दिनेश मराठे
मुंबई : निसर्गाच्या संवर्धनासाठी संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हा सुप्रसिद्ध अभंग रचला. जवळपास पावणेचारशे वर्षे होऊनही या अभंगाचे महत्त्व आजही अबाधित आहे. सजीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यामुळे मुंबईतील, राज्यातील तसेच देशातील प्रत्येक नागरिकाने एक वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प पूर्ण केल्यास खऱ्या अर्थाने आपली वसुंधरा हरित होईल आणि भविष्यातील पिढीला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असा संदेश पालिकेच्या बी वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांनी दिला. मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त डोंगरी येथील सिताराम शेनॉय उद्यानात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कार्यकारी अभियंता राकेश कुमार झा, सहाय्यक अभियंता रुपेश भडांगे, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश जोगदंड, सहाय्यक अभियंता अरुण वैद्य, डोंगरी पब्लिक स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर शालेय विद्यार्थी, पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डोंगरी, उमरखाडी आणि सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशन मार्गावर वृक्ष दिंडी काढून झाडे लावा, झाडे जगवा  पृथ्वी वाचवा असा संदेश दिला.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *