Author: bittambatami.com

दिव्यातील नालेसफाईच्या कामांना मुहुर्त नाहीच

आमदार राजू पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांना धरले धारेवर ठाणे : पावसाळा जवळ आला असतांना आजही ठाणे शहरातील विविध भागात नाले सफाईच्या कामांच्या गंगाटळ्या सुरुच असल्याचे चित्र आहे. तिकडे दिवा भागात आजही नाले सफाईच्या कामांना मुहुर्तच सापडला नसल्याची बाब समोर आली आहे. मनसेचे राजू पाटील यांनी मंगळवारी येथील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी हे विदारक चित्र त्यांच्या निर्दशनास आहे. यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना धारेधर धरले. तर नालेसफाईच्या मुद्यावरुन महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाणे महापालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामांना यंदाही उशीराने सुरवात झाली. त्यात ३१ मे पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण केली जातील असा दावा महापालिकेने केला आहे. सद्यस्थितीत ७० टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तर दोनच दिवसापूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. परंतु त्यानंतरही नालेसफाईच्या कामांना वेग आला नसल्याचेच चित्र दिसत आहे. दिव्यात नालेसफाईबरोबरच गटारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे ठिकठिकाणी खच दिसून येत आहेत. मनपा कडून नाले सफाईकडे दुर्लक्ष केला जात असल्याने नागरिकांनी स्वखचार्ने कामाला सुरुवात केली असल्याचे देखील दिसून आले आहे. मात्र पावसाळा जवळ आला असताना दिव्यातील नाले सफाईसाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली आहे. दिव्यात कोणत्याही प्रकारे नाले सफाईच काम सुरू झाले नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे हाल होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नाले सफाई संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.  यावेळी त्यांनी दिवा शिळ रोड, साबे गाव, मुंब्रा कॉलनी, दिवा स्थानक परिसरातील नाल्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतली आहे. यावेळी ठाणे मनपाला अद्याप नाले सफाईला मुहूर्त मिळाला नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. तर यावेळी सहाय्यक आयुक्तांनी पाटील यांनी चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.  यावेळी दिवा मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अंतिम टप्प्यातली नालेसफाई अधिक सखोलपणे करा – आयुक्त डॉ.कैलास शिंदे

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नैसर्गिक नालेसफाई अंतिम टप्प्यात असून आज महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबईच्या उत्तरेकडून दिघा, ऐरोली विभागापासून नालेसफाई कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला सुरूवात करीत अधिक सखोल नालेसफाई करण्याचे निर्देश दिले. यावर्षी कुठेही पाणी साचून राहणार नाही असा दिलासा नागरिकांना देताना आयुक्तांनी ७७ मोठ्या नैसर्गिक नाल्यांची १०० टक्के सफाई पूर्ण झाली असून उर्वरित १९ मोठ्या नाल्यांची साधारणत: ३० टक्के राहिलेली सफाई येत्या ५ दिवसात पूर्ण होईल असे सांगितले. ही नालेसफाई जलद गतीने करताना योग्य रितीने व संपूर्ण स्वच्छता होईल याकडे बारकाईने लक्ष देऊन करावी अशा सक्त सूचना आयुक्तांनी दिल्या. यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश देतानाच आयुक्तांनी नालेसफाई करणारे कामगार हे गमबूट, हँडग्लोव्हज् अशी सुरक्षा साधने वापरूनच काम करीत असल्याची खात्री करून घ्यावी असेही निर्देशित केले. नाल्यांची सफाई होत असताना त्यातून काढला जाणारा गाळ लगेच उचलण्यात यावा तसेच काही नाल्यांचे डिसेल्टिंग करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले असून तेही काम लगेचच पूर्ण करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तत्पूर्वी आयुक्तांनी दिघा विभागाच्या पावसाळापूर्व पाहणीमध्ये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कामे झाली आहेत काय याची पुनर्पाहणी केली. दिघा भाग काहीसा सखल आहे. तसेच इलठणपाडा येथील धरणाचा विसर्ग पश्चिमेकडील खाडीकडे वहात येताना मध्ये झोपडपट्टी, एमआयडीसी भागातील नाले काहीसे अरूंद असल्याने त्यांची सखोल सफाई होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन नाल्यांतून खाडीत वाहून जाणारे पाणी विनाअडथळा वाहून जाण्याच्या दृष्टीने नालेसफाईची पाहणी केली व अधिक सखोल नालेसफाईचे निर्देश दिले. यावेळी काही ठिकाणी नाल्यांमधून जाणा-या केबल्समुळे प्रवाहात कचरा अडून राहू शकतो हे लक्षात घेत त्याठिकाणी चॅनल टाकावेत व केबल त्यावर बांधून पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांमार्फत देण्यात आल्या. त्याचप्रमाणे नाल्यांच्या काठांच्या भिंतीवर उगवलेली रोपटीही काढून टाकावीत असे त्यांनी सूचित केले. नालेसफाई प्रमाणेच परिसर स्वच्छतेकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देताना आयुक्तांनी स्वच्छता ही आपल्या शहराची ओळख असल्याने स्वच्छतेबाबत कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही असे स्पष्ट संकेत दिले. रस्त्यांच्या शेजारील हरितपट्टे तसेच सुशोभित जागा यांची नियमित निगा राखण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच पदपथ नागरिकांना चालण्यासाठी विनाअडथळा खुले राहतील तसेच त्यावरील झाकणे तुटली असतील तर ती तातडीने बदलून घ्यावेत असेही आयुक्तांनी निर्देशित केले. नवी मुंबई शहरातील पावसाळापूर्व कामांची सद्यस्थिती आयुक्तांनी काल २७ मे रोजी विशेष आढावा बैठक घेत संबंधित अधिकारी यांचेकडून जाणून घेतली आणि आज दिघा, ऐरोली विभागापासून प्रत्यक्ष पाहणीला सुरूवात केली.

अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा आजपासून 

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त २९ मेपासून आंतर हॉस्पिटल ‘ए’ डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धा शिवाजी पार्क मैदानात रंगणार आहे. रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा गाजविणारे नानावटी हॉस्पिटल विरुध्द लीलावती हॉस्पिटल यामध्ये बुधवारी सकाळी ९.०० वा माहीम ज्युवेनील खेळपट्टीवर प्रारंभिक लढत गौरवमूर्ती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते,  शिवछत्रपती पुरस्कार विजेते लिलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. स्पर्धेप्रसंगी सेव्हन हिल्स हॉस्पिटल क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू डॉ. मनोज यादव आणि नानावटी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू प्रतिक पाताडे यांचा विशेष गौरव होणार आहे. अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेच्या ‘ए’ डिव्हिजनचे विजेतेपद पटकाविण्यासाठी अष्टपैलू प्रतिक पाताडे, ओमकार जाधव, दिनेश पवार, प्रणव हरियान, डॉ. नवनीत राय, नितीन रांजे, किशोर कुयेस्कर आदींचा नानावटी हॉस्पिटल; अष्टपैलू रुपेश कोंडाळकर, मनोहर पाटेकर, धर्मेश स्वामी, सिध्देश घरत, संदेश पंधेरे, विजय नाडकर, विरेश दांडेकर, योगेश जांभळे आदींचा लीलावती हॉस्पिटल; नरेश शिवतरकर,  सुभाष शिवगण, जगदीश वाघेला, रोहन म्हापणकर, मनोज जाधव, राकेश शेलार, विलास जाधव आदींचा जे.जे. हॉस्पिटल; अष्टपैलू अॅलन गावद्या, आनंद सुर्वे, देवेंद्र भानसे, अल्केत तांडेल, दीपक सिंघ, सुरज जयस्वाल, ओमकार पाटील, संकेत किणी आदींचा कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-अंधेरी यामध्ये चुरस असेल. ‘बी’ डिव्हिजनच्या अजिंक्यपदासाठी सेव्हन हिल्स हॉस्पिटल, हिरानंदानी हॉस्पिटल, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल, केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई, कस्तुरबा हॉस्पिटल यामध्ये अटीतटी असेल. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आणि वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक श्री. निलेश मदाने यांच्या वाढदिवसानिमित्त विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी आणि ज्येष्ठ पत्रकार किशोर आपटे यांनी श्री. मदाने यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुस्तके प्रदान करुन सन्मानित केले.

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने, महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आहे. यावेळी उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे आणि उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांच्यासह महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पथनाट्यातुन पर्यावरण विषयक जनजागृती-शिरिष आरदवाड

अशोक गायकवाड नवी मुंबई : माझी वसुंधरा अभियानामध्ये पर्यावरण संवर्धन माहितीपूर्ण कार्यशाळा आयोजित करून पथनाट्यांतुन जनजागृतीवर भर दिला जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (२) शिरिष आरदवाड यांनी दिली आहे. शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवत नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. यावर्षीही ‘माझी वसुंधरा अभियान’ ४.० अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत असून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरण विषयक जनजागृती करताना पथनाट्यासारख्या लोकांना चटकन् भावणा-या माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्यात येत असून २१ मेपासून नमुंमपा क्षेत्रातील आठही विभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येक माणसाने करावयाच्या छोट्या छोट्या बाबींची माहिती पथनाट्यांच्या माध्यमातून त्यावर हसत खेळत भाष्य करीत सादर करण्यात आली असून या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आठही विभागांत गर्दी असते अशा मुख्य २२ ठिकाणी सादर झालेल्या माझी वसुंधरा अभियानविषयक पथनाट्यांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला असून पथनाट्य सादरीकरण करणा-या कलावंत समुहाचे उपस्थिांकडून कौतुक झाले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. शिरिष आरदवाड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.राहुल गेठे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री.दिलीप नेरकर, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘कळव्यातील अनाधिकृत कार्यालयाचे आव्हाडांनी ट्विट करावे’

आनंद परांजपे यांचे आव्हान ठाणे :  पुणे अपघात प्रकरणी अजित पवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करुन सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे व राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही जितेंद्र आव्हाड हे खोटे आरोप करीत आहेत. उलट अजित पवार यांनी आव्हाडांच्यासाठी दोन-दोनदा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता हे ते विसरलेले दिसतात. जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचे अनधिकृत शरद पवार गटाचे कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना ट्विट करावे असे आव्हान अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  नितेश राणे आणि निलेश राणे यांनी अनेकदा भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे, अंजलीताईंनी ॲक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणे बंद करावे, असेही ते यावेळी म्हणाले. माझा जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे की याच अजित पवार साहेब यांनी आपल्यासाठी ज्यावेळी ३५४ गुन्हा दाखल झाला. त्यावेळी आपल्यासाठी देखील ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता, की आपण व्हिडिओ पूर्ण न बघता, चौकशी न करता आमचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ चा गुन्हा कसा दाखल केलात ? हे आपण विसरलात का ? हरहर महादेवच्या वेळेला ज्यावेळेला तुम्हाला, आम्हाला, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनने अचानकपणे नेले होते, त्यावेळी देखील अजित पवार यांनी तत्कालीन पोलीस आयुक्तांना फोन केला होता. मात्र कुठेही केव्हाही अजित पवार यांचा संबध जोडण्याचे काम आव्हाडांकडून केले जात असल्याचेही ते म्हणाले. मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात येणे चुकीचे लोकसभा निवडणुकीनंतर सर्व मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी यांची बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री माननीय छगन भुजबळ यांनी मतुस्मृतीचा मुद्दा उपस्थित केला होता. पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलणार आहेत की, अशाप्रकारे मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात येणे हे चुकीचे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा विरोधच करेल असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील ११ हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ठाणे : पुण्यात घडलेल्या घटनेनंतर आता ठाण्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी हॉटेल, पब, बारवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११ हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे. यात अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशीरापर्यंत बार सुरू असणे अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. पुण्यात झालेल्या घटनेनंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहेत. मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक विभागाकडून कारवाई सुरु झाली आहे. तर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील कारवाईचा दट्या दिला जात आहे. भिवंडी आणि ठाण्यात ठिकठिकाणी बेकायदा ढाबे, हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने मद्य विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये विकासकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श ही कार भरधाव चालवून दुचाकीवरून जाणाºया तरूण-तरूणीला धडक दिली होती. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने हॉटेल, बार, रेस्टॉरंट, ढाबे सुरू आहेत. त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील कठोर पावले उचलण्यात आली असून अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशीरापर्यंत बार सुरु ठेवणे अशांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार मद्य विक्री करण्याचा परवाना असलेल्या परंतु नियमांचे उल्लंघन केलेल्या ११ हॉटेल, बार विरोधात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

पुराची सूचना देणाऱ्या सेन्सरमुळे आपत्ती व्यवस्थापन होणार प्रभावी

महापालिका क्षेत्रातील सहा सेन्सरची देखभाल ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या संभाव्य पूर आणि पाणी साठण्याच्या घटना यांची आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि संबंधित यंत्रणा यांना आगावू सूचना देणाऱ्या सहा सेन्सर्सच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे संभाव्य आपत्तीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. ठाणा कॉलेज, वृंदावन पंपिंग स्टेशन, साकेत पाइपलाइन, मुंब्रा स्मशानभूमी, हिरानंदानी इस्टेट आणि गायमुख वॉटरफ्रंट या सहा ठिकाणी हे स्वयंचलित सेसर्स काही वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचा प्रभावी वापर करण्याची सूचना ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यात करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हार्यन्मेंट अॅण्ड वॉटर (सीईईडब्ल्यू) या वातावरण बदल क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने हा कृती आराखडा तयार केला आहे. पावसाळापूर्व आढावा बैठकीत या सेन्सर्सच्या स्थितीची चर्चा झाली होती. पावसाचे प्रमाण जास्त असल्यास त्यांची सूचना या सेन्सर्सच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये सूचना दिली जाते. त्यानुसार, मग संबंधित विभाग, प्रभाग समिती, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना तातडीने संदेश पाठवले जातात. त्यामुळे, पूर स्थिती, पाणी साठणे आदींचा सामना करणे यंत्रणेला शक्य होते. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात साठणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव आदींमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही प्रसंगात जीवितहानी होण्याचीही भीती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूर सदृश स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.