कल्याण: कल्याण आधारवाडी जेल येथे कार्यरत असलेल्या दोन जेल कर्मचाऱ्यांना लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. शरद पानपाटील आणि सतीश भोसले अशी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कारागृहात बंद असलेल्या एका कैद्याची भेट घडवून आणण्यासाठी संबंधित कैद्याच्या नातेवाईकांकडे दीड हजाराची रुपयांची लाच मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला. या संदर्भात नातेवाईकांनी अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे दीड हजाराची लाच स्वीकारताना दोन्ही कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. दरम्यान या प्रकरणी ठाणे अँटी करप्शन ब्युरो यांनी कारवाई केली असून दोन्ही आरोपींविरुद्ध खडकपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *