अनिल ठाणेकर
ठाणे : वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या ठाणे शहरातील घोडबंदर महामार्गाच्या गायमुख परिसरासह इतर ठिकाणी असलेले आरएमसी प्लांट त्वरित बंद करण्यात यावेत, अशी मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली आहे.
गेल्या काही कालावधीपासून ठाणे शहरातील वातावरण प्रदूषित झालेले असून, शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मेट्रो प्रकल्प आणि ठिकठिकाणी सुरु असलेली निवासी प्रकल्पांची बांधकामे, यामुळे ठाण्याची हवा दुषित होऊन, हवेचा स्तर पूर्णपणे घसरलेला दिसून येत आहे. परिणामी, खोकला आणि दम्याच्या आजारात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे आढळून येत आहे. मुंबईचे धाकटे भावंडं, अशी ठाणे शहराची ओळख गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली असतानाच, ठाण्याचे नागरीकीकरणही तेवढ्याच प्रचंड प्रमाणात झालेले आहे. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या ही, वाढत्या वाहतूक कोंडीलादेखील कारणीभूत ठरत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे, आधीच वायुप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषणामुळे ठाणेकर नागरिक त्रासलेले असतानाच, सध्या ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे, एकेकाळी “तलावांचे शहर” अशी ओळख असणाऱ्या ठाण्याची ओळख आता, ‘प्रदूषित शहर’ अशी निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत ठाणे शहरातील हवेचा दर्जा पूर्णपणे घसरलेला असल्याचे, प्रसिद्धीमाध्यमांतील बातम्यांच्या माध्यमातून स्पष्ट झालेले आहे. गेल्या काही वर्षांत, घोडबंदर महामार्गालगत अनेक निवासी संकुले उभी राहिली आहेत आणि आजही मोठमोठ्या निवासी संकुलांची/प्रकल्पांची बांधकामे सुरु आहेत. वाघबीळ परिसरातील हिरानंदानी-मेडोज याठिकाणी, गेल्या काही दिवसांपासून एका मोठ्या प्रकल्पाचे खोदकाम सुरु असून, अनेक जेसीबी मशिन्सच्या माध्यमातून हे काम दिवस-रात्र सुरु असते. या खोदकामामुळे मोठ्याप्रमाणात धुरळा उडून, परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. असे असतानाही, ठाणे शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, महापालिका प्रशासनाकडून याबाबत कोणतीही दाखल घेतली जात नाही. याच अनुषंगाने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव-सदस्य अविनाश ढाकणे आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पत्र पाठविण्यात आले असून, वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या ठाणे शहरातील बांधकाम प्रकल्पांवर बंदी आणण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबईच्या हवेचा स्तर वाईट झालेला असल्याकारणाने, तसेच बोरीवली पूर्व आणि भायखळा या परिसरांतील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत गेल्याने, तेथील सर्व बांधकामे बंद करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे. ज्या विभागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक २००च्या वर जाईल, त्या विभागातील सर्वच बांधकामे बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांद्वारे स्पष्ट झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर, ठाणे शहरातील वायुप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या किंवा ठरु पाहणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कठोर निर्बंध लादण्यात यावेत. बांधकामांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी, सविस्तर मार्गदर्शक सुचना तयार करण्यात याव्यात, त्याचप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी नियमावलीचे योग्य पालन न झाल्यास, सरसकट सर्वच बांधकामे बंद करण्याचा कठोर निर्णय घेण्यात यावा. तसेच, ठाणे शहरातील घोडबंदर महामार्गाच्या गायमुख परिसरासह, इतर ठिकाणी असलेले आरएमसी प्लांट त्वरित बंद करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी महेशसिंग ठाकूर यांनी अविनाश ढाकणे आणि सौरव राव यांच्याकडे केली आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *