कल्याण डीसीपी, कल्याण प्रांत आणि फ्रेंड्स फाउंडेशनतर्फे आयोजित
कल्याण : फ्रेंड्स फाऊंडेशन, कल्याण उपविभागीय अधिकारी आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 च्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. कल्याण पश्चिमेतील वायले नगर येथील युनियन ग्राऊंडवर सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत झालेल्या या रक्तदान शिबिराचे यंदाचे हे 10 वे वर्ष होते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजन केल्या जाणाऱ्या या सामाजिक उपक्रमामध्ये तब्बल 263 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. ज्यामध्ये सामान्य रक्तदात्यांसह कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे, प्रांताधिकारी विश्वास गुजर आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांनीही रक्तदान करत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी फ्रेंड्स फाऊंडेशन, कल्याण उपविभागीय अधिकारी आणि डीसीपी यांच्या संयुक्त विद्यमाने या सामजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. ज्याला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याची माहिती आयोजक राहुल दाभाडे यांनी दिली.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, रुपेश म्हात्रे, नायब तहसीलदार रिताली परदेशी, भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, सुनिल वायले, शालिनी वायले, सुप्रसिद्ध शिक्षण अभ्यासक बिपिन पोटे, युवा नेते वैभव भोईर, रितेश वायले, रुपेश सपकाळ, सागर उठवल यांच्यासह कल्याण प्रांत कार्यालय आणि डीसीपी कार्यालयातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.