Category: ठाणे

Thane news

बेकायदा पब-हुक्का पार्लरला यापुढे स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार 

अनिल ठाणेकर  ठाणे : ठाण्यातील बेकायदेशीर पब, हुक्का पार्लर आणि डान्स बार प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरण्यात येईल तसेच या अवैध व्यवसायांवर कारवाया करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची…

ठाण्यात हिट अ‍ॅण्ड रनचे चार महिन्यांत ३६ बळी

ठाणे -ठाण्यात चार महिन्यांत हिट अ‍ॅण्ड रनने तब्बल ३६ बळी घेतल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तर या अपघातात १०६ जण कायमचे जायबंदी झाले आहेत. तसेच या घटनेमुळे येऊर, घोडबंदर…

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पनवेलमध्ये जोरदार आंदोलन

पनवेल : महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आव्हाडांविरोधात पनवेलमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, कामगारनेते जितेंद्र घरत, अनुसूचित जाती मोर्चाचे अरुण सोळंकी, विनायक मुंबईकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, अविनाश गायकवाड, अनंता गायकवाड, श्याम साळवी, मयूर कदम, रावसाहेब खरात, मधुकर  उरणकर, अमोल जाधव, कोषाध्यक्ष शोभा मिंठबावकर, चित्रा भंडारी, सदस्य संजय कांबळे, आनंद जाधव, संतोष म्हस्के, चंद्रकांत सोनवणे, सुरजित टाक, सर्जेराव साळवे, गोपाल पडे, अनंता वाहुळकर, उमेश कांबळे, आत्रम, गणेश जाधव, देवद ग्रामपंचायतीचे सदस्य बंटी रसाळ, श्री ढवळे, श्री तायडे, विष्णू गायकवाड, चेतन कांबळे, यांच्यासह भीम अनुयायी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. महाडच्या आंदोलनाचे वेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असे लिहिलेले फोटो आणले होते. मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकत्यांनी आंबेडकरांचे फोटो फाडले. त्यामुळे भीम अनुयायींकडून मध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात तसेच पुण्यातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झाला आहे. स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशीची जोरदार मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे.

…तर लाखोंच्या संख्येने होणारी वृक्षतोड निश्चित थांबू शकेल- वैभव कुलकर्णी

इको फ्रेन्डली लाईफच्या माध्यमातून  समृद्ध भारत निर्माण करण्याचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम ठाणे : दिवसेंदिवस वातावरणातील तापमान अधिकाधिक तीव्र होताना आपणास जाणवत आहे. दिवसागणिक वाढत चाललेली उष्णता अशीच वाढत राहिली तर पुढच्या काही वर्षातच भारतातील जीवसृष्टी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.  जर येणाऱया काळात मनुष्यनिर्मित आपत्तीमुळे आरोग्यपुर्ण जीवनच जगता येणार नसेल तर  अशा भौतिक सुख निर्मितीचा उपयोग काय ?  यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे, ती ओळखून संपूर्ण भारतभर 700 कोटी फळझाडे लावून फळझाडांनी बहरलेला समृद्ध भारत निर्माण करण्याचा संकल्प इको फ्रेन्डली लाईफ या पर्यावरणवादी संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. याची सुरुवात ५ जुन रोजी पर्यावरण दिनापासून करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सरकारी प्रशासकीय आस्थापनांचा सहभाग मिळावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे.  त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांची भेट घेण्यात आली. त्यांच्याबरोबर याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे सर्वेसर्वा पर्यावरण तज्ञ अशोक एन.जे. यांच्यासोबत सिद्धांत चासकर, कुणाल  बागुल,  सागर झेंडे, किशोर बनकर, राहूल गायकवाड आदी उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यामधील  शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, जव्हार, वाडा, मोखाडा, इत्यादी तालुक्यातील फळझाडांच्या लागवडीवर यावेळी  सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या ७०० कोटी फळझाडांनी बहरलेला समृद्ध भारत निर्माण करण्याच्या संकल्पनेला कुलकर्णी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच या उपक्रमाकरिता  सामाजिक वनिकरण विभागाकडून काही प्रमाणात फळझाडे उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिले. तसेच आता वेळ खूप कमी आहे. पुढील वर्षीय योग्य नियोजन करून या उपक्रमाकरिता अधिक फळझाडे तयार करण्यास संबंधितांना सांगता येईल त्यामुळे फळझाडांच्या रोपाची उपलब्धता अधिक होऊ शकेल. असे कुलकर्णी म्हणाले. ठाणे जिल्हा वनरक्षक विभागाचे संतोष रास्ते यांनी देखील या उपक्रमाला रोपे देण्याची तयारी दर्शवली. तसेच भविष्यात मोठ मोठ्या कंपन्यांचा सीएसआर फन्ड या उपक्रमाकरिता कसा मिळेल याकरिता प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामिण भागात होणारी प्रचंड वृक्षतोड थांबवण्यासाठी ग्रामिण भागातील संपूर्ण गाव कंपन्यांनी दत्तक घेऊन त्यांचा सीएसआर फंन्ड त्या गावातील शेतकऱ्यांसाठी इन्सेन्टीव्ह म्हणून दिल्यास ही वृक्षतोड पुर्णपणे थांबू शकते, असा आशावाद रास्ते यांनी व्यक्त केला. तसेच  राज्यशासनाच्या पातळीवर या प्रकारचा जीआर काढून प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी पब्लिक प्रा.पार्टनरशीप म्हणजेच पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था व पर्यावरण विभाग यावर देखरेख ठेवून लाखोंच्या संख्येने होणारी वृक्षतोड निश्चित थांबू शकेल, याबाबत सविस्तर चर्चा करताना ते पुढे म्हणाले,  वनखात्यातील वर्कस पडीत जागा ह्या पुर्ण वृक्षलागवडीखाली आणता येतील त्यासाठी सामाजिक संस्था व वनखाते महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये नियमानुसार एग्रीमेन्ट करून मोठ्या प्रमाणात फळझाडांची लागवड करून जोपासता येईल. म्हणजेच प्रा.पब्लिक प्रार्टनरशीपमधून हे यशस्वी करता येईल. तसेच ८०० कि.मी.च्या संमृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूंनी योग्य नियोजन करून फळझाडांची लागवड केल्यास संपूर्ण रस्ता सावलीमध्ये राहील. तापमान कमी होईल व फळझाडांचाही लाभ घेता येईल. पब्लिक प्रा.पार्टनरशीपमधून हे सहज करता येऊ शकते.  या संदर्भात सरकारकडे कृती योजना सादर करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले, संपूर्ण भारतभर 700 कोटी फळझाडे लावून फळझाडांनी बहरलेला समृद्ध भारत निर्माण करण्याचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम 5 जून 2024 पासून अर्थात जागतिक पर्यावरण दिनापासून सुरु करण्यात येत आहे.  ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा या ठिकाणी धडक कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात आपण सहभागी होण्यासाठीचे निवेदन आणि इको फ्रेन्डली लाईफच्या माध्यमातून आखण्यात आलेल्या कार्यक्रमाची रुपरेषा असलेली माहिती पुस्तिका संस्थेचे प्रमुख पर्यावरण तज्ञ अशोक एन.जे. यांनी मान्यवरांना दिली.

जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे ठाण्यात भाजपाकडून दहन

आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपाने चार ठिकाणी तीव्र आंदोलन करून आव्हाडांचा पुतळा जाळला. तसेच त्यांच्या छायाचित्राला काळे फासले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नियोजनातून आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात ठाण्यातील कोर्ट नाका, कळवा, भीमनगर आणि कोपरीत झालेल्या आंदोलनात आव्हाडांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच चितळसर पोलिस ठाणे व वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, उत्तराखंडमधील ऋषीकेश येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करीत जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, वृषाली वाघुले-भोसले यांनी आव्हाडांवर कारवाईची मागणी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार, ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघात आंदोलन करून आव्हाडांचा धिक्कार करण्यात आला. ठाण्यातील कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात आमदार संजय केळकर यांच्यासह ठाणे शहर विधानसभा निवडणूकप्रमुख सुभाष काळे, माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर, माजी नगरसेविका नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनिल हंडोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, राजेश मढवी, विक्रम भोईर, महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सामील झाले होते. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर येथे झालेल्या आंदोलनात आव्हाडांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. त्यानंतर भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष आनंद बनकर यांनी वर्तकनगर पोलिसांना निवेदन देऊन आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या आंदोलनात महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, भाजयुमोचे शहराध्यक्ष सुरज दळवी, वर्तकनगर मंडल अध्यक्ष संतोष जायसवाल, लोकमान्य नगर मंडल अध्यक्ष निलेश पाटील, बाळा केंद्रे, राम ठाकूर, वीरसिंह पारछा आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात विधानसभा मतदारसंघाचे सहप्रभारी भरत चव्हाण, माजी नगरसेवक सुरेश कांबळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. समीरा भारती, सहसंयोजक कृष्णा भुजबळ, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, वागळे मंडल अध्यक्ष सचिन सावंत, इंदिरानगर मंडल अध्यक्ष दयाशंकर यादव यांच्यासह कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला. त्यानंतर सुरेश कांबळे यांनी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात निवेदन देऊन आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर कळवा येथे भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, मंडल अध्यक्ष सुदर्शन साळवी, सोहेल शेख, हिरोज कपोते यांनी आंदोलन करून आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील भीमनगर येथे माझ्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी…

९० फुटी रस्त्यावरील विजेचा लपंडाव कायम

सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकाराने ठाकुर्ली रहिवासी हैराण कल्याण : ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील गृहसंंकुलांमध्ये मागील तीन महिन्यांंपासून महावितरणच्या विजेचा लपंडाव सुरू आहे. आतातर उन्हाची काहिली, घामाच्या धारांनी नागरिक हैराण आहेत. अशा परिस्थितीत ९० फुटी रस्ता भागात पाच ते सहा तास वीज पुरवठा बंद राहत असल्याने रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. ९० फुटी रस्ता परिसरात मध्यमवर्गियांची सर्वाधिक वस्ती आहे. या भागातील अनेक नोकरदार घरातून कार्यालयीन काम करतात. काही जण विदेशातील आपल्या कार्यालयातील कामकाज घरबसल्या करतात. या सर्वांंना या खंडित वीज पुरवठ्याचा सर्वाधिक त्रास होतो. ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील विजेचा लपंडाव कायम, सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकाराने रहिवासी हैराण अनेक घरांंमध्ये बिछान्याला खिळून असलेले वृध्द, ज्येष्ठ नागरिक, लहान बाळे आहेत. वीज गेली की या मंडळींना सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागते. ९० फुटी रस्ता भागातील सततच्या वीज लपंडावाची समस्या कायमची मिटविण्यासाठी या भागासाठी स्वतंंत्र वीज पुरवठा यंत्रणा बसवावी, अशी मागणी खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता भागातील रहिवाशांकडून केली जात आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता गेलेली वीज दुपारी चार वाजले तरी आली नव्हती. तोपर्यंत रहिवासी घरात बटाट्यासारखे उकडून निघाले होते. अनेक नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊन या सततच्या वीज लपंडावाबद्दल जाब विचारून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन माध्यमातून सुरू आहेत. त्यांनाही या खेळखंडोब्याचा फटका बसत आहे. महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, एमएमआरडीएकडून ठाकुर्ली भागात रस्ते काम सुरू आहे. त्यांनी काम करताना जेसीबीच्या साहाय्याने महावितरणची महत्वाची वीज पुरवठा करणारी भूमिगत वाहिनी खराब केली. त्यामुळे अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. ही माहिती एमएमआरडीएच्या अधिकारी, ठेकेदारांनी तात्काळ महावितरणला देणे आवश्यक होेते. पण, एमएमआऱडीए अधिकाऱ्यांनी ही माहिती महावितरणला न देता याविषयी गुपचिळी धरून राहणे पसंंत केले. खंंबाळपाडा भागातील वीज पुरवठा खंंडित झाल्याच्या तक्रारी महावितरण कार्यालयात आल्या. त्यावेळी सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेऊनही खंडित वीज पुरवठ्याचा तपास लागत नव्हता. अखेर रस्ते खोदकाम करताना झालेल्या बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे महावितरण अधिकाऱ्यांना समजले. एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे महावितरणला मनस्ताप आणि नुकसानीला सामोरे जावे लागले. म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एमएमआरडीएला दंड ठोठावण्याच्या हालचाली केल्या. जोपर्यंत एमएमआरडीए दंड भरत नाही, तोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत न करण्याची भूमिका महावितरण अधिकाऱ्यांनी घेतली. या कलगीतुऱ्यात नागरिकांची घुसमट झाली. अखेर सामोपचाराने हा विषय मिटवून खंबाळापाडा भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. खंबाळापाडा भागातील एका सोसायटीत तांत्रिक बिघाड झाला होता. तो बिघाड काढताना एमएमआरडीएकडून रस्ते काम करताना जेबीसीकडून महावितरणची वीज वाहिनी खराब झाल्याचे निदर्शनास आले. तो बिघाड दुरुस्त करून या भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. – चंदन मोरे, साहाय्यक अभियंता, महावितरण.

डोंबिवलीतील घरडा सर्कल रस्ता मतमोजणीसाठी ४ जून रोजी बंद

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी घरडा सर्कल जवळील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडागृहात ४ जून रोजी होणार आहे. या कालावधीत क्रीडासंकुला बाहेरील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक येण्याची शक्यता विचारात घेऊन सावळाराम महाराज क्रीडासंकुला समोरील घरडा सर्कल लगतचे सर्व रस्ते ४ जून रोजी पहाटे पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक विभागाकडून बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत नागरिकांनी घरडा सर्कल जवळील पर्यायी रस्ते मार्गावरून वाहतूक करण्याची सूचना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, प्राणवायू सिलिंडर, अग्निशमन यंत्रणा, पोलीस वाहने, हरित मार्गिका यांच्यासाठी मात्र घरडा सर्कल रस्ता खुला राहील. कल्याण-शिळफाटा, कल्याण, बदलापूर परिसरातून येणारी वाहने घरडा सर्कलमार्गे डोंबिवली शहरात प्रवेश करतात. या वाहनांच्या धावेमुळे या भागात वाहन कोंडी होण्याची शक्यता विचारातून घेऊन मतमोजणीच्या दिवशी घरडा सर्कल रस्ता वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. बंद रस्ते व पर्यायी मार्ग डोंबिवली शहरातून टिळक चौक, शेलार नाका मार्गे घरडा सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवम रुग्णालय येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. ही वाहने शिवम रुग्णालय येथे उजवे वळण घेऊन डोंबिवली जीमखाना, सागर्ली मार्गे इच्छित स्थळी जातील. सुयोग हाॅटेैल, रिजन्सी अनंतम, पेंढरकर महाविद्यालय मार्गे घरडा सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आर. आर. रुग्णालय येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने आर. आर. रुग्णालय येथे डावे वळण घेऊन मिलापनगर, कावेरी चौक येथून इच्छित स्थळी जातील. खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली रस्ता, पंचायत बावडीकडून येणाऱ्या, विको नाक्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदिश पॅलेस हाॅटेलजवळ वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात येणार आहे. ही वाहने खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता, टाटा नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. आजदेगाव, आजदेपाडा कमान येथून घरडा सर्कलकडे येणाऱ्या, बंदिश पॅलेसकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना घरडा सर्कल येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने घरडा सर्कल येथे येऊन शिवम रुग्णालयाकडे जाऊन तेथून ती डोंबिवली जीमखाना मार्गे इच्छित स्थळी जातील. विको नाकाकडून बंदिश पॅलेसकडे हाॅटेलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हाॅटेल मनीष गार्डन येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने मनीष गार्डनजवळ उजवे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.

अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई

बेकायदा पब, हुक्का पार्लर, डान्स बारवर कारवाईसाठी स्वतंत्र कक्ष ठाणे : पुणे येथील पोर्श अपघाताप्रकरणानंतर जाग आलेल्या ठाणे उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात बेकायदा सुरू असलेल्या ११ हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित केले असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाणे पोलिसांनी बेकायदा पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारवर कारवाईसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. तसेच अशा अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या स्थानिक पोलिसांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिला आहे. ठाण्यातील बेकायदा हाॅटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी यापुर्वीच ठाणे पोलिसांकडे केली होती. परंतु त्यावर अपेक्षित कारवाई होत नसल्याबद्दल केळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुणे येथील पोर्श अपघाताप्रकरणानंतर ठाण्यातील बेकायदा हाॅटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार केळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन अशा व्यवसायांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून ठाण्यातील तरुण पिढ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर या अवैध व्यवसायांविरुद्ध महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून यासंदर्भात लोक चळवळही सुरू केली. यावर अधिवेशनातही आवाज उठवला. यानंतर ठाण्यातील या अवैध व्यवसायांवर कारवाई झाली. पण, त्यांनतर पुन्हा हे व्यवसाय सुरू होत असल्याची बाब आमदार केळकर यांनी आयुक्त डुंबरे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या अशा व्यवसायांवर ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अवैध व्यवसायांवर नियमित आणि ठोस कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त डुंबरे यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर अशा अवैध व्यवसायांना त्या-त्या विभागातील स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार राहणार असल्याचे सांगून त्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त डुंबरे यांनी यावेळी दिल्याचे केळकर यांनी सांगितले. या संदर्भात ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी या अवैध व्यवसायांविरुद्ध लोकचळवळ सुरू केली आहे. त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मागील काळात काही पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने काम केले, परंतु काही ठिकाणी दुर्लक्ष झाले. त्यामुळे यावर ठोस कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्तांना भेटून अनेक मागण्या केल्या. त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी तातडीने करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. संजय केळकर (आमदार, ठाणे शहर)

रस्त्यावरील बालकांप्रती संवेदनशील व्हावे…!

कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत- प्रियंक कांगजू ठाणे : स्त्यावरील बालकांच्या समस्येबाबत समाजाने संवेदनशील होणे आवश्यक असून त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न समाजातील सर्व घटकांकडून होणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली चे अध्यक्ष श्री. प्रियंक कांगजू यांनी आज येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात श्री.कांगजू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बाल हक्क संरक्षण विषयाबाबतची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, एनसीपीसीआर, नवी दिल्ली च्या मेजर श्रीमती रुपाली बॅनर्जी, ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जे.जे.बी. मेंबर, ठाणे स्वाती रणदिवे, कामगार उपायुक्त ठाणे लक्ष्मण सावंत, महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीमती चारुशिला खरपडे, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दीक्षित, ठाणे मनपा चे दशरथ  वाघमारे, सहयोग ट्रस्ट अध्यक्ष विश्वकांत लोकरे, फिरते पथक अल्ताफ काजमी, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या तेजश्री शिंदे, महिला व बाल कल्याण विकास प्रतिनिधी जि.प.ज्योती प्रकाश महाडीक आदि मान्यवर उपस्थित आहेत. या बैठकीत प्रामुख्याने रस्त्यावरील मुले व त्यांचे कुटुंब यांच्या समस्यांविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत असल्याचे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष श्री. प्रियंक कांगजू यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, वर्ष 2016 पासून या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली, राज्य शासन आणि विविध सामाजिक संस्था यांच्या एकत्रित समन्वयातून मार्गदर्शक कार्यपद्धती आखण्यात आली आहे. फक्त एका मुलाचे पुनर्वसन हा या समस्येवरील परिणामकारक उपाय नसून त्या मुलासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे शाश्वत पुनर्वसन गरजेचे आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रस्त्यावरील मुले व त्यांचे कुटुंब यांची आर्थिक क्षमता वाढविणे आवश्यक असून या मुलांना शाळेत भरती करणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व समस्यांवर “सहकारी तत्त्वावरील निवारागृहे” हा एक परिणामकारक उपाय होवू शकतो, असेही त्यांनी सुचविले. याबाबत भोपाळ येथील प्रकल्पाचे त्यांनी उदाहरण दिले. ठाणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही सामाजिक संस्थांसह या प्रकल्पास भेट देवून तेथील कार्यपद्धतीचा अभ्यास करावा आणि ठाणे जिल्ह्यातही अशा प्रकारचा प्रकल्प उभारावा, असेही श्री. कांगजू यांनी सुचविले. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.महेंद्र गायकवाड यांनी महिला व बाल विकास विभागाने बाल हक्क संरक्षण संदर्भात केलेल्या कामकाजाची माहिती अध्यक्ष महोदयांना दिली. त्याबद्दल श्री.कांगजू व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व महिला बालविकास विभागाने केलेल्या कामांचे विशेष कौतुकही केले. शेवटी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.