदुरबारने पूर्ण डावात त्यांना २३-२३असे बरोबरीत रोखले. ही कोंडी सोडविण्याकरीता ५-५ चढायांचा जादा डाव खेळविण्यात आला. त्यानंतर ही २९-२९ अशा बरोबरीत हा डाव संपला. शेवटी सामन्याच्या नियमानुसार सुवर्ण चढाई देण्यात आली. त्याकरिता पुन्हा नाणेफेक करण्यात आली. नंदुरबारच्या बाजूने नाफेकीचा कौल लागला. पण नंदुरबारचा खेळाडू चढाईत गुण घेऊ न शकल्याने पंचाने त्याला बाद दिले. आणि सांगलीने एकच जल्लोष केला. आदित्य येसगुडे, व्यंकटेश वडार यांच्या झंझावाती चढाया त्यांना ओम् शिंदे, प्रतीक जाधव यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे सांगलीला हा विजय मिळविता आला. प्रणव मराठे, आलम मंसुर, पृथ्वीराज गलांडे पाटील, अतुल रोठोड यांचा खेळ नंदुरबारच्या विजया करीता थोडासा कमी पडला.
पुणे ग्रामीणने ५-५ चढाईत कोल्हापूरचे आव्हान ३१-३० असे संपविले. पहिल्या डावात १३-१० अशी आघाडी घेणाऱ्या पुणे ग्रामीणला कोल्हापूरने पूर्ण डावात २५-२५ असे बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे दोन्ही संघाना ५-५ चढाया देण्यात आल्या. त्यात एका गुणांनी पुणेकरांनी बाजी मारली. प्रणव भांगर, साहिल माने यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. कोल्हापूरच्या समर्थ देशमुख, शुभम रेपे यांनी शेवटच्या १० मिनिटात भन्नाट खेळ करीत. सामन्यात बरोबरी साधली. पण विजय मात्र त्यांच्या पासून दूरच राहिला. रायगडने परभणीवर ३८-३३ अशी मात केली. विश्रांतीला १९-१२ अशी आघाडी घेणाऱ्या रायगडला परभणीने नंतर कडवी लढत दिली. राज मोरे, नीरज मिसाळ यांच्या दमदार चढाया त्यांना समीर हिरवे, हर्ष सुकर यांची मिळालेली भक्कम बचावाची साथ यामुळेच रायगडने हे साध्य केले. परभणीच्या रमेश गायकवाड, बाबुराव जाधव, विजय तारे यांनी विश्रांतीनंतर आपला खेळ उंचावत कडवी लढत दिली. शेवटच्या सामन्यात ठाणे शहरने मुंबई उपनगर पश्र्चिमचा ३७-३३असा पाडाव केला. आक्रमक सुरुवात करीत ठाण्याने पहिल्या डावात २१-१२ अशी मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात उपनगरने आपला खेळ गतिमान करीत ही आघाडी कमी करीत आणली. पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले. आफताब मंसूरी, आदित्य पिनाने, सोहम जाधव यांच्या सर्वांगसुंदर खेळाने ठाण्याने हा विजय साकारला. उपनगरच्या ओम् कुदळे यांनी आक्रमक चढाया करीत ही आघाडी कमी केली. पण पायाला असलेल्या दुखापतीमुळे तो आपल्या संघाला पूर्ण न्याय देऊ शकला नाही. त्याला अर्शद चौधरी, अश्विन देसाई यांची मोलाची साथ लाभली. विजयापासून मात्र उपनगर दूरच राहिले.