अनिल ठाणेकर

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळल्यामुळे विकासकांना काम थांबवण्याचे आदेश देण्यास शहर विकास विभागाने सुरूवात केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार, महापालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण ३१७ बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यापैकी १८२ ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून नियमांच्या पूर्ततेसोबतच ०९ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या १२० बांधकाम व्यावसायिकांना काम का थांबवू नये यासाठी कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांच्यापैकी ज्यांनी नियमांची पूर्तता केल्याचा अहवाल दिला आहे त्याची पडताळणी केली जात आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या सात विकासकांनी नियमांची पूर्तता न केल्याने त्यांना काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे यांनी दिली आहे. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे तसेच त्यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्याची सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. त्यासंदर्भात, सर्व बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी, असेही स्पष्ट करण्यात आले होते. या पाहणीत ज्यांनी नियमावलीचे पालन केलेले नाही अशा बांधकाम स्थळांचा अहवाल प्राप्त झाल्यावर १४ ते १६ जानेवारी या काळात विकासकांना बांधकाम थांबविण्याच्या नोटीसा शहर विकास विभागाने बजावल्या. मौजै नौपाडा येथील मे. स्कायलाईन इन्फ्रा, मौजै ठाणे येथील सुयश पाटणकर, मौजे माजिवडे येथील मे. अष्टविनायक एंटरप्रायझेस, सेवा रस्ता येथील मे. पद्मनाभ डेव्हल्पर्स, मौजै पारसिक येथील मे. सरस्वती एंटरप्रायझेस, मौजै पारसिक येथील मे. जय प्रॉपर्टीज, मौजे कळवा येथील मे. सिद्धीविनायक डेव्हल्पर्स यांना बांधकाम थांबवण्याची नोटीस देण्यात आली आहे. काही विकासकांकडून नियमावलीची पूर्तता केल्याचे निवेदन शहर विकास विभागास प्राप्त झाले आहे. त्याची पडताळणी केल्यावरच बांधकाम पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच, यापुढेही कोणाकडून नियमावलीचे पालन न झाल्यास अशाप्रकारे कारवाई करण्यात येईल, असेही संग्राम कानडे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *