महापालिकेच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध निवड
भिवंडी: भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीच्या निवडणुकीत प्रभाग क्र. १७ ब मधून भारतीय जनता पार्टीचे सुमित पुरुषोत्तम पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. भिवंडी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या नगरसेवकाची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगरसेवक सुमित पाटील यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व आमदार महेश चौगुले यांनी शुभेच्छा दिल्या.
भिवंडीतील पद्यानगर विभागातील प्रभाग क्र. १७ ब मधून भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतीचा उमेदवार म्हणून सुमित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या प्रभागात सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील दोन अर्ज अवैध ठरले. तर उर्वरित तीन उमेदवारांनी आज निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर सुमित पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. यापूर्वी सुमित पाटील यांची स्वीकृत सदस्य व नगरसेवक म्हणून दोन वेळा निवड झाली होती. या निवडणुकीत त्यांनी हॅट्रिकची नोंद केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत पद्यानगरमधील जनतेने दाखविलेला विश्वास व आशीर्वादामुळे बिनविरोध निवड झाली, अशी प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी व्यक्त केली. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपाला २० व शिवसेनेला ११ जागा मिळाल्या होत्या. गेल्या आठ वर्षात भाजपाची ताकद वाढली असून, यंदाच्या निवडणुकीत युतीला जास्त जागा मिळतील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *