Category: रायगड

raigad news and updates

खुटल (बा) मध्ये घरकुल घोटाळा!

पक्क्या घरवाल्यांना लाभ, बेघर गरिबांना डावलले राजीव चंदने मुरबाड :  तालुक्यातील खुटल (बा) ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल योजनेसाठी एकूण ३२५ लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेत तयार करण्यात आली आहे. मात्र या यादीवर गावातील ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की, ज्यांच्याकडे आधीच पक्के स्लॅबची घरे आहेत अशा सुस्थितीतील व्यक्तींची नावे घरकुलाच्या यादीत घेण्यात आली आहेत. तर ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, जे पत्र्याच्या झोपडीत राहतात आणि ज्यांना खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे अशा गरीब कुटुंबांची नावेच सर्वेक्षण यादीत घेतली गेली नाहीत. घरकुलासाठी करण्यात आलेले सर्वेक्षण हे सरपंच, उपसरपंच, सदस्य, संगणक ऑपरेटर आणि रोजगार सेवक यांनी आपल्या नातेवाईकांना आणि मर्जीतील लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या बोगस कारभाराविरोधात ग्रामस्थांनी १८ ऑगस्टला झालेल्या बोगस ग्रामसभेबाबत भूमिपुत्र एल्गार संघटनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव यांची भेट घेऊन झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर भूमिपुत्र एल्गार संघटनेने तात्काळ ग्रामपंचायतीच्या विरोधात पंचायत समिती मुरबाड येथे धरणे आंदोलन करण्याचे आयोजन केले. या आंदोलनात संघटनेने प्रशासनाकडे मागणी केली की, गटविकास अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन फेर स्थळ पाहणी करून यादीची तपासणी करावी. यादीतील प्रत्येक लाभार्थ्याच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून पक्के घर असलेल्या अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळावीत आणि घर नसलेल्या खऱ्या गरजू कुटुंबांची नव्याने पाहणी करून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा. या धरणे आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौरे आणि किसळ ग्रामपंचायत सरपंच कॉ. कविता वरे यांनी जाहीर पाठिंबा दिला. या वेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव, तालुका अध्यक्ष जगदीश शिद, उपाध्यक्ष बुधाजी खंडागळे, तालुका प्रवक्ता बाळा दळवी, उपाध्यक्ष हरिश्चंद्र पादीर, कैलास खंडागळे, मारुती वाघ, सुरेश मोढवे, तानाजी भला, कांताराम पोकळा, पंढरीनाथ दळवी इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००००००

ई20 पेट्रोलमध्ये 500 ppm क्लोराइड आणि आर्द्रतेच्या उपस्थितीचे दावे पडताळणीत सिद्ध झाले नाहीत

ई20 पेट्रोलमध्ये आर्द्रता (Moisture) आणि क्लोराइडच्या उपस्थितीची तेल विपणन कंपन्यांकडून (OMCs) तपासणी ई20 पेट्रोलमध्ये 500 ppm क्लोराइड आणि आर्द्रतेच्या उपस्थितीचे दावे पडताळणीत सिद्ध झाले नाहीत नवी दिल्ली : अलीकडेच ईबीएमएस…

अन्नसुरक्षेसाठी कृषी संशोधन आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना देणे काळाची गरज – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे संशोधन प्रकल्पांची पाहणी विद्यार्थी, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी साधला संवाद अशोक गायकवाड रायगड- कर्जत :देशाची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर आधारित असून देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीला शेतीशी जोडणे ही काळाची गरज असून राज्यातील शहरी भागातील प्रत्येक शाळेने वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आयोजित शास्त्रज्ञ, शेतकरी व विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे तसेच डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशीद, कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी.डी.वाघमोडे, मालाडच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विजय लेले, मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कार्याध्यक्ष स्वप्नील सावरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासमोर अन्नसुरक्षेचे मोठे आव्हान होते. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आज भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला असून इतर देशांनाही अन्नधान्य पुरवणारा देश म्हणून ओळख निर्माण केली आहे. हे यश केवळ शेतकऱ्यांच्या कष्टामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की,मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेचे विशेष कौतुक करीत संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली कृषी अभ्यास सहल हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पुस्तके, संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञान मिळत असले तरी प्रत्यक्ष अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन शेती, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहिल्यास त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध होते. राज्यातील सर्व शहरी भागातील शाळांनी वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून सन २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील शेतकरी संपन्न, सक्षम आणि समाधानी असणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना सर्वतोपरी मदत करणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत अथक परिश्रमाने देशाला अन्न सुरक्षित ठेवत आहेत. त्यांच्या हितासाठी कृषी संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनाचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून विद्यापीठाच्या विकासासाठी कोणत्याही बाबतीत कमतरता भासू दिली जाणार नाही. विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसमवेत भात लागवड दौऱ्यादरम्यान विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष शेतात भात लागवडीत सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शेतीविषयी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याचे महत्त्व विशद केले, तर शेतकऱ्यांशी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि शाश्वत शेतीबाबत चर्चा करत कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रत्यक्ष शेतातील अनुभव यांची सांगड घालणे,ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. तसेच भात जलद पैदास (स्पीड ब्रीडिंग) केंद्राची पाहणी करून आधुनिक संशोधन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाला त्यांनी भेट दिली.     यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून ऍड.अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने यांनी केले. कार्यक्रमास प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ, विद्यापीठाचे उपसंचालक( बियाणे ) डॉ. अरुण माने, मंडळ अधिकारी चिचवली श्रीमती वैशाली पाटील, ग्राम महसूल अधिकारी आकाश काळे, भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, भाजपचे उत्तर रायगड इंजिनियर सेल अध्यक्ष मंदार मेहंदळे यांच्यासह प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कर्जमाफीसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य!

ॲग्री स्टॅक वर तात्काळ नोंदणी करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सिंधुदुर्ग : कर्जमाफीसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य असून त्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘फार्मर आयडी’ नसलेले१२०७ शेतकरी असून त्यांनी तातडीने ‘ॲग्रीस्टॅक ‘वर नोंदणी करून ‘फार्मर आयडी’ प्राप्त करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ नाही त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आवाहन  केले आहे. कर्जमुक्ती योजनेच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे जिल्हा सुकटे जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक प्रदीप मालगावे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण ६५०० कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे त्यापैकी शासनाकडून आतापर्यंत ३७०८ आधार प्रमाणीकरणासाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यापैकी २१४५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर १५६३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे यामध्ये १२०७ शेतकऱ्यांकडे ॲग्री स्टॅक/फार्मर आयडी नसल्याने त्यांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया रखडलेली आहे अशी माहिती  जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आधार प्रमाणे करण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या ३७०८ शेतकऱ्यांचे याद्या संबंधित विकास सेवा संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय तसेच राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत जिल्हा उपनिबंधक तसेच तालुका सहाय्यक निबंधक या कार्यालयांमध्ये याद्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेत १एप्रिल २०१९ ते ३१,मार्च,२०२५ या कालावधीत वाटप केलेले अल्पमुदत पीक कर्ज, ३० सप्टेंबर,२०२५ रोजी थकीत आणि ३१,मार्च,२०२६ अखेर परतफेड न झाले असल्यास मुद्दल व व्याजासह अधिकतम दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे थकीत कर्जाची रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास अतिरिक्त रक्कम संबंधित बँक किंवा संस्थेला परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता ओटीएस अंतर्गत २ लाख रुपये पर्यंत चा लाभ मिळणार आहे तसेच २०२२-२३,२०२३ -२४ आणि २०२४ -२५ यातील आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिली. ००००००००

 डॉ. विनय सांगळे यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुवर्ण कामगिरी

मलेशियातील हॉस्पेक्स मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईला विजेतेपद अशोक गायकवाड रायगड- कर्जत : कर्जतचे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विनय सांगळे यांनी मलेशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या हॉस्पेक्स आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करत शानदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कर्जतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कतार, बांगलादेश, मलेशिया तसेच भारतातील मुंबई, दिल्ली, केरळ आणि गोवा येथील नामांकित मेडिकल क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाने गोवा संघाचा पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयात डॉ. सांगळे यांचे योगदान मोलाचे ठरले. गेली १८ वर्षे कर्जतमधील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करणारे डॉ. विनय सांगळे यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच क्रिकेटची आवडही सातत्याने जोपासली आहे. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. सांगळे यांनी यापूर्वी दुबई, श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धांबरोबरच पाँडिचेरी, बेंगळुरू, विशाखापट्टणम, चेन्नई, गोवा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, संभाजीनगर, हैदराबाद आणि नाशिक येथे झालेल्या अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सहा वेळा ‘राष्ट्रीय सर्वोत्तम गोलंदाज’ पुरस्कार डॉ. विनय सांगळे यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे त्यांनी तब्बल सहा वेळा ‘बेस्ट बॉलर’ (सर्वोत्तम गोलंदाज) हा राष्ट्रीय किताब पटकावला आहे. उदयपूर, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि नवी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी हा मान मिळवला असून, ही कामगिरी करणारे ते मेडिकल क्रिकेटमधील मोजक्या आणि अव्वल गोलंदाजांपैकी एक मानले जातात. ५६० विकेट्सचा विक्रम ‘डावखुरा जादुई फिरकी गोलंदाज’ अशी ओळख असलेल्या डॉ. सांगळे यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धांमध्ये आतापर्यंत ५६० हून अधिक विकेट्स घेत फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकविण्याचा उल्लेखनीय पराक्रम केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी गोलंदाजीमुळे ते मेडिकल क्रिकेट क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि धडाकेबाज खेळाडू म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी सांभाळत क्रिकेटसारख्या स्पर्धात्मक खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या डॉ. विनय सांगळे यांनी कर्जतचे नाव देश-विदेशात उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्र, क्रीडाविश्व तसेच कर्जत तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

 ‘लँड टायटलिंग’ कायदा अंमलात आणून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविणार- चंद्रशेखर बावनकुळे

१५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवर  बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार…! कणकवली(प्रतिनिधी )–सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक पद्धतीने  ‘ड्रोन सर्वेक्षण’ करून प्रत्येक मालमत्तेला ‘प्रॉपर्टी कार्ड ‘देण्याची योजना राबविण्यात येणार.त्यासाठी दोनशे सर्व्हेअर्सना परवाने  देऊन हंगामी स्वरूपाची नियुक्ती करण्यात येणार आहे. भविष्यात लँड टायटलिंग कायदा  लागू करून शासनमान्य  मालकी हक्काचे कार्ड देण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच नोंदणीपूर्वी मोजणी आणि त्यानंतर फेरफार करण्याची नवी व्यवस्था कायद्याद्वारे लागू केली जाईल अशा घोषणा राज्याचे  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या. राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत ‘आयोजित महसूल समाधान शिबिराच्या निमित्ताने आटोजीत करण्यात आलेल्या समारंभात बावनकुळे बोलत होते. ३१ मार्च २०२७ पर्यंत जिल्ह्यातील सर्व शेत रस्त्यांचे सीमांकन, मोजणी, अतिक्रमण हटवून क्रमांक देण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महसूल समाधान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे बावनकुळे म्हणाले. या शिबिरात प्राप्त झालेल्या नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. १ जानेवारी २०११ पूर्वीच्या सरकारी जागांवरील घरांचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना पट्टे देण्यात येणार असून, १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील ले-आउट मध्ये बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी  जाहीर केला. सिंधुदुर्गचे  पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करताना, जिल्ह्याची बदनामी करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. आवश्यक तेथे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, मात्र प्रामाणिक नागरिक व शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणारे मंत्री म्हणजे बावनकुळे अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक केले. बावनकुळे यांच्या कार्यशैलीतून आम्ही शिकतो, तरुण मंत्र्यांसाठी ते आदर्श आहेत असे गौरवोदगार राणे यांनी काढले. बावनकुळे यांनी आपल्या भाषणात राणे  बंधूंचे तोंड भरून कौतुक केले. मत्स्य व्यवसाय आणि बंदर खात्याचे मंत्री म्हणून नितेश राणे हे अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत शिवाय हे खातं ते प्रभावीपणे सांभाळत आहेत अशा शब्दात त्यांनी नितेश राणे यांचा गौरव केला. आमदार निलेश राणे यांच्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, विधानसभेत ते महसूल विभागाशी संबंधित विषय अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीने आणि जनहिताची भूमिका घेऊन मांडत आहेत. त्यांनी सिंधुदुर्गच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर निर्णय घेण्याचे मी वचन देतो, असे त्यांनी यावेळी  स्पष्ट केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्या कार्याचाही गौरव करत, महसूल मंत्री म्हणून नारायण राणे यांनी घेतलेल्या अनेक दूरदृष्टीच्या निर्णयांचा पाया आजही भक्कम आहे. त्या निर्णयांना पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. कोकण दौऱ्यावर येण्यापूर्वी मी त्यांचा आशीर्वाद घेतला, असेही त्यांनी सांगितले. कोकणात झालेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणांची महसूल विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणांच्या चौकशीसाठी २० अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे ही समिती मागील दहा वर्षांच्या कागदपत्रांची चौकशी करणार आहे. या तपासात य चौकशीत जे कोणी अधिकारी कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री बावनकुळे यांनी काल रत्नागिरी येथे बोलताना केले शेतकऱ्यांना कर्ज देणे ही बँक आणि महसूल विभागाची जबाबदारी आहे. कोकणात सातबारावर अनेक नावे असतात.परंतु कर्ज देताना संमती पत्र मिळणं अवघड होऊन जातं त्यामुळे बँका कर्ज देत नाहीत तेव्हा हमीपत्रावर कर्ज देण्याबाबत शासन विचार करीत असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुळे येथे पाणंद रस्त्याची केली पाहणी

रायगड-अलिबाग : (अशोक गायकवाड ) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुळे या गावातील मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची पाहणी केली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद कृषी सभापती वैकुंठ पाटील, सदस्या मानसी दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील आदी उपस्थित होते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वर्षभर शेतापर्यंत सहज पोहोचता येणार असून, शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देत शेतकऱ्यांच्या विकासाला गती देणारी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक सूचनाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सरकारच्या विविध विकासकामांचा वेग वाढवून जिल्ह्यातील जनतेला अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही ते शेवटी म्हणाले. ००००००००

राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत रायगडला विजेतेपद

पनवेल : नुकत्याच छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रायगडने विजेते पदाचा मान मिळवला. रायगडने या स्पर्धेत ४४ सुवर्ण, २१ रौप्य, ८ कांस्य अशी एकूण…

कर्जतची वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न

भरत गोगावले यांच्या हस्ते नवीन पुलाचे उद्घाटन अशोक गायकवाड राजगड—कर्जत :  कर्जत शहरात उल्हास नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे हस्ते शनिवारी करण्यात आले. त्यावेळी गोगावले यांनी कर्जत शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न झाले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या दूरदृष्टीचे आणि कार्यपद्धतीचे कौतुक भरत गोगावले यांनी केले. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवरील नवीन ‘श्रीराम पुलाचा’ लोकार्पण सोहळा कर्जत येथे झाले. कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आला असून आजपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर,भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे,तसेच भाजपचे राजेश भगत,शरद लाड,जिल्हा उप प्रमुख भाई गायकर, विजय पाटील, शिवराम बदे, यांच्या सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, उपविभागीय अभियंता राहुल देवांग आदी प्रमुख उपस्थित होते. पुलामुळे आता अवजड वाहनांची कोंडी फुटणार असून कर्जत शहर व तालुक्याच्या विकासाला नवी गती प्राप्त होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल व सार्वजनिक बांधकाम उपविभाग कर्जत यांच्या वतीने करण्यात आले होते. पुलाचे लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या शुभहस्ते आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा पूल इंग्रजकालीन आणि जुना झाल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला व वाहनांच्या संख्येला अपुरा पडत होता. शहरात जाण्यासाठी हाच मुख्य मार्ग असल्याने येथे दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असे. पावसाळ्यात तर पर्यटकांची गर्दी वाढल्याने तासनतास वाहनांच्या रांगा लागत असत. हीच कोंडी आणि स्थानिक वाहनचालक यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी या नवीन पुलासाठी अथक परिश्रम घेतले. पावसामुळे पुलाचे अंतिम रंगकाम आणि विद्युत दिव्यांचे काम काहीसे लांबणीवर पडले होते. मात्र पुलाच्या सौंदर्यापेक्षा पावसाळ्यात नागरिकांची होणारी गैरसोय दूर करणे आणि त्यांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे असे थेट आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले आणि काम युद्धपातळीवर पूर्ण करून लोकार्पण निश्चित केले. ००००००००

 किरवली गावातून अवैध डबर वाहतूक रिपाईचे तहसीलदारांना निवेदन !

रिपाइं अध्यक्ष हिरामण गायकवाड यांचा आमरण उपोषणाचा इशारा ! अशोक गायकवाड रायगड-कर्जत : कर्जत तालुक्यातील किरवली गावातून अवजड वाहनांद्वारे सुरू असलेल्या कथित अनधिकृत डबर व खडी वाहतुकीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण रघुनाथ गायकवाड यांनी कर्जत महसूल उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, रेल्वे बोगद्याच्या कामादरम्यान ठेकेदारांनी किरवली परिसरातील काही जागा भाडेतत्त्वावर घेऊन बोगद्यातून निघालेला डबर साठवून ठेवला होता. संबंधित ठेकेदार व जागामालक यांच्यातील करार संपुष्टात आल्याचे सांगितले जात असतानाही गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात डबराची वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिरामण गायकवाड यांनी सांगितले की, या संदर्भात किरवली सजाचे तलाठी व सर्कल अधिकाऱ्यांना अनेक वेळा दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गावातील रस्त्यांवरून ४ ते ८ ब्रास क्षमतेचे डंपर दिवस-रात्र धावत असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच मार्गालगत जिल्हा परिषद शाळा तसेच बौद्ध वस्ती असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या अवजड वाहनांमुळे गावातील नुकत्याच तयार झालेल्या रस्त्यांचे नुकसान होत असून, वाहतूक आणि ध्वनीप्रदूषणामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित वाहनांकडून आवश्यक महसूल भरला जात नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये असल्याचेही गायकवाड यांनी म्हटले आहे. कर्जत महसूल उपविभागीय अधिकारी व तहसीलदार प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांकडून नियमानुसार महसूल वसूल करावा, अनधिकृत वाहतूक आढळल्यास संबंधित डंपर मालकांवर कायदेशीर कारवाई करावी आणि गावातील रस्त्यावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना न झाल्यास संविधानिक मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशाराही हिरामण गायकवाड यांनी प्रशासनाला दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी रायगड, प्रांताधिकारी कर्जत, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), बांधकाम विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.