Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 कुलाबा,कफ , परेड, गिरगांवसह उपनगरात गोविंदा पथकांचा जल्लोष

डोंगरीत महिला गोविंदा पथकांच्या मुलींचा जल्लोष दिनेश मराठे मुंबई : शुक्रवारी मध्य रात्री बारा सव्वा बारा वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा मुंबईच्या कृष्ण मंदिरांसह अन्य मंदिरातही संपन्न झाला.गोविंदा गोपाळा चा गजर करीत दक्षिण मुंबईत गोविंदा पथकांची सकाळी १० वाजल्या पासूनच मानाच्या दहि हंड्या फोडण्यास चुरस वाढू लागली.शुक्रवारी दिवसभर मुंबईत आकाशातून श्रावणी सरीवरसरी बरसणाऱ्या पावसाचा शनिवारीही असाच मारा राहिल्यास गोविंदा पथकांना त्याच्या मोठया आव्हानाला सामोरे जावेच लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र शनिवारी मुंबईच्या काही भागात अगदीच तुरळक झालेल्या वरुणराजाच्या श्रावणी जलधारांचा होणारा अभिषेक, उंचावर बांधलेल्या दहीहंडीच्या उंचीच्या थरांचा अंदाज घेत विविध गोविंदा पथकांनी मोठया रुबाबात सलामी फोडल्या. खास करून मुंबईच्या दक्षिण टोकाकडील कुलाबा, कफ परेड, वाळकेश्वर येथून पुढे फोर्ट, काळबादेवी, मलबार हिल,डोंगरी,उमरखाडी, गिरगावसह दक्षिण मुंबईतील मानाच्या दहीहंड्या गोविंदा पथकांनी विजयी सलामी देत फोडल्या. यावेळी गोविंदांच्या हंडी फोडण्याचा थरार आणि साहस पाहताना लोकांच्या काळजाचे ठोके चुकत होते. गोविंदांची शिस्तबद्धपणे एकावर एक मानवी मनोऱ्यांचे थर रचत दहीहंडी सर करण्यासाठी चाललेली लगबग माझगाव, डोंगरी, मशीद बंदर, कुलाबा, कफ परेड, मेट्रो, फोर्ट, वाळकेश्वर, मलबार हिल, उमरखाडी, कुंभारवाडा, खेतवाडी, भायखळा, नागपाडा, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल, बीडीडी चाळ, ग्रांट रोड, गिरगाव, ताडवाडी परिसरात पाहायला मिळत होती. ‘अरे बोल बोल बोल… बजरंग बली की जय’ आणि ‘गोविंदा रे  गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा ‘ चा जयघोष करीत उमरखाडी नाक्यावर मनसेच्या राजन दळवी, आज्ञा भोसले आणि वीरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या हंडया विविध गोविंदा, महिला गोविंदा पथकांनी रचलेल्या चार, पाच आणि सहा थरांच्या पहिल्याच प्रयत्नात फुटल्याने त्यांनी मोठा जल्लोष केला. जे.जे. रुग्णालयाच्या नवयुग गोविंदा,यंग उमरखाडी गोविंदा,श्रीराम महिला गोविंदा पथक, श्रीकृष्ण गोविंदा पथक, यांनी ४,५,६,७ थरांची दहीहंडी मानवी मनोरे रचत तीन एक्के लावत सलामी देत पहिल्याच प्रयत्नात लीलया फोडल्या. तरुण गोविंदाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हंडी फोडल्यानंतर बक्षीस स्वीकारताना ओसंडून वाहताना दिसत होता.मुंबईकर गोविंदा आणि दहीहंडीचा थरारक खेळ अगदी सकाळपासून अनुभवत होते; तर गोविंदा आला रे आला, गोविंदा रे गोपाळा, शोर मच गया शोर, मच गया शोर सारी नगरी रे, ‘हमाल दे धमाल’मधील’ ढाक्कुमाकुम’सारखी लोकप्रिय गाणी सर्वत्र वाजत होती.या गाण्याच्या चालीवर तरुणाई जमिनीवर पाय रोवत ठेका देताना दिसत होती.गोकुळाष्टमीला उमरखाडीतून निघालेल्या पौराणिक शोभायात्रेचे गोविंदा प्रेमीनी,आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले.उमरखाडी येथील मनसेच्या दही हंडी सोहळ्यात शाखा अध्यक्ष  राजन दळवी,महिला शाखा अध्यक्ष आज्ञा भोसले, उषा पाटील, आशा पाटील, रुषाली लांडगे, राजेंद्र म्हात्रे, ललित ठाकूर, जी के वाघेला, रणछोड राठोड, संजय लांडगे यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.

वृक्षारोपणातून पालिका अधिकाऱ्यांनी दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश

दिनेश मराठे मुंबई : निसर्गाच्या संवर्धनासाठी संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हा सुप्रसिद्ध अभंग रचला. जवळपास पावणेचारशे वर्षे होऊनही या अभंगाचे महत्त्व आजही अबाधित आहे. सजीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यामुळे मुंबईतील, राज्यातील तसेच देशातील प्रत्येक नागरिकाने एक वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प पूर्ण केल्यास खऱ्या अर्थाने आपली वसुंधरा हरित होईल आणि भविष्यातील पिढीला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असा संदेश पालिकेच्या बी वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांनी दिला. मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त डोंगरी येथील सिताराम शेनॉय उद्यानात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता राकेश कुमार झा, सहाय्यक अभियंता रुपेश भडांगे, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश जोगदंड, सहाय्यक अभियंता अरुण वैद्य, डोंगरी पब्लिक स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर शालेय विद्यार्थी, पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डोंगरी, उमरखाडी आणि सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशन मार्गावर वृक्ष दिंडी काढून झाडे लावा, झाडे जगवा  पृथ्वी वाचवा असा संदेश दिला. ००००००

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेची दहीहंडी दणक्यात साजरी

५,५५,५०० रुपयांची बक्षिसे, अभिनेत्री सायली संजीव आणि महेंद्रशेठ यांच्या उपस्थितीने गोविंदा पथक सुखावले उलवे, ता. ६ :शेलघर येथील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे  दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, सचिव शुभांगीताई घरत यावेळी जातीने हजर होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री सायली संजीव यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. गोविंदा पथकांच्या उत्साहाला रिमझिम पावसाच्या सरींनी साथ दिली, त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला. थरांथर रचताना गोविंदा पथकांची चिकाटी आणि एकी दृष्ट लागण्याजोगी होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उरण, पनवेल आदी ठिकाणांहून सुमारे ६० गोविंदा पथकांनी सलामी दिली. कुणी चार थर, कुणी पाच, सहा, सात, आठ थरांपर्यंत मजल मारली. भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला, तर दहीहंडी उत्सवात महिलांच्या गोविंदा पथकांची सलामी वाखाणण्याजोगी होती. सोबत शिवमुद्रा डान्स अकॅडमी पपण पाटील यांच्या नृत्याचा आविष्कार होता. अनेक नृत्यांगणांनी गोविंदा पथकांना आणि रसिकांना खिळवून ठेवले. पहिला क्रमांक राघोबा देव गोविंदा पथक कोटनाका, उरण; द्वितीय क्रमांक जरीमरी आई गोविंदा पथक, पिरकोन आणि आम्ही तुर्भेकर गोविंदा पथक, तुर्भे यांनी तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली. यावेळी सायली संजीव म्हणाल्या, “सर्व गोविंदा पथकांचे अभिनंदन आणि कौतुक करते, गोविंदा पथकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. महेंद्रशेठ घरत यांच्यासारखे दिलदार नेतृत्व या परिसराला लाभले आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. शुभांगीताई आणि महेंद्रशेठ घरत हे अनोखे दाम्पत्य आहे. त्यांची सामाजिक बांधिलकी वाखाणण्याजोगी आहे. आईच्या नावाने संस्था सुरू करून सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण पेरण्याची त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे.” यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “यमुना सामाजिक संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. दहिहंडी हा त्याचाच भाग आहे, आपण संस्कृती जपण्यासाठी आणि टिकविण्यासाठी प्रयत्न करतोय; परंतु उत्सव साजरा करीत असताना कुणालाही दुखापत होऊ नये, याची काळजी घ्या. मी सदैव कलेला प्रोत्साहन देणारा आणि सन्मान करणारा आहे. कायमच सर्वसामान्यांच्या पाठीशी आहे.” यावर्षी दहीहंडीसाठी ५ लाख ५५ हजार ५०० रुपये रोख बक्षीस आणि चषक ठेवण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजता ढोल-ताशांच्या गजरात उत्सवाला सुरुवात झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उरण येथील प्रसिद्ध गोविंदा पथकांनी अवघ्या काही मिनिटांत पाच-सहा-सात-आठ लावले. विजेत्यांना ५,५५,५०० रुपयांची बक्षिसे देण्यात आली. दहीहंडी यशस्वी करण्यासाठी यमुना सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि एम. जी. ग्रुपच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. दरम्यान, शेलघर या गावात आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी स्वतः गावातील लहान-थोरांसोबत मिसळून दहिहंडीचा आनंद घेतला. शेलघरमधील विठ्ठल मंदिरापासून गोविंदा निघाला. परंपरागत गोविंदाचा महेंद्रशेठ घरत यांनी मनमुराद आनंद घेऊन गावातील दहिहंडी फोडली. त्यामुळे शेलघरचे ग्रामस्थही भारावून गेले. ०००००००

 सिंधुदुर्गातील सर्व १,५३९ अंगणवाड्यांमध्ये पाणी-शौचालय सुविधा १०० टक्के!

आठही तालुक्यातील आंगणवाड्यांची स्थिती समाधानकारक राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणवाडी केंद्रामध्ये मूलभूत सुविधांच्या बाबतीत समाधानकारक चित्र समोर आले आहे. महिला व बाल विकास विभागाने अलिकडेच केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सर्व १,५३९ कार्यान्वित अंगणवाडी केंद्रांमध्ये शौचालय तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. दोन्ही सुविधांचे प्रमाण तब्बल १०० टक्के आहे. जिल्ह्यात एकूण १,५३९  आंगणवाड्या मंजूर असून त्यापैकी सर्व १,५३९ अंगणवाड्या कार्यान्वित आहेत. या सर्व केंद्रांमध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सर्व अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणीही उपलब्ध असल्याचे या अहवालात  नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शौचालय किंवा पाण्याची सुविधा नसलेली एकही  आंगणवाडी जिल्ह्यात नाही ही जिल्ह्याच्या दृष्टीने आभिमानास्पद आणि कौतुकाची बाब आहे असे म्हणावे लागेल. तालुकानिहाय विचार करता सावंतवाडी २४७, कणकवली २४४, मालवण २२८, वैभववाडी १४७, कुडाळ २६८, वेंगुर्ला ९७, देवगड २०७ आणि दोडामार्ग १०१  आंगणवाडी केंद्रे आहेत. या आठही तालुक्यांतील प्रत्येक  आंगणवाडीमध्ये शौचालय व पिण्याच्या पाण्याची सुविधा १०० टक्के उपलब्ध असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा नारकर  यांनी अलिकडेच दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील आंगणवाड्यांना भेटी दिल्या असून  पोषण आहाराची तपासणी तसेच  तेथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी व्यवस्थेची पाहणी करण्यात येत आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, महिला बालकल्याण अधिकारी प्रतीक उगारे हेही  अंगणवाड्यांना भेटी देऊन एकूण व्यवस्थेची पाहणी करत आहेत. तालुकानिहाय आकडेवारीत कुडाळ तालुका २६८ अंगणवाड्यांसह प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर सावंतवाडी (२४७), कणकवली (२४४), मालवण (२२८), देवगड (२०७), दोडामार्ग (१०१), वेंगुर्ला (९७) आणि वैभववाडी (१४७) अशी संख्या आहे. आंगणड्यांमध्ये येणाऱ्या बालकांसाठी आरोग्य, पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाबरोबरच स्वच्छता व सुरक्षित पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही सुविधांबाबत जिल्ह्याची आकडेवारी शंभर टक्के असल्याने सिंधुदुर्गच्या अंगणवाडी व्यवस्थेतील ही सकारात्मक बाब ठरली आहे. सिंधुदुर्गातील १,५३९ अंगणवाड्यात १०,७७२ बालके असून ६३ अंगणवाड्यांची पटसंख्या शून्य आहे. ६८१  आंगणवाड्यांमध्ये  पाचपेक्षा कमी मुले आहेत. जिल्ह्यातील आंगणवाड्यांच्या पटसंख्येची स्थिती पाहता अनेक  आंगणवाड्यांमध्ये अत्यल्प मुले  असल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल ६३  आंगणवाड्यांमध्ये एकही मूल  नाही, तर ६८१  आंगणवाड्यांमध्ये केवळ १ ते ५ मुले आहेत. जिल्ह्यात ४०१ आंगणवाड्यांची पटसंख्या ६ ते ९, तर ३३५  आंगणवाड्यांची पटसंख्या १० ते २० आहे. २० पेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या ५१, तर ३० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या आठ अंगणवाड्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अत्यल्प पटसंख्या, तर काही  आंगणवाड्यांमध्ये तुलनेने अधिक पटसंख्या असे चित्र दिसून येते. तालुकानिहाय विचार करता कुडाळमध्ये सर्वाधिक २६८ आंगणवाड्या असून तेथे २,१७८ मुले आहेत. सावंतवाडी तालुक्यात  २४७  आंगणवाड्या व १,८१८ मुले, कणकवलीत २४४  आंगणवाड्या व १,९०९ मुले , तर देवगडमध्ये २०७  आंगणवाड्या व १,५२० मुले  आहेत. मालवणमध्ये २२८  आंगणवाड्या असून ९९७ मुले आहेत. चौकट आंगणवाडीत ‘हिरकणी’ कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या ओरोस  देऊळवाडा इथल्या  आंगणवाडीत तर गर्भवती मातांसाठी ‘हिरकणी ‘कक्ष आहे.या कक्षाला बरीच वर्ष झाली असून असा कक्ष असलेली ही जिह्यातील पहिलीच  आंगणवाडी. ००००

 द्वारका येथील अतिक्रमित जागा महापालिका ताब्यात घेणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ६० दुकानदारांना नोटिसा हरिभाऊ लाखे नाशिक : द्वारका चौकातील महापालिकेच्या मालकीच्या चार एकर जागेवरील अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. संबंधित जागेचा ताबा सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने कायम ठेवत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जागा रिकामी करण्याचे निर्देश दिल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईला वेग दिला आहे. त्यानुसार नाशिक पूर्व विभागाने ६० दुकानदारांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. द्वारका चौकातील सर्व्हे क्रमांक ४८९ मधील फायनल प्लॉट क्रमांक २८२ ही सुमारे चार एकर जागा महापालिकेच्या मालकीची आहे. नाशिक नगरपालिका अस्तित्वात असताना १९७३ पासून ही जागा भाडेतत्त्वावर दुकानदारांना दिली होती. सद्यःस्थितीत या जागेवर १०९ दुकानदार व्यवसाय करीत आहेत. रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असल्यामुळे महापालिकेने २०१५ मध्ये संबंधित दुकानदारांना नोटिसा बजाविल्या होत्या. त्यानंतर दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्तांनी संबंधित दुकाने अनधिकृत ठरवित १५ दिवसांमध्ये जागा रिकामी करण्याचे महानगरपालिका आदेश दिले होते. या कारवाईविरोधात दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायालयाने दि. ५ जानेवारी २०२३ रोजी महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ४० दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महापालिकेने अतिक्रमण हटविताना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने दुकानदारांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये दाखल या अपिलात महापालिकेची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. तुषार मेहता यांनी मांडली. सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जागा रिकामी करण्याचे निर्देश दिल्यामुळे महापालिकेने त्यानुसार नोटिसांची कार्यवाही सुरू केली आहे. द्वारका सर्कल परिसरात मोठी लोकवस्ती, व्यावसायिक आस्थापना आणि सातत्याने मोठी वाहतूक असते. या परिसरात बँका, रुग्णालये, शाळा, व्यावसायिक संकुले आणि हॉटेल्स आहेत. नाशिक – पुणे मार्ग तसेच मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा चौक असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या निर्माण होत असल्याचे नोटिसांमध्ये नमूद केले आहे. दुकानदारांना थेट जागा रिकामी करण्याचे निर्देश देतानाच त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. २१ ते २३ सप्टेंबर २०२६ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित दुकानदारांचे म्हणणे ऐकून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. द्वारका सर्कल परिसरात मोठी लोकवस्ती, व्यावसायिक आस्थापना आणि सातत्याने मोठी वाहतूक असते. या परिसरात बँका, रुग्णालये, शाळा, व्यावसायिक संकुले आणि हॉटेल्स आहेत. नाशिक – पुणे मार्ग तसेच मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा चौक असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या निर्माण होत असल्याचे नोटिसांमध्ये नमूद केले आहे ००००

 तुकड्यातील जमिनींचा गुंता सुटणार!

१५ ऑक्टोबर २०२४पर्यंतचे व्यवहार अटींसह नियमित – फेरफार नोंदींचाही मार्ग मोकळा-जमीनधारकांना मोठा दिलासा अशोक गायकवाड अलिबाग :  तुकडेबंदी कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या हजारो जमीन धारकांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १५ ऑक्टोबर २०२४पर्यंत प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींचे झालेले पात्र व्यवहार आता ठरावीक अटींची पूर्तता करून नियमित करता येणार आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे कागदोपत्री व्यवहार करूनही महसूल अभिलेखात नाव न लागलेल्या जमीनधारकांच्या मालकी हक्काचा मार्ग मोकळा होणार आहे. याबाबतची माहिती अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली. तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि तुकड्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतच्या कायद्यातील तरतुदींमुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीचे हस्तांतरण अथवा विभाजन झालेले व्यवहार अडचणीत आले होते. दस्तऐवज हातात असतानाही फेरफार नोंदी रखडल्याने जमीन धारकांना मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता अशा व्यवहारांना विहित प्रक्रियेत आणण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नोंदणी बंद झाल्यानंतर गरजेपोटी अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या आधारे झालेले व्यवहारही आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून कायदेशीर प्रक्रियेत आणता येणार आहेत. संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महसूल अभिलेखात फेरफार नोंद करण्याचा मार्ग खुला होईल. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, एमएमआरडीए तसेच अन्य महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील जमिनींसह विशेष नियोजन प्राधिकरणांच्या क्षेत्रातील आणि प्रादेशिक योजनेत निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा अन्य अनुज्ञेय वापरासाठी निश्चित जमिनींनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. तुकड्याच्या नोंदणीकृत दस्ताच्या आधारे फेरफार मंजूर झाला; मात्र खरेदीदाराचे नाव चुकीच्या हक्कात किंवा ‘इतर हक्क’ सदरी नोंदले गेले असेल, तर ३ नोव्हेंबर २०२५च्या अध्यादेशातील सुधारणांनुसार आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. १५ ऑक्टोबर २०२४पर्यंत झालेले पात्र व्यवहार ग्राम महसूल व मंडळ अधिकाऱ्यांनी संकलित करून नोंदणी विभागाकडे पाठवायचे आहेत. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेरफार नोंद ऑनलाइन पद्धतीने पुढे नेण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, हक्क अभिलेखात खरेदीदाराचे नाव नोंदवल्यानंतर त्या जमिनीच्या पुढील हस्तांतरणावर कोणताही प्रतिबंध राहणार नाही. त्यामुळे तुकडेबंदीच्या गुंत्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कुडाळ एमआयडीसीतील भूखंडावरून ग्रामस्थ आक्रमक

उद्योगासाठी घेतलेली जमीन मंगल कार्यालय, मंदिरासाठी देण्यास विरोध; भूखंड वाटपाच्या चौकशीची मागणी कुडाळ : कुडाळ एमआयडीसीतील उद्योगांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर मंगल कार्यालय आणि रामदेव बाबा मंदिर उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप…

हनुमान क्रीडा मंडळ कुर्लाचे पहिले आठ थर

मुंबई: कुर्ला येथील  हनुमान क्रीडा मंडळ यांनी राहुल शेवाळे यांच्या राधा फाउंडेशन चेंबूर येथे आठ थर लावून सलामी दिली.  हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला तील नावाजलेले मंडळ असून १९६५ पासून दहीहंडी उत्सव जोशात…

भाजपा नगरसेवक डॉ. नितेश राजहंस सिंह यांच्या दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई  : उत्तर-मध्य मुंबईतील कालिना विधानसभा मतदारसंघात भाजपा नगरसेवक डॉ. नितेश राजहंस सिंह यांच्या वतीने वाकोल्यातील हनुमान मंदिर परिसरात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यास गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

वरळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडली नाशमुक्तीची दहीहंडी

केतन खेडेकर दहीहंडी म्हणजे केवळ उत्सव नाही, तर उत्साह, एकजूट आणि सामूहिक प्रयत्नांची ऊर्जा अनुभवण्याचा क्षण आहे. याच उत्साहात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत वरळी येथील जांबोरी मैदानावर भाजपा मुंबईचे पदाधिकारी अॅड. संतोष पांडे यांच्या पुढाकाराने आयोजित ‘परिवर्तन दहीहंडी उत्सव २०२६’ मध्ये नाशमुक्तीची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. उंचच उंच मानवी मनोरे रचताना दिसणारी त्यांची जिद्द, मेहनत आणि एकजूट खरोखरच प्रेरणादायी आहे. याप्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर , सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.