मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी) – पत्रकार नरेंद्र बंडबे लिखित ‘कुब्रिक’ या पुस्तकांचे प्रकाशन शनिवार १७ जून २०२३ संध्याकाळी ६ वाजता मुंबईत पार पडला. प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, फोर्ट इथं या निमित्ताने खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्टॅनली कुब्रिक (१९२८-१९९९) हे सिने दिग्दर्शक होते. त्यांनी आपल्या ४८ वर्षांच्या कारकिर्दीत १३ सिनेमे बनवले. हे सर्व सिनेमे त्या-त्या काळातल्या गाजलेल्या आणि वादग्रस्त साहित्यावर आधारीत होते. ‘लोलिता’, ‘स्पार्टाकस’, ‘ए क्लॉकवर्क ऑरेंज’, ‘डॉ. स्ट्रेंजलव्ह’ आणि ‘२००१ अ स्पेस ओडिसी’ आदी अजरामर सिनेमे कुब्रिक यांच्या नावावर आहेत.
सिनेमा क्षेत्रात परफेक्शनिस्ट हा शब्द पहिल्यांदा स्टॅनली कुब्रिकसाठीच वापरण्यात आला. सिनेमाचं शास्त्रं, सिनेमाची भाषा अधिकाधिक समृध्द करण्यात कुब्रिक यांचं योगदान मोठं आहे. त्यांना व्हिज्युअल पोएट म्हणजे दृश्यांचा कवी असं ही संबोधलं जायचं.
उदघाटन प्रसंगी बोलताना राजश्री देशपांडे म्हणाल्या की, “कुब्रिक पुस्तक वाचलं म्हणजे हॉलीवुडच्या स्टुडिओ सिस्टमपासून सिनेमा क्षेत्रात आलेले महत्त्वाचे बदल, प्रवाह, तांत्रिक बदल सर्व काही समजतं. कुब्रिकनं बहुतांश सर्व जॉन्रातले सिनेमे बनवले. त्यामुळं सिनेमाचा प्रेक्षक म्हणून समृध्द होण्याची प्रक्रिया या पुस्तकापासून सुरु होते.”
लेखक नरेंद्र बंडबेने कुब्रिक या पुस्तकात दिग्दर्शक स्टॅनली कुब्रिक कसा घडला आणि त्यानं काय घडवलं याचा आढावा घेतलाय.
यावेळी बोलताना नरेंद्र बंडबे म्हणाले, “या पुस्तकावर अनेक वर्षे काम केलं आहे. त्यामुळे आजचा आनंद मोठा आहे. पुस्तक आधीच अमेझोन, पुस्तकवाला या वेबसाईट आणि बुककट्टा आदि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.”
मुंबईच्या सदामंगल पब्लिकेशननं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. पत्रकार प्रज्ञा जांभेकर या पुस्तकाच्या संपादिका आहेत. पत्रकार संजय सिंह, मंदार परब, आदींचा सहित अनेक मान्यवरांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली.