महेश चंद्र त्रिपाठी यांनी स्वीकारली मुख्य न्यायमूर्तीपदाची धुरा
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शपथविधी अशोक गायकवाड* मुंबई : अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. लोकभवन येथे झालेल्या समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांना पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी न्या. त्रिपाठी यांचे अभिनंदन केले. समारंभाच्या प्रारंभी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी न्या. त्रिपाठी यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना आणि अधिपत्र वाचून दाखविले. राष्ट्रगान, वंदे मातरम् आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शपथविधीनंतर वंदे मातरम् आणि राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली. न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपद रिक्त झाले होते. त्यानंतर न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. शपथविधी सोहळ्यास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती सचिन अहिर, मंत्री छगन भुजबळ, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, तसेच मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयांतील न्यायमूर्ती उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती सुजाता मनोहर आणि न्यायमूर्ती मोहित शाह यांचीही यावेळी उपस्थिती होती.
आरसीएफ व्हॉलीबॉल निवडचाचण्या ११ व १२ सप्टेंबर रोजी
मुंबई, ८ सप्टेंबर: आरसीएफ स्पोर्ट्स क्लबतर्फे मुंबईत होणाऱ्या स्थानिक स्पर्धांमध्ये आरसीएफ व्हॉलीबॉल संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठीच्या संघासाठी खेळाडूंच्या निवडचाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या चाचण्या चेंबूर येथीलआरसीएफ स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर शुक्रवार, ११ सप्टेंबर आणि शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घेतल्या जातील. १८ वर्षांवरील खेळाडू या चाचण्यांसाठी पात्र आहेत. निवड चाचण्यांदरम्यान पडताळणीसाठी खेळाडूंनी आपली क्रीडा प्रमाणपत्रे आणि कामगिरीचे अहवाल (मूळ आणि छायाप्रत) सोबत आणणे आवश्यक आहे. इच्छुक खेळाडूंनी खेळाच्या गणवेशात मैदानावर उपस्थित राहावे. खेळाडूंनी अधिक माहितीसाठी सुनील कुलकर्णी (मोबाईल: ७९७७०६७५६४) यांच्याशी संपर्क साधावा.
रायगडच्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण-क्रीडेसाठी मदतीचा हात
मराठा वॉरिअर्स गडकिल्ले संवर्धक आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा पुढाकार दिवा : दिव्यातील मराठा वॉरिअर्स गडकिल्ले संवर्धक, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाडे, वाड्या- वस्त्या तसेच शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व क्रीडा साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणे तसेच क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून त्यांच्या शारीरिक आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. उपक्रमादरम्यान अंगणवाडी तसेच प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, कॅमलिन ड्रॉईंग बुक यांसह लहान मुलांसाठी विविध खेळण्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम निर्माण व्हावे आणि त्यांच्या शारीरिक विकासाला चालना मिळावी, यासाठी क्रिकेट बॅट-बॉल, फुटबॉल, बॅडमिंटन किट, कॅरम तसेच स्किपिंग रोप आदी क्रीडा साहित्याचेही वाटप करण्यात आले. उपक्रमाच्या नियोजनानुसार रविवारी सुतारवाडी, वाकी आदिवासी वाडी, कामत आदिवासी वाडी आणि बाईत आदिवासी वाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांसह स्थानिक रहिवाशांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर सोमवारी पातरशेत आदिवासी वाडी, स्थानिक जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्य वितरित करण्यात आले. या सामाजिक उपक्रमासाठी कै. एकनाथ भगत तसेच ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष अजित भगत यांचे विशेष सहकार्य लाभले. संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष राहुल दत्ताराम खैर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व सदस्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी उपाध्यक्ष रोहित जाधव, कार्याध्यक्ष नितीन शिवगण, सेक्रेटरी अमित गुरव, उपसेक्रेटरी रोहित खैर, मीडिया प्रमुख अभिजित गावडे व सुमित गावडे, संपर्कप्रमुख रवींद्र शिंदे तसेच सचिन गावडे, कार्तिक गोसावी, कलाप्पा चौगुले, यश खैर, रोहन खैर आणि रोशन खैर आदी सदस्य उपस्थित होते. उपक्रमावेळी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, स्थानिक ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि क्रीडेसाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला तसेच सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा हा तीन दिवसीय सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला. सर्व नियोजित कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी परतीचा प्रवास केला.
शाळांना भेटी नको, शाळांमध्ये बदल घडवा
विवेक पंडित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश योगेश चांदेकर पालघर : जिल्हा परिषद शाळांची पुन्हा पुन्हा पाहणी आणि माहिती संकलन करण्याऐवजी प्रत्येक शाळेतील शिक्षक व मूलभूत सुविधांच्या त्रुटी निश्चित करून त्या कालबद्ध पद्धतीने दूर करा, अशी मागणी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी राज्य शासनाकडे केली आहे. शिक्षण विभागाच्या ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचे रूपांतर आता ‘त्रुटी निर्मूलन अभियानात’ करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिक्षण आयुक्तालयाने ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबरदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद शाळांच्या पाहणीचे निर्देश दिले आहेत. मात्र UDISE व शिक्षण विभागाकडे शाळानिहाय माहिती आधीच उपलब्ध असताना पुन्हा सर्वेक्षण कशासाठी, असा सवाल पंडित यांनी प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रातून केला आहे. “शिक्षक नाहीत, वर्गखोल्या अपुऱ्या आहेत, पाणी-स्वच्छतागृह-वीज नाही, हे पुन्हा शोधण्यात वेळ घालवू नका. कोणत्या शाळेत काय कमी आहे, ते कधी पूर्ण करणार आणि त्यासाठी कोणता अधिकारी जबाबदार आहे, हे निश्चित करा,” अशी मागणी त्यांनी केली. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेची School-wise Deficiency List तयार करून प्रत्येक त्रुटीसमोर जबाबदार अधिकारी, आवश्यक निधी आणि काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख नमूद करावी. दर १५ दिवसांनी बैठकींची संख्या न मोजता किती त्रुटी होत्या, किती दूर झाल्या आणि किती प्रलंबित आहेत, याचा सार्वजनिक आढावा घ्यावा, असे पंडित यांनी सुचविले आहे. पालघर हा विस्तारित आकांक्षित जिल्हा असल्याने तेथे हे अभियान ‘मॉडेल परिणामाधारित अभियान’ म्हणून राबविण्याची मागणीही त्यांनी केली. “किती शाळांना भेटी दिल्या, हा अभियानाच्या यशाचा निकष नसावा; अधिकारी गेल्यानंतर किती शाळांमध्ये प्रत्यक्ष बदल झाला, हेच शासनाने मोजावे,” असे पंडित यांनी स्पष्ट केले.
मांडा, टिटवाळा येथील २० वीज चोरांवर गुन्हा दाखल
कल्याण : महावितरण कडून वारंवार आवाहन करूनही चुकीच्या मार्गाने वीज वापरणाऱ्या मांडा, टिटवाळा परिसरातील २० वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरण कडून रितसर मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मांडा, टिटवाळा परिसरात वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी सहायक अभियंता तुकाराम घोडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासणी केली. तपासणी दरम्यान बहुतांश वीज ग्राहक चोरी करुन वीज वापर करीत असल्याचे आढळून आले. महावितरण कडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत पांडुरंग अंगम, प्रविण जा़धव, अमीना बी अख्तर, आरती शर्मा, रेणू शुक्ला, मोहम्मद मलिक अजगर अली, राबिया अन्सारी, रोषन कलसुकर, सुमित्रा भगत, मोहम्मद अयुब, अल्फिया डेव्हलपर, ए.एस.बाबा इलेक्ट्रिकल, जगदीश धुमाळ, सुनील शिंदे, विनायक पाटील, सुनील खरात, जयश्री जाधव, किशोर राठोड, आकाश पाल या वीज ग्राहकांनी महावितरणची ८७८३ युनिटची वीज चोरून वापरली अशी फिर्याद महावितरण कडून देण्यात आली आहे. मुरबाड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पोषण दिंडी, प्रतिज्ञा अन् बालस्नेही गावाची शपथ
शेवगा रोपाचे वृक्षारोपण अनिल ठाणेकर ठाणे : बालक, किशोरी, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्य व पोषणाचा दर्जा उंचावण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी केंद्र, बांधणेपाडा येथे ९ सप्टेंबर रोजी पोषण अभियानाचा शुभारंभ उत्साहात करण्यात…
रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थेला मिळणार बळ
३४ पेट्रोल कार्डचे वितरण अनिल ठाणेकर ठाणे : ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा वेळेत मिळण्यासाठी रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत प्राप्त झालेल्या ३४ पेट्रोल कार्डचे वितरण…
महापौर शालेय कॅरम स्पर्धेच्या साकीनाका सराव उपक्रमात ५४ खेळाडूंचा सहभाग
मुंबई : आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, समता विद्या मंदिर-साकीनाका व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धे निमित्तच्या पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात साकीनाका-अंधेरी परिसरातील ५४ शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला. याप्रसंगी समता विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका भारती पवळे, क्रीडा शिक्षक साधुराम व सुनील खोपकर, शिक्षिका मीनाक्षी तिवारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय एकेरी कॅरम स्पर्धा २६ सप्टेंबरपासून होणार असल्यामुळे शालेय मुलामुलींना कॅरम खेळाच्या नियम व सरावाबाबत पूर्वतयारीचे विनाशुल्क मार्गदर्शन संयोजकांमार्फत चँम्पियन कॅरम बोर्डवर दिले जात आहे. साकीनाका-अंधेरी तसेच चेंबूर परिसरातील शालेय खेळाडूंचा प्रतिसाद लक्षात घेऊन संयोजकांनी उदयोन्मुख शालेय खेळाडूंचे २३ सप्टेंबर रोजी विनाशुल्क प्रगत मार्गदर्शन उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
सणांच्या काळात ठाणेकरांची गैरसोय टाळा
आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश अनिल ठाणेकर ठाणे : गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, कचरा संकलन, ध्वनी व वायू प्रदूषण नियंत्रण तसेच आवश्यकतेनुसार वृक्षांच्या…
