४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा
विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित आणि मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने किशोर गट (४ फुट ११ इंच) तसेच व्यावसायिक पुरुष व महिला गटांसाठी खो-खो स्पर्धा बुधवार, २२ जानेवारी २०२५ पासून लाल मैदान (आई-माई मेरवानजी पथ, परळ, मुंबई) येथे सुरू झाली आहे. ही स्पर्धा २६ जानेवारी २०२५ पर्यंत चालणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार श्री. अजय चौधरी यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभाला शिवसेनेचे उप शाखाप्रमुख धनंजय सावंत, विद्यार्थी क्रीडा केंद्राचे अध्यक्ष गजानन वाईरकर, कार्याध्यक्ष यशवंत नाईक, प्रमुख कार्यवाह पराग आंबेकर, खजिनदार समीर हडकर, तसेच मुंबई खो-खो संघटनेचे अध्यक्ष ॲड. अरुण देशमुख, प्रमुख कार्यवाह सुरेंद्रकुमार विश्वकर्मा, कार्याध्यक्ष सुधाकर राऊळ आणि कार्यपाध्यक्ष विकास पाटील उपस्थित होते.
सामन्याचे थरारक निकाल.
आज झालेल्या ४ फुट ११ इंच किशोर गटाच्या पहिल्या सामन्यात सरस्वती स्पोर्टस क्लब अ संघाने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा (१३-२-५) १३-७ असा १ डाव ६ गुणांनी पराभव केला. सरस्वती तर्फे महेक अडवडेने नाबाद ४ मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. अनिकेत सोनारने १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. शिवम झा ने २ मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. श्री समर्थतर्फे मोहम्मद लांजेकरने २:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले.