मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून केलं अनोखे आंदोलन

ठाणे –  ठाणे शहरातील मैदानावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मनसेच्या कार्यकर्यांनी आज अनोखे आंदोलन केले. त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या इमारतीतील नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून मैदान अतिक्रमणमुक्त आंदोलन केले.

घोडबंदर परिसरात बोरिवडे मैदान ठेकेदाराने गिळंकृत केल्याचा आरोप स्थानिक नागरिक व मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार या भूखंडाला मैदानाचे आरक्षण असून देखील, महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे मैदान डंपिंग ग्राउंड बनले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. दरम्यान पालिकेने हे अतिक्रमण त्वरीत हटवावे यासाठी मनसेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाला पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात विविध जागांच्या आरक्षणाचा उल्लेख असून, काही ठिकाणी विकासकांकडून टीडीआरमार्फत विकास कामे केली जातात. घोडबंदर क्षेत्र हे जलद गतीने विकसित होत असून, येथे हावरे, रौनक, भूमी सारखे मोठे विकासक काम करत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्याने ठाणे महानगरपालिकेने बोरिवडे येथे एक खेळाचे मैदान आरक्षित ठेवले आहे. पण या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान उपलब्ध नाही. ठेकेदाराने मैदानाच्या बहुतेक जागांवर कब्जा केले असून, तिथे आर एम सी प्लांट तसेच शेड उभारली आहे आणि पाईपची साठवणूक केली आहे. या अतिक्रमणाचा त्रास स्थानिक नागरिकांना  नाहक सहन करावा लागत आहे.

बोरीवडे मैदान येथे अतिक्रमण झाल्याचे मनसेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला पत्रव्यवहार केल्यानंतर क्रीडा विभाग खडबडून जागे झाले व त्यांनी त्वरित महानगरपालिकेच्या नगर अभियंता ,उपनगर अभियंता तसेच माजीवाडा मानपाडा येथील सहाय्यक आयुक्त यांना पत्र करून सदर मैदान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले पण सदर आदेशाचे पालन महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर अभियंता करत नसल्याकारणाने मनसेच्या वतीने आज महानगरपालिकेच्या आवारात नगर अभियंतांच्या दालना बाहेर फुटबॉल खेळून निषेध नोंदवण्यात आला तसेच सदर फुटबॉल वर निषेदाचे तसेच अतिक्रमणाचे छायाचित्र लावून सदर फुटबॉल नगर अभियंता यांना भेट देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *