ठाणे : येथील वागळे इस्टेट भागातील सावरकरनगर परिसर येथून ठाणे स्थानक परिसरात रिक्षेतून येत असताना, एक प्रवाशी सोन्याची ऐवज आणि रोख रक्कम असा दीड लाखांचा ऐवज असलेली पिशवी ठाणे स्थानकात उतरल्यावर रिक्षेत विसरले. ठाणे वाहतूक विभागाने अवघ्या तीन तासात संबंधित रिक्षेचा शोध घेऊन प्रवाशांना ऐवजासह पिशवी परत केली.
वागळे इस्टेट भागातील सावरकर नगर परिसरात राहणारे संगीता भालेराव आणि किशोर साळवे कामानिमित्त रविवारी सावरकरनगर भागातून रिक्षाने ठाणे स्थानककडे प्रवास करत होते. ठाणे स्थानक परिसरात रिक्षेतून उतरताना घाईगडबडीत त्यांच्याजवळील दोन तोळे सोन्यांचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पिशवी रिक्षात राहिली. इगतपुरीला पोहोचल्यावर पिशवी रिक्षात विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ ठाण्यात येऊन नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव आणि स्वप्नील पाटील यांनी तपासाला गती दिली. त्यांनी स्थानक परिसरासह इतर आजूबाजूच्या परिसराचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. दोन ते तीन तास पाहणी सुरु होती. या सीसीटीव्ही चित्रणात पोलिसांना संबंधित रिक्षाचालक दिसून आला. त्यावेळी त्याच्या वाहन क्रमांकाच्या आधारे त्या रिक्षाचालकाचा शोध घेतला. या रिक्षाचालकाला संपर्क करुन ऐवजाबाबत विचारलेल असता, तो समोरुन खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तेव्हा पोलिसांनी त्यांच्या भाषेत खडसावल्यानंतर रिक्षाचालक ऐवज परत देण्यास तयार झाला. पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या तीन तासांत हरवलेली पिशवी शोधून कुटुंबाला परत करण्यात आली.
00000
