मोबाईलचा स्क्रीन बोटांनी वर खाली हलवत असताना स्क्रीनवर मेसेज येतो, की तुमचे क्लाउड स्टोरेज जवळपास भरले आहे. त्यानंतर, डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही स्टोरेज खरेदी करता; पण हा सर्व ‘क्लाउड डेटा’ नेमका कुठे राहतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तो आकाशात तरंगत नाही. तो डेटा केंद्रांमध्ये साठवला जातो. ही केंद्रे भरपूर वीज वापरतात. त्यामुळे ‘डिजिटल प्रदूषण’ वाढते. त्या हा मागोवा.
आज माहिती क्रांती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. आपण डिजिटल युगात जगत आहोत. हे जग संप्रेषण आणि मनोरंजन, ऑनलाइन खरेदी, ऑनलाइन क्रियाकलाप, आरोग्यसेवा आणि वाहतूक या सर्व गोष्टींसाठी तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबून आहे. डिजिटल क्रांतीने मानवाला अनेक अतुलनीय सुविधा आणि प्रगती प्रदान केली असली, तरी अनेक पर्यावरणीय आव्हानेही समोर उभी केली आहेत. त्यात डिजिटल प्रदूषण हे प्रमुख आव्हान आहे. माहिती क्रांती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात डिजिटल प्रदूषण ही एक नवी संकल्पना आहे, जी तंत्रज्ञानामुळे आपल्या पर्यावरणावर आणि परिसंस्थेवर होणारे नकारात्मक परिणाम स्पष्ट करते. आज जगभरात इंटरनेट क्रांतीच्या काळात लॅपटॉप, कॉम्प्युटर, सोशल नेटवर्किंग साइट्स, व्हॉट्स ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. दररोज करोडो ई-मेल पाठवले जातात. प्रचंड डेटा (फोटो, व्हिडीओ, दस्तऐवज, ई-मेल इ.) क्लाउड डेटा केंद्रांमध्ये संग्रहित केला जातो. डेटा स्टोरेजमध्ये भरपूर वीज लागते. यामुळे डिजिटल प्रदूषणाला चालना मिळते. किंबहुना, डिजिटल प्रदूषण इलेक्ट्रॉनिक कचरा, अतिरिक्त डेटा स्टोरेज, डिजिटल प्लॅटफॉर्मचा ऊर्जा वापर आणि संपूर्ण डिजिटल उद्योगाचा कार्बन फूटप्रिंट अशा अनेक मार्गांनी स्वतःला प्रकट करते. दुसऱ्या शब्दात, ई-कचऱ्यापासून कार्बन उत्सर्जनापर्यंत डिजिटल प्रदूषण होते, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आज जगभर अँड्रॉईड मोबाईल, स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापर होत आहे. अप्रचलित गॅझेट्स आणि हार्डवेअर घटक मोठा कचरा उत्पन्न करतात. त्यामुळे विषारी इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण होतो.
सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म ऊर्जा वापरतात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. जेव्हा जेव्हा आपण गॅझेट्सद्वारे व्हिडीओ प्रवाहित करतो किंवा विविध ऑनलाइन क्रियाकलापांमध्ये गुंततो, तेव्हा सर्व्हर ती सेवा चालू ठेवण्यासाठी वीज वापरतो. डिजिटल प्रदूषणाचे काही अत्यंत धक्कादायक परिणाम आहेत. उदाहरणार्थ, डेटा सेंटर प्रति चौरस मीटर सुमारे एक हजार किलोवॉट वीज वापरते. ती एका सामान्य अमेरिकन घराच्या विजेच्या वापराच्या सुमारे दहापट जास्त आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या निर्मितीमध्ये अनेकदा दुर्मिळ धातूंच्या खाणकामाचा समावेश होतो. त्यामुळे पृथ्वीवरील मर्यादित संसाधने नष्ट होतात. त्याचा आपल्या पर्यावरणावर नकारात्मक प्रभाव पडतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ई-कचरा सर्वच राष्ट्रांवर आर्थिक भार वाढवतो आणि त्याच्या संपर्कात आल्याने मानव आणि प्राण्यांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. विशेषत: विकसनशील देशांमध्ये अनेकदा ई-कचरा टाकला जातो. तेथे मानवी आरोग्य जास्त प्रमाणात धोक्यात येते. या पार्श्वभूमीवर काही पद्धतींचा अवलंब करून डिजिटल प्रदूषण कमी करता येईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उदाहरणार्थ, सर्वात तात्काळ मार्गांपैकी एक म्हणजे ग्रीन आयटी मानके/प्रमाणपत्रे स्वीकारणे आणि त्यांचे पालन करणे. यामध्ये ऊर्जा कार्यक्षमतेसाठी संगणक प्रणाली सज्ज करणे, कमी ऊर्जेची आवश्यकता असलेले सॉफ्टवेअर वापरणे, ऊर्जावापर बुद्धिमानपणे व्यवस्थापित करू शकणारे ‘एआय अल्गोरिदम’ समाविष्ट करणे आदी.
या व्यतिरिक्त, जुन्या आणि अप्रचलित इलेक्ट्रॉनिक उपकरणांची योग्य विल्हेवाट लावणे हे केवळ धोकादायक कचरा लँडफिलमध्ये जाण्यापासून (जमिनीवर पडून राहण्यापासून) रोखत नाही, तर पुन्हा वापरता येणारी मौल्यवान सामग्री पुनर्प्राप्त करण्यात मदत करते. शिवाय शाश्वत सर्व्हर व्यवस्थापन समाधानांमध्ये नूतनीकरणक्षम उर्जेद्वारे समर्थित क्लाउड सेवांवर स्थलांतर करणे किंवा कार्बन न्यूट्रल होस्टिंग सेवा वापरणे याचा समावेश केला जाऊ शकतो. ‘व्हर्च्युअलायझेशन’सारख्या पद्धती कंपन्यांना विद्यमान हार्डवेअर अधिक कार्यक्षमतेने वापरण्याची परवानगी देतात. नवीन उपकरणांची आवश्यकता कमी करतात आणि अशा प्रकारे ई-कचरा आणि ऊर्जा वापर दोन्ही कमी करतात. इतकेच नाही, तर कर्मचाऱ्यांना डिजिटल टिकावू संस्कृती आणि त्याचे महत्त्व याविषयी शिक्षित करण्यासाठी अंतर्गत जागरूकता मोहिमा, कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, डिफॉल्टनुसार प्रिंटर दुहेरी बाजूंच्या मुद्रणासाठी सेट करणे किंवा वापरात नसताना कर्मचाऱ्यांना संगणक बंद करण्यास प्रोत्साहित करणे यासारख्या सोप्या कृतीमुळे ऊर्जाबचत होऊ शकते. याव्यतिरिक्त, संस्थांनी डिजिटल साफसफाईसाठी नियमित प्रोटोकॉलदेखील स्थापित केला पाहिजे. उदाहरणार्थ, न वापरलेल्या फाईल्स, अनावश्यक ई-मेल्स आणि जुने डेटाबेस यांच्याऐवजी फक्त अत्यंत आवश्यक डेटा संग्रहित केला पाहिजे आणि अनावश्यक डेटा काढून टाकला पाहिजे. कारण तो अनावश्यकपणे ऊर्जा खर्च करतो.
शाश्वत तांत्रिक उपायांमध्ये गुंतवणूक करणेदेखील महत्त्वाचे आहे. याशिवाय टिकाऊ, अपग्रेड करण्यायोग्य आणि पर्यावरणास अनुकूल इलेक्ट्रॉनिक उत्पादने निवडण्याची आवश्यकता आहे. क्लाउड स्टोरेजमधील अनावश्यक फाइल्स साफ करुन समाजाला डिजिटल प्रदूषणाबद्दल जागरूक करणे महत्वाचे आहे. कारण सामायिक केलेले प्रत्येक ज्ञान अधिक टिकाऊ भविष्यास मदत करते. झाडे लावून आपण कार्बन फूटप्रिंटही कमी करू शकतो. झाडे हे निसर्गाचे सर्वोत्तम कार्बन सिंक आहेत, जे कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. झाडे लावणे हा डिजिटल उपक्रमांमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा थेट मार्ग आहे. डिजिटल प्रदूषण ही आजच्या जगात एक अतिशय गंभीर आणि संवेदनशील समस्या आहे. डिजिटल प्रदूषणाचा सामना करणे ही कोणत्याही विशिष्ट व्यक्तीची, विशिष्ट समाजाची किंवा सरकारची जबाबदारी नाही, तर ती सर्वांची आहे. ही एक सामूहिक समस्या आहे. जागरूकतेने, सजगतेने आपण डिजिटल प्रदूषणाचे पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. आज आपण घरी बसून आपल्या मोबाईलवर फक्त एका क्लिकवर हवी असलेली कोणतीही वस्तू ऑर्डर करू शकतो. डिजिटल क्रांतीने अभूतपूर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत; पण त्यामुळे डिजिटल प्रदूषणाचाही धोका निर्माण झाला आहे.
लॅपटॉप बनवण्यासाठी जगभरातील देशांमधून डझनभर धातू लागतात. त्यांच्या उत्खननासाठी भरपूर (जीवाश्म) ऊर्जा, पाणी आणि संसाधने लागतात. ई-मेल पाठवण्यासाठी, ऑनलाइन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी, डिव्हाइस जगभरातील सर्व्हरशी कनेक्ट होते. ते ऑपरेट करण्यासाठी आणि थंड होण्यासाठी प्रचंड ऊर्जा खर्च करतात. एक ई-मेल चार ग्रॅम कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करतो. ई-मेलमध्ये ॲटॅचमेंट जोडल्यास हे उत्सर्जन 50 ग्रॅम कार्बन डायऑक्साइडपर्यंत पोहोचू शकते. त्याचप्रमाणे एका गूगल शोधाचा ऊर्जा वापर 60 वॅटचा बल्ब 17 सेकंदांसाठी प्रज्वलित ठेवण्याइतका आहे. ‘फायनल स्ट्रॉ फाउंडेशन’च्या अहवालानुसार, जगभरात 60 सेकंदात 190 दशलक्ष ई-मेल पाठवले जातात. व्हॉट्स ॲपवर रोज सुमारे सहा कोटी संदेश पाठवले जातात. गुगलवर 41 लाख लोक सर्च करतात. यूट्यूबवर 60 सेकंदात 43 लाख व्हिडीओ पाहिले जातात. कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की 2030 पर्यंत अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ते(एआय) मुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे दर वर्षी 1,300 लोक अकाली मृत्यूचे बळी ठरतील. भारतात स्मार्टफोन, कॉम्प्युटर, टेलिव्हिजन संच आणि रेफ्रिजरेटर यासारख्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून निर्माण होणारा ई कचरा गेल्या पाच वर्षांमध्ये 72 टक्क्यांनी वाढल्याचे सरकारने संसदेच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. अशा परिस्थितीत मूकपणे पसरणारे डिजिटल प्रदूषण हे आपल्यासमोर एक नवे आव्हान बनले आहे. या नव्या प्रदूषणाला तोंड देण्यासाठी आपली काय तयारी असावी, याचा विचार प्रत्येक डिजिटल नागरिकाने करण्याची गरज आहे.
(अद्वैत फीचर्स)