अशोक गायकवाड
रायगड : अभिजित शिवथरे, अपर पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या असामान्य व सर्वोत्कृष्ट गुन्हे तपासाच्या कामगिरीबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२३ जाहीर होऊन त्यांना पोलीस मुख्यालय अलिबाग-रायगड, येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ना. अदिती तटकरे वरदा सुनील तटकरे, मंत्री, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अभिजित शिवथरे, हे पोलीस उप-अधीक्षक म्हणून पालघर जिल्ह्यात कार्यरत असताना, दिनांक ५ डिसेंबर २०१४ रोजी कासा पोलीस ठाणे येथे कॉ.गु.र.नं.१५९/२०१४ हा दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यामध्ये अभिजित शिवथरे तत्कालीन पोलीस उप-अधीक्षक यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने व अथक परिश्रमाद्वारे गुन्ह्याचा तपास व आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करून आरोपीविरुद्ध निर्धारित वेळेत दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले व आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचविले. त्यामुळे महामार्गावरील दरोडा, जबरीचोरी सारखे गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले.