मुलुंड क्रीडा केंद्र कब्बडी स्पर्धा
मुंबई : मुलुंड (पूर्व) येथील छत्रपती संभाजी राजे मैदानात मुलुंड क्रीडा केंद्रातर्फे आयोजित कबड्डी महोत्सव २०२६ मध्ये महिला गटात कांजूरमार्ग येथील स्वराज्य स्पोर्ट्सने आणि पुरुष विभागात कुर्ला येथील स्वस्तिक क्रीडा मंडळाने जेतेपदाचा मान मिळवला.
महिला गटातील अंतिम सामन्यात स्वराज्य स्पोर्ट्स (कांजूरमार्ग) यांनी उत्कृष्ट खेळ करत आरंभ स्पोर्ट्स (मालाड) संघावर ३६–२२ असा विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. संपूर्ण सामन्यात स्वराज्य संघाने आक्रमक चढाया आणि भक्कम बचाव यामुळे आघाडी कायम राखली. पुरुष गटातील अंतिम सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळ (कुर्ला) यांनी दमदार खेळ करत चेंबूर क्रीडा केंद्र संघावर २६–१४ असा सहज विजय मिळवत विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीच्या सामन्यात स्वस्तिक ने विक्रोळीच्या नवरत्न क्रीडा मंडळाचा पराभव केला. चेंबूर क्रीडा केंद्र विरुद्ध ओवळी क्रीडा मंडळ, घाटकोपर यांच्यातील दुसरा उपांत्य फेरीचा सामना चांगलाच रंगतदार झाला. त्यात ५-५ चढाय्यांच्या जादा डावात चेंबूर क्रीडा केंद्राने बाजी मारली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, सुधाकर घाग यांच्या हस्ते पार पडला. कब्बडी महोत्सवाचे आयोजन सत्यवान दळवी , मिथुन सुरेश सार्दळ, प्रशांत वैती, पुनीत पुजारी यानी केले होते.
वैयक्तिक पुरस्कार (महिला विभाग)
सर्वोत्कृष्ट चढाईपटू: प्रसिता पान्हाळकर (आरंभ स्पोर्ट्स), सर्वोत्कृष्ट बचावपटू: माधुरा सावंत (स्वराज्य स्पोर्ट्स), सर्वोत्कृष्ट खेळाडू: यशिका पूजारी (स्वराज्य स्पोर्ट्स)
पुरुष विभाग
सर्वोत्कृष्ट खेळाडू: आदिनाथ गायकवाड (स्वस्तिक क्रीडा मंडळ), सर्वोत्कृष्ट बचावपटू: सुजल सावंत (स्वस्तिक क्रीडा मंडळ), सर्वोत्कृष्ट चढाईपटू: कुणाल पवार (चेंबूर क्रीडा केंद्र)
