नव्या हाताने केली त्याने आनंदी जीवनाची सुरवात
रमेश औताडे
मुंबई : एका भीषण रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या २६ वर्षीय हृतिक ला नव्या वर्षात दोन नवीन हात मिळाल्याने त्याचे २०२५ वर्ष आनंदाने सुरू झाले. आयुष्यातील एक मोठी अनमोल भेट त्याला मिळाली. २०१६ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी, इंदोर ते मुंबई या रेल्वे प्रवासादरम्यान हृतिक सिंग परिहारच्या आयुष्याला एक दुःखद वळण आले. तो इंदोरहून मुंबईला पर्यटनासाठी जात होता. पुण्यातील चिंचवड स्थानकावर गाडी बदलत असताना, गर्दीत चुकून धक्का लागल्याने तो दोन गाड्यांमध्ये जाऊन पडला. या अपघातामुळे दोन्ही हात खांद्यापासून निखळले होते.
मुंबईतील परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटल चे अवयव शस्त्रक्रिया तज्ञ डॉ नीलेश सातभाई व त्यांच्या टीमने २०२५ मध्ये हॉस्पिटलचे हे पहिले हात प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले. आजपर्यंत एकूण वेगवेगळ्या अशा २४ हातांचे प्रत्यारोपण करण्यात आले असून रूग्णालयातील हे १३ वे यशस्वी हात प्रत्यारोपण ठरले आहे.
अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आणि योग्य अवयवदात्याची वाट पाहिल्यानंतर, गेल्या आठवड्यात हॉस्पिटलने हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. इंदोरमधील ६९ वर्षीय दात्याकडून मिळालेला हात हृतिकसाठी योग्य ठरला ३० डिसेंबर २९२४ रोजी सुरू झालेली ही शस्त्रक्रिया आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपर्यंत म्हणजेच १५ तासांहून अधिक काळ सुरु होती. अशा महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे ग्लेनईगल्स हॉस्पिटल्स चे सीईओ डॉ बिपिन चेवले यांनी सांगितले.