ठाणे : वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या भूमिगत मार्गामुळे चेंदणी कोळीवाडा परिसरात संभ्रमाचे वातावरण आहे. या मार्गामुळे या कोळीवाड्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि भौगोलिक महत्वालाच तडे जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकारी आणि चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची आज संयुक्त बैठक घेत सकारात्मक चर्चा केली. ठाण्यात राबविण्यात येणाऱ्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोबाबत ठिकठिकाणी संभ्रम आणि तक्रारी असल्याचे पुढे आले आहे. संबंधित नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांची संयुक्त बैठक घेत पाहणी दौरेही केले. यात शक्य तेथे सकारात्मक बदल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
या प्रकल्पाचा तीन किमीचा मार्ग भूमिगत असून तो चेंदणी कोळीवाड्यातून जाणार आहे. कोळीवाड्याचे सीमांकन झाले नसताना हा प्रकल्प राबवणे इष्ट नाही. या भूमिगत मार्गामुळे येथील वारसा स्थळ असलेले श्री दत्त मंदिर, विहिरी, भूजल स्तर, पारंपरिक घरे आणि गावठाणाची सामाजिक-सांस्कृतिक परिसंस्थाच बाधित होणार असल्याची भीती ट्रस्टने केळकर यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. तसेच जोपर्यंत सीमांकन होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प राबविण्यात येऊ नये, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांसोबत साधक बाधक चर्चा झाली. यावेळी प्रकल्पाचे अधिकारी सुरेश पारखे तसेच ट्रस्टचे  अमरीश ठाणेकर, श्रुतिका मोरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना केळकर यांनी सांगितले की गेल्या तीन महिन्यांत अनेक ठिकाणी तक्राररदार नागरिकांच्या भेटी घेऊन चर्चा केली, संबंधित अधिकाऱ्यांसोबत स्थळ पाहणीही केली. शक्य तेथे बदलही करण्यात आले आहेत. चेंदणी कोळीवाडा ही वसाहत सर्वात जुनी असून येथे खरे भूमिपुत्र पिढ्यान पिढ्या राहत आहेत. या प्रकल्पाबाबत त्यांच्या काही शंका आहेत. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या शंकांची प्रत्यक्ष पडताळणी करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे संजय केळकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *