Category: रायगड

raigad news and updates

रायगड जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी

रायगड जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश अलिबाग : (अशोक गायकवाड )—समाजमाध्यमावर पेट्रोल-डिझेल विक्रीमध्ये तुटवडा निर्माण होणार असल्याची प्रसारीत झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थाच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य:स्थितीचा विचार करून पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदी विचारात घेता पेट्रोल किंवा डिझेल खुल्या प्लॉस्टिक बाटली किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये पेट्रोल पंपावरून भरून देणे, विकणे नियमांविरुद्ध आणि बेकायदेशीर असल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक,मालक यांनी पेट्रोल, डिझेल हे केवळ वाहनाच्या इंधन टाकीतच वितरित करावे. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल, डिझेल खुले (कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांडयात) विक्री पुरवठा करू नये. पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी व विक्री नोंदी नियमित ठेवाव्यात. अनाधिकृतपणे पेट्रोल व डिझेलचा साठा करणाऱ्या व्यक्तीविरुध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू राहील व पुढील आदेश होईपर्यंत प्रभावी असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती/संस्थेविरुद्ध पेट्रालियम नियम २००२ मधील नियम ११८ ते २०२ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ मधील तरतुदिनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. हा आदेश सार्वजनिक हिताच्या दृष्टीने जारी करण्यात येत आहे.

अनुकंपा : उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द

अनुकंपा : उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची माहिती अलिबाग : (अशोक गायकवाड )—जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या एकत्रित गट-क संवर्गातील सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी (विवरणपत्र-अ) व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरील गट ड संवर्गाची अनुकंपा प्रतिक्षा सुचीतील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी (विवरणपत्र व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयात व जिल्हा संकेतस्थळ (www.raigad.gov.in) यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादीतील नाव व क्रमांकाबाबत उमेदवारांची कोणतीही हरकत/आक्षेप असल्यास, उमेदवारांनी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत आपले हरकत अर्ज १५ एप्रिल२०२६ पर्यत या कार्यालयाकडे सादर करावेत. १५ एप्रिल२०२६ नंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कळविले आहे.

येथे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत आढावा बैठक

येथे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत आढावा बैठक उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेतला आढावा अशोक गायकवाड रायगड-कर्जत : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील ९ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, पुढील टप्प्यात महाराष्ट्रातही हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत येथे कृषी संशोधन केंद्रात मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार धनंजय जाधव, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कोटुंबे यांच्या उपस्थितीत मंगळवारी आढावा बैठक पार पडली. बैठकीस ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), मंडळ अधिकारी, मतदान केंद्र अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते. यावेळी विविध पूर्वतयारी कामांचा सविस्तर आढावा घेण्यात येऊन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. मतदान केंद्र अधिकारी ऐप द्वारे मॅपिंग पूर्ण करणे तसेच प्रोजेनी मॅपिंग तत्काळ पूर्ण कराव्या, ८५ वर्षांवरील मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणे, मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ भरून घेणे, मृत्यू दाखला उपलब्ध नसल्यास जबाब, पंचनामा व कुटुंबीयांची स्वाक्षरी घेऊन कार्यवाही करणे, अस्पष्ट / ब्लॅक अँड व्हाईट फोटो असलेल्या मतदारांचे रंगीत फोटो घेऊन फॉर्म क्रमांक ८ भरून घेणे, मॅपिंग कार्यवाहीबाबत मॅपिंगची प्रक्रिया तीन टप्प्यांत राबविण्याचे निर्देश टेबल टॉप एक्टिविटी द्वारे २००२ व २०२४ मतदार याद्यांचे जुळवणी (मॅपिंग) करणे, जुळवणी न झाल्यास प्रोजनी मॅपिंग(आई-वडील/आजी-आजोबा यांच्या आधारे) करणे, उर्वरित अद्याप सर्वेक्षण झालेले नाही अशा मतदारांसाठी घरभेट देऊन माहिती संकलन करणे, मॅपिंगनंतरची माहिती बूथ लेवल अधिकारी ऍप वर ऑनलाइन अपलोड करणे, राज्यातील ऑनलाइन मॅपिंग फक्त २१% पूर्ण असल्याने गती वाढविण्याचे निर्देश (मोजणी/ गणना फॉर्म) छपाई डेटा उपलब्ध झाल्यानंतर २ दिवसांत डाउनलोड व ३ दिवसांत छपाई पूर्ण करणे, छपाईसाठी जिल्हास्तरावर अभिकर्ता नियुक्ती तातडीने करणे, टप्प्याटप्प्याने (उदा. २०० फॉर्म) छपाई करून वितरण करणे, इंटरनेट वेग लक्षात घेऊन रात्रीच्या वेळेस डाउनलोड करण्याचे नियोजन, DSE पडताळणी भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरील DSE Generation नंतर पडताळणी व वगळणी तातडीने पूर्ण करणे मतदान केंद्र अधिकारी व पर्यवेक्षक बाबत प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्र मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करणे, मतदान केंद्र अधिकारी अधिकारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देणे, BLO Call Book सुविधा वापरून नागरिकांच्या कॉलला त्वरित प्रतिसाद देणे, प्रशासकीय व्यवस्था कामाचा ताण कमी करण्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटर्स नियुक्त करण्याची तयारी करणे , मतदान केंद्र अधिकारी पर्यवेक्षक मार्फत फॉर्म संकलन व नोंद प्रक्रिया करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करून लोकसहभाग वाढविण्याचे आवाहनकरणे, विशेष सूचना अस्पष्ट व मानवी नसलेल्या छायाचित्रांची पडताळणी तातडीने पूर्ण करणे प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करून विशेष सखोल पुनरिक्षणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करून मतदार यादी शुद्ध, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी प्राधान्याने कार्य करावे, असे आवाहन केले.

गोरेगावमध्ये श्रीराम नवमीची मिरवणूक ! 

गोरेगावमध्ये श्रीराम नवमीची मिरवणूक ! शहरातील असंख्य भाविकांनी केली अलोट गर्दी मुकुंद रांजणे माथेरान: २७ मार्चला, गोरेगांव येथे बजरंग दल गोरेगांव लोणेरे विभाग आणि श्रीराम नवमी उत्सव समितीचे वतीने श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. श्रीरामांच्या जयंतीनिमित्त गोरेगांव नागरीत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात महिलांची संख्या अधिक होती. श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचे चरणस्पर्श करण्यासाठी, त्यांची आरती करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. पहिल्यांदाच दलित वस्तीतून, अर्थात संत रोहिदास महाराज नगर येथून अखंड शहराची श्रीराम नवमी उत्सव मिरवणूक काढण्यात आली. संत रोहिदास नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे काम गेले १३ वर्षे, काही कारणास्तव प्रलंबित होते. असंख्य प्रयत्न करून सुद्धा मंदिराचे काम बरेच वर्षे रखडले होते. परंतू, या वर्षी योगायोगाने श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठापनाचे कार्यक्रम आणि श्रीराम नवमी उत्सव एका पाठोपाठ आल्याने, संत रोहिदास नगरातील जनतेने, श्रीराम नवमी समितीला मिरवणुकीचे प्रारंभ आमच्या मंदिरातून व्हावे अशी विनंती केली. समितीने यावर सभा आयोजित करून संगनमताने होकार देत हा ऐतिहासिक निर्णय घेतला व हे हिंदू एकात्मतेचे सर्वोत्तम उदाहरण कायम केले. आदित्य रमेश गोरेगांवकर (बजरंग दल रायगड जिल्हा संयोजक ), दिनेश हरवंडकर ( रा. जि. प. सदस्य ), हरेश शेठ (भा.ज.पा. वरीष्ठ नेते), युवराज मुंढे (भा.ज.पा. माणगांव ता. प्र.), जहेंद्र मुंढे (ता. सरचिटणीस भा.ज.पा), शैलेश महाडिक (विभाग प्र. शिवसेना) राजीव परांजपे, महावीर जैन, गौतम जैन, साई मळेकर, चिंतन गोरेगांवकर, अमोल गोरेगांवकर, राज भाटिया, अक्षय गांधी, राहुल पालीवाल, विवेक भाटिया, दीपक पालीवाल, दीपक भाटिया, दीप शेठ, साहिल चिंनके, दिनेश चव्हाण, अक्षय यादव, ओम गोरेगांवकर, आराध्य आंबेतकर, पियुष पहेलकर, गौरव घोसाळकर, रणजित कनोजिया, जयेश खामगांवकर, जय दोशी, आकाश वाठोरे यांनी या उत्सवासाठी अहोरात्र श्रम केले असून भव्य मिरवणूकीने संपूर्ण गोरेगांव शहर राममय झाले. बजरंग दल कार्यकर्ते “अयोध्या में जन्मे दशरथ के ललनवा…मेरी रामजी की सेना चली…एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए…भैरोबा तू है भैरवनाथ, उतारे तेरी आरती..हम” अश्या भक्तीगीतांमध्ये तल्लीन झाले. संपूर्ण अयोध्यानगरी गोरेगांव शहरात उतरल्याचा भास होत होते. रथ, श्रीरामांची भव्य मूर्ती, खालू बाजा, भगवे ध्वज, अश्या पारंपरिक पद्धतीत प्रभू श्रीरामाची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. रणरागिणी लेझीम पथक महाड, यांनी पारंपरिक नृत्यकला दाखवत संपूर्ण गोरेगांव वासीयांचे मने जिंकले व ताराराणी ढोल-ताशा पथक मुरुड, यांनी पुणेरी ढोल गरजनेतून समस्त शहर हादरवले. स्त्री-पुरुषांनी घराबाहेर पडून आपल्या आराध्य श्रीरामांचे दर्शन घेतले व आरती केली. मिरवणुकीच्या स्वागतासाठी महिला व पुरुषांनी आपापल्या घराच्या दारात रांगोळ्या काढल्या, आरत्या सजवल्या आणि भक्त भगवान श्रीराम व आपले आराध्यांचे दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. रामचरितमानस, आरती, सोहरगीत, प्रसाद, रथ शोभायात्रेचे २४ तास अखंड पठण करून श्रीराम नवमी उत्सवाची सांगता झाली. यावेळी रोजगार हमी, फलोत्पादन व खार भूमी खात्यांचे मंत्री भरतशेठ गोगावले आणि शिवसेना उ. बा. ठा. रायगड जिल्हा महिला संघटीका डॉ. स्वीटी गिरासे उपस्थित होते. गोरेगांव पोलीस दलाने संपूर्ण मिरवणूकीवर नियंत्रण ठेवत चोख कामगिरी पार पाडली व श्रीराम नवमी उत्सव अबाधित पणे साजरे जाहले.

ॲट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

विष्णू व अक्षय घुडे दोघे अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी राजीव चंदने मुरबाड :सरळगाव येथे वकील एड. प्रफुल्ल अजित रोकडे व त्यांचे भाऊ अक्षय अजित रोकडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी विष्णू सदाशिव घुडे व अक्षय सदाशिव घुडे या दोघांना मुरबाड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणात जातीय द्वेषातून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर मुरबाड पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात बौद्ध समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. समाजातील वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाला गती देत दोन्ही आरोपींना अटक केली. या कारवाईबद्दल पोलीस उपविभागीय अधिकारी लाड यांच्या कार्याचे आंबेडकरी समाजाकडून अभिनंदन करण्यात येत आहे. या प्रकरणातील सर्व संबंधित आरोपींना अटक करण्यात आल्याने आता तपास पुढील कायदेशीर प्रक्रियेनुसार सुरू असून, पीडितांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 00000000000

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ

हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली माहिती अशोक गायकवाड अलिबाग: देशातील व्यावसायिक एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण कोट्यात आता ५० टक्क्यांपर्यंत मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या सूचनेनुसार करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. या नव्या धोरणानुसार, राज्यांना यापूर्वी मिळणाऱ्या २० टक्के आणि त्यानंतर सुधारणांच्या आधारे वाढविण्यात आलेल्या १० टक्के कोट्याव्यतिरिक्त आता अतिरिक्त २० टक्के कोटा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिक एलपीजीचा एकूण पुरवठा आता संकटपूर्व काळातील पातळीच्या ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढीव कोट्याचा सर्वाधिक फायदा रेस्टॉरंट्स, ढाबे, हॉटेल्स, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया उद्योग, दुग्धशाळा आणि सरकारी अनुदानित अन्न केंद्रांना होणार आहे. तसेच स्थलांतरित मजुरांसाठी उपलब्ध असलेल्या ५ किलोच्या एफटीएल सिलिंडर पुरवठ्यालाही यात प्राधान्य देण्यात आले आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटीही लागू केल्या आहेत. सर्व व्यावसायिक आणि औद्योगिक एलपीजी ग्राहकांना संबंधित तेल कंपन्यांकडे आपली अधिकृत नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कंपन्या ग्राहकांच्या वार्षिक वापराचा आणि त्यांच्या क्षेत्राचा संपूर्ण रेकॉर्ड ठेवणार आहेत, जेणेकरून गॅसचा गैरवापर टाळता येईल. यासोबतच, ज्या भागात पाईप गॅसची सुविधा उपलब्ध आहे, तिथे ग्राहकांनी पीएनजीसाठी अर्ज करणे आणि त्या वापरासाठीची तयारी दर्शविणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक क्षेत्रातील इंधन टंचाई दूर होण्यास मदत होणार असून उद्योगांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

समतेचा जागर वर्षभर सुरू राहणार

समतेचा जागर वर्षभर सुरू राहणार डॉ. हर्षदीप कांबळे यांचे प्रतिपादन चवदार तळे सत्याग्रह दिनी बार्टीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम अलिबाग : (अशोक गायकवाड )- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी हक्क मिळवून देण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. तो लढा समतेसाठी, स्वाभिमानासाठी न्यायासाठी होता. या समतेच्या संगराला पुढील वर्षी शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. यानिमित्त वर्षभर सामाजिक न्याय विभागाच्यामार्फत समतेचा जागर सुरू राहणार, असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्यावतीने महाड येथील राष्ट्रीय स्मारकामध्ये बार्टीच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या लढ्यात सर्व जातीधर्मातील लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ दिली. चवदार तळ्याचा लढा हा मानव मुक्तीचा होता. चवदार तळ्यातील पाणी स्वच्छ करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ५५ कोटी रुपये मंजूर केले असून ते पाणी जल शुद्ध प्रकल्पाद्वारे शताब्दी पूर्वी पिण्यायोग्य होईल. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय खाते कटिबद्ध असून आपण सर्वांनी डॉ बाबासाहेबाचा समतेचा लढा पुढे नेण्यासाठी आपण एकत्र येऊन पुढे नेवू या, असे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांनी बार्टी आयोजित चवदार तळे सत्याग्रह दिन अभिवादन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना व्यक्त केले. २० मार्च भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील सभागृहात चवदार तळे सत्याग्रह दिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजकल्याणच्या आयुक्त तथा बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ -मुंडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, उपायुक्त भंडारे, लवटे, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, बार्टीच्या निबंधक डॉ सुचिता शिंदे, विभागप्रमुख रविंद्र कदम, शुभांगी पाटील, डॉ.बबन जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.कांबळे पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी जो सत्याग्रह केला तो सत्याग्रह नुसता पाण्याचा नव्हता तर तो स्वाभिमानाचा होता. समाजात समता प्रस्थापित करण्याचा होता. त्याच वाटेवर सामाजिक न्याय विभाग काम करत आहे.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक नवीन उपक्रम सुरू असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतलेल्या लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आंबेडकर अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तिथे आपली मुले संशोधन व अभ्यास करतील. आपल्या मुलांनी यशस्वी होण्यासाठी अविश्रांत मेहनत करा, मेहनतीमुळेच आपण आपल्या जीवनात यशस्वी होतो, असा प्रेरक संदेश त्यांनी दिला. यावेळी डॉ.हर्षदीप कांबळे लिखित “मी महाडचे चवदार तळे बोलतोय” ही अत्यंत प्रेरक अशी चित्रफीतही दाखवण्यात आली. आभार व्यक्त करताना समाजकल्याणच्या आयुक्त तथा बार्टीच्या महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ -मुंडे यांनी समाजकल्याण व बार्टीच्या विविध योजनेचा समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन उच्च शिक्षण घ्यावे, तसेच आपले भविष्य घडवावे, असे आवाहन केले. क्रांतीस्तंभ येथील मुख्यमंचावर बार्टीच्या वतीने प्रसिद्ध गायक कुणाल वराळे, शाहीर शहीद खेडकर, हर्षद कांबळे यांनी “पाऊले या क्रांतीच्या” भीम गीतांच्या माध्यमातून चवदार तळ्याच्या संघर्षमय आठवणीला उजाळा दिला. महाड स्मारकात गायक अशोक गायकवाड यांनी “रथ भीमाचा नेऊ पुढे” हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. तसेच लेखक -दिगदर्शक- निर्माता राहुल जोंधळे लिखित “निळी टोपी” व दर्शन महाजन निर्मित संविधानावर आधारित “राष्ट्रग्रंथ” हे ४० कलाकारांचा संच असलेली नाटके सादर केली. बार्टी संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांचे मौल्यवान ग्रंथ सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली होते. त्याचे उद्घाटनही प्रधान सचिव डॉ.कांबळे यांनी केले. याप्रसंगी समाजकल्याण व बार्टीतील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्यभरातून आलेले भीम अनुयायी, विविध क्षेत्रातील मान्यवर” बार्टीचे समतादूत, तालुका समनव्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, डॉ.सारिका थोरात, महाड व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, जनसंपर्क अधिकारी लीना कांबळे यांच्यासह बार्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ.बबन जोगदंड यांनी केले.

पनवेल महानगर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत शेडगे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान अशोक गायकवाड रायगड- नागोठणे : पनवेल येथील गेली अनेक वर्षे पत्रकारितेमध्ये लेखणीच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय देण्याबरोबरच विविध सामाजिक विषय मार्गी लावणारे पनवेल महानगर प्रेस क्लब चे अध्यक्ष पत्रकार प्रशांत शेडगे यांना नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचा मानाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचा १४ वा वर्धापन दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार लोकनेते सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याच बरोबर नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचे अध्यक्ष अँड.महेश पवार, संस्थापक श्यामकांत नेरपगार, सचिव अनिल पवार व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.पत्रकार प्रशांत शेडगे गेली २० वर्षे पत्रकारितेत सक्रिय असून त्यांनी आता पर्यंत अनेक नामांकित वृतपत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.यामुळे पत्रकार शेडगे यांना पनवेल गौरव पुरस्कार,पनवेल भूषण पुरस्कार,महाराष्ट्र एक्सेलन्स अवार्ड बरोबरच अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात आणखीन उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याने समाजातील सर्व स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 000000000000

मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर निर्बंध

मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर निर्बंध जाळीच्या कंपाऊंडमुळे प्राण्यांचा अधिवास लुप्त होण्याच्या मार्गावर मुकुंद रांजाणे माथेरान : घनदाट वनराई अशी ख्याती असलेल्या माथेरान मध्ये पूर्वीपासून जंगलात मुक्या प्राण्यांचा वावर होता तो आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.परंतु सद्यस्थितीत येथील जुन्या बंगल्यांची विक्री होत गेल्याने नवीन मालकांनी बंगल्याच्या भोवती संपूर्ण भागात जाळीचे कंपाऊंड टाकण्यास सुरुवात केल्यामुळे जंगल भागातील मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे साहजिकच आगामी काळात ह्या प्राण्यांच्या संख्येत घट होणार असून त्यांचा मुक्तसंचार लुप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने जवळपास ३६ एकरांवर असणाऱ्या या बंगल्याच्या सभोवताली जाळीचे कंपाऊंड करत असल्याने हे केलेले कंपाउंड योग्य नसून मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर गदा येत आहे यासाठी हे कंपाऊंड ताबडतोब काढून टाकण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी अनेक दिवसांपासून केलेली असून विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी सुध्दा याबाबत लेखी पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे केलेला असताना देखील अद्यापही याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी एक दिवस या भागात येऊन हे कंपाऊंड काढायला हवे असा दिखावा केला होता परंतु काहीच योग्य कारवाई करण्यात आलेली नाही. वनखात्याचे वनपाल यांनीही या प्रकरणाकडे वरिष्ठांचा आदेश असतानाही हेतुपुरस्सर कानाडोळा केला असून निश्चितच यामागे मोठे अर्थकारण झाल्याचे संतोष शिंदे यांनी सांगितले. माथेरान स्थळासाठी वेगळी नियमावली असून जंगल भाग असल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासाकरिता कोणत्याही वास्तूला कंपाऊंड करता येत नाही.आम्ही लेखी निवेदने देऊनही नाममात्र चार ते पाच जाळ्या काढण्याचा दिखावा नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी केलेला आहे.बाकी सर्व जाळ्या आजही तशाच आहेत. वनखात्याचे अधिकारी सुध्दा मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांनाही आपल्या कर्तव्याची जाण नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. संतोष शिंदे—उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथेरान

 ८० वर्षे व त्यावरील लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करावा

८० वर्षे व त्यावरील लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करावा जिल्हा कोषागार अधिकारी दीपक बोडके यांचे आवाहन अशोक गायकवाड रायगड-अलिबाग : -शासनाच्या ८० वर्षे व त्यावरील निवृत वेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तीवेतनात वाढ करण्यासाठी जन्मदाखला, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँक खाते असलेल्या बँक शाखा प्रमुखाचे प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय आस्थापनांचे प्रमाणपत्र, सेवा पुस्तकातील नोंद, ओळखपत्र, सेवानिवृत्त झालेल्या कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र, वाहन परवाना,भारतीय जीवन विमा कंपनी अथवा अन्य विमा कंपनी यांच्याकडील पॉलिसी इत्यादी (यापैकी कोणताही एक पुरावा) कोषागार कार्यालयात सादर करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दीपक बोडके यांनी केले आहे. ८० वर्षे व त्यावरील लाभ मिळण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात अर्ज सादर करण्यात यावा. तसेच अर्जामध्ये बँकेचे नाव, खाते क्रमांक, पीपीओ क्रमांक नमूद करावा. वयाचा पुरावा सोबत जोडण्यात यावा. ज्या निवृत्तीवेतनधारकांना ८० वर्षाचा लाभ मिळत आहे त्यांनी पुन्हा अर्ज करू नयेत. तसेच अधिक माहितीकरिता रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाकडे संपर्क साधावा.