Author: bittambatami.com

स्त्रीभ्रूणहत्या विरोधात सरकारची कडक मोहीम

 नीलम गोऱ्हे अध्यक्षपदी तर स्नेहा दुबे पंडित यांची सदस्यपदी निवड योगेश चांदेकर वसई : राज्यातील स्त्रीभ्रूणहत्या, बेकायदेशीर गर्भपात तसेच गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाच्या अध्यक्षपदी विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली असून, वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार  स्नेहा ताई दुबे पंडित यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या राज्यस्तरीय कृती दलामध्ये विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव, भावना गवळी,  चित्रा वाघ,  उमा खापरे, डॉ. मनीषा कायंदे तसेच विधानसभा सदस्या स्नेहा दुबे पंडित आणि  श्वेता महाले यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे येथील अतिरिक्त संचालक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. राज्यात PCPNDT Act आणि MTP Act मधील तरतुदींचे उल्लंघन होऊ नये, यासाठी सोनोग्राफी केंद्रे, तत्सम निदान केंद्रे आणि वैद्यकीय गर्भपात केंद्रांवर प्रभावी देखरेख ठेवणे तसेच विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधणे, हे या कृती दलाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कृती दलामार्फत राज्यातील विविध जिल्हे आणि महानगरपालिका क्षेत्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांसह सोनोग्राफी केंद्रे व वैद्यकीय गर्भपात केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी केली जाणार असून, कायद्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधित प्राधिकरणाला तातडीने कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्देश देण्याचे अधिकार कृती दलाला देण्यात आले आहेत. तसेच कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाला आवश्यक शिफारशी करणे, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठका घेणे आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रभावी जनजागृती उपाययोजना सुचविणे, ही महत्त्वाची जबाबदारीही कृती दलावर सोपविण्यात आली आहे. आमदार  स्नेहा ताई दुबे पंडित यांचा या महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय कृती दलामध्ये सदस्य म्हणून समावेश होणे ही वसई विधानसभा मतदारसंघासाठी अभिमानाची बाब आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माचे प्रमाण सुधारण्यास हातभार लावणे आणि समाजामध्ये मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण करणे, या महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यात त्या आता राज्यस्तरावर योगदान देणार आहेत. कृती दलाला आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक आणि अभिलेखीय सहकार्य करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित समुचित प्राधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. कृती दल दर तीन महिन्यांनी आपल्या निरीक्षणांचा आणि शिफारशींचा अहवाल सार्वजनिक आरोग्य विभागाला सादर करणार असून, या कृती दलाचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहणार आहे. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या विचाराला अधिक बळ देत स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपाताविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

कणकवलीत साकारतेय भाजपचे सुसज्ज ‘भाजपा भवन’

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे भाजपचे सुसज्ज आणि आकर्षक ‘भाजपा भवन’ उभारण्यात येत आहे. या भवनाच्या सुरू असलेल्या बांधकामाची भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पाहणी…

केडीएमसीच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी मोर्चा

शहर पथ विक्रेत्यांचा इंदिरा चौकातून मनपा कार्यालयावर मोर्चा कल्याण : पथविक्रेत्यांवर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ शहर पथविक्रेता समितीच्या वतीने बुधवारी रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी ११ वाजता डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौक येथून निघणार असून, महानगरपालिका कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती केडीएमसीच्या शहर पथ विक्रेता समितीचे सदस्य भालचंद्र पाटील यांनी दिली. शहर पथविक्रेता अधिनियम २०१४ नुसार पथविक्रेत्यांना संरक्षण देणे आवश्यक असताना, प्रशासनाकडून कायद्याचे उल्लंघन करून कारवाई केली जात असल्याचा आरोप पथविक्रेता समितीने केला आहे. कारवाईमुळे अनेक पथविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊन त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पथविक्रेत्यांवरील कारवाई तात्काळ बंद करावी, जप्त केलेल्या गाड्या व साहित्य तातडीने परत करावे, नोंदणीकृत पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास मोर्चानंतर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

भारतात होणार महाविष्णूची अध्यात्मिक यात्रा

केतन खेडेकर मुंबई – श्री नारायण भक्ती पंथ गुरु आणि प्रवर्तक रमस्वरूप संत श्री लोकेशन नंदजी महाराज यांच्या वतीने ते नारायण रत्ना २१ आणि २२ जानेवारी २०१७ रोजी मुंबईतील महालक्ष्मी एस्कॉर्ट येथे सुरु होणार असून ही बारा वर्षाची अखिल भारतीय यात्रा भारताचे कानाकोपऱ्यातून सर्व धर्मापासून ध्येयापर्यंत भगवान महाविष्णूची अद्वितीय महामूर्ती घेऊन प्रस्थान करणार आहे. याबाबत आज नुकतीच मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही भगवान माउष्णूची विशेष चाळीस स्वरूपातील जगातील एकमेव पंचधातूचे महामुर्ती आहे. या मूर्तीचे घन आणि शुद्ध पंचधातू पासून बनवलेली लांबी पंधरा फूट असून शेषनागाच्या होण्याची उंची सात फूट आहे. या मूर्तीचे वजन नऊ टन असून यामध्ये १२ किलो सोने आणि तीनशे किलो चांदी आहे. तर तांबे २१ टन असून झिंक नऊ टन आणि इतर पवित्र धातू आहेत. मी धातू घडवण्यासाठी तीच कुशल कारागिरांनी बारा महिन्यात कॉल परिश्रम केले असून या मूर्तीची किंमत वीस कोटीच्या घरात आहे. तरी या या विष्णूच्या महायात्रेमध्ये मोठ्या संख्येने भक्तांनी सहभागी व्हावी अशी आवाहन ब्रह्म स्वरूप संत श्री लोकेशनंदजी महाराज यांनी केले आहे

 तीन महिन्यांपासून पगार नाही, केडीएमसीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथा

 आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धिनी केंद्रातील कर्मचाऱ्यांचे केडीएमसी मुख्यालयात धाव कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याने त्यांनी बुधवारी केडीएमसी मुख्यालय गाठले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे आपली व्यथा मांडत कर्मचाऱ्यांनी थकीत पगार तातडीने देण्याची मागणी केली. केडीएमसी क्षेत्रात ५ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने आणि ५६ आरोग्यवर्धिनी केंद्रे आहेत. या ठिकाणी अटेंडंट कम सिक्युरिटी गार्ड आणि क्लिनिंग स्टाफ अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या सुमारे १३० कर्मचारी कार्यरत असून ते दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत काम करतात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. कमी पगारात काम करत असतानाही तो वेळेवर मिळत नसल्याने घरखर्च भागवायचा कसा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. कंत्राटदाराच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. अटेंडंट कर्मचाऱ्यांना कपातीनंतर सुमारे ८ हजार रुपये, तर क्लिनिंग कर्मचाऱ्यांना सुमारे ७ हजार रुपये हातात मिळत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. याशिवाय सुट्ट्या, सिक लीव्ह आणि बोनस मिळत नसल्याचीही त्यांची तक्रार आहे. थकीत पगार मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना लेखी निवेदन दिले. तसेच महापौर हर्षाली चौधरी, उबाठाचे नगरसेवक उमेश बोरगावकर, स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड, नगरसेवक मधुर म्हात्रे आणि रूपेश सकपाळ यांच्याकडेही आपली समस्या मांडली. याबाबत केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित कामाचा कालावधी संपला असून नवीन टेंडर प्रक्रिया सुरू आहे. संबंधित दिशा एजन्सीला कंत्राटी कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्याच्या सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तीन महिने काम करूनही पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यावेळी अभय भोईर, संतोष भालेर, विशाल सोरटे, पूजा ठाणगे, रूपाली दातखिळे, सुरेखा सोनवणे, सतीश भालेराव, योगेश बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. ००००००००००  

 कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा

– सकल मराठा समाजाचे अन्नत्याग आंदोलन कल्याण : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कल्याणमध्ये सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर एकदिवसीय अन्नत्याग व लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील तहसीलदार कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या या आंदोलनात मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कल्याणमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने मनोज जरांगे यांच्या काही मागण्या वेळोवेळी मान्य केल्या असल्या, तरी अद्याप काही मागण्या प्रलंबित आहेत. ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून झाल्या आहेत, त्यांना अद्याप कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नाही. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले असल्याचे मराठा समाजाचे नेते अरविंद मोरे यांनी सांगितले. दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन त्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. यावेळी आंदोलनात अरविंद मोरे, श्याम आवारे, धनंजय जोगदंड, दर्शन देशमुख, बबन जरांगे, राहुल काटकर, संदिप देसाई, सतीश पेडणेकर, शरद बिरामाने, प्रशांत पाटील, आनंद कोळेकर, कृष्णा पाटील, प्रकाश जाधव, भागुजी पाटील, अंकुश मुळीक, रवींद्र लांडे, सीताराम कोकणे, भावेश अवसरे, अमर वाघ, अजित शिंदे, सुभाष अरगुडे, दत्तात्रय पाटील, किशोर डुबे, किशोर जाधव, धनाजी देगावकर, रमेश गुंजाळ, विठ्ठल जवक,  रवींद्र कदम, गणेश निकम, सिद्धेश भोसले, भानुदास यादव, अशोक दळवी, रमेश अंधारे, गणेश गवते, उदय वाघमारे, गणेश वाबळे, अभिजित पोवार, प्रकाश मोरे, अस्मिता मोरे, वर्षा कळके, रुपाली नींबाळकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. ०००००

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस- हर्षवर्धन सपकाळ

उलवे  : महेंद्रशेठ यांचे हसणे आणि रुसणे, या संमिश्र भावना आहेत; परंतु महेंद्रशेठ घरत मनाचा सच्चा माणूस आहे आणि हवेहवेसे वाटणारे नेतृत्व आहे. विनोद म्हात्रे यांच्या वाढदिवसाला महेंद्रशेठ घरत यांच्या…

‘अभ्यासात कमी पडत नाही, तरी अपयश का?’

पेपरफुटीविरोधात नाशिकमध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन हरिभाऊ लाखे नाशिक : याआधी तीन ते चार वेळा आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा दिली होती. प्रत्येक वेळी अतिशय कमी फरकाने अपयशी ठरलो. तेव्हा वाटायचे, आपण अधिक अभ्यास केला पाहिजे. परंतु, आता पेपरफुटीमुळे इतर लोक पुढे जात असल्याचे समजल्यावर अपयशाचे मूळ कारण लक्षात येत आहे. आपण अभ्यासात कुठेही कमी पडत नसून या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि आत्मविश्वासावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. राज्यातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर शहरांपाठोपाठ बुधवारी नाशिकमधील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनावेळी सहभागी एका विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता अधोरेखित केली. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. या परीक्षांसाठी अनेक वर्षे अथक परिश्रम घेतात. कुटुंबीयांकडून मोठी आर्थिक, सामाजिक व मानसिक गुंतवणूक केली जाते. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा पारदर्शक, निष्पक्ष, सुरक्षित, उत्तरदायी व विश्वासार्ह असणे आवश्यक असल्याकडे आंदोलक विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. या प्रक्रियेवरील ढासळलेला विश्वास पूर्ववत करण्यासाठी तातडीने १८ कलमी सुधारणा कराव्यात असे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले. सध्याच्या प्रश्नपत्रिकाफुटीच्या प्रकरणाची तसेच यापूर्वी झालेल्या संभाव्य परीक्षा गैरप्रकारांची चौकशी पूर्णपणे स्वतंत्र व कोणत्याही दबावापासून मुक्त वातावरणात करण्याची आवश्यकता आहे. निष्पक्षपणे ही चौकशी होण्यासाठी एमपीएससीचे अध्यक्ष व सचिव तसेच या प्रकरणाशी संबंधित मंत्रालयीन अधिकारी यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत जबाबदाऱ्यांपासून तात्पुरते दूर ठेवावे. प्रश्नपत्रिका निर्मिती, संपादन, छपाई, हाताळणी, वाहतूक, गोपनीय माहितीची सुरक्षा, परीक्षा व्यवस्थेवरील नियंत्रण, प्राप्त तक्रारींवर केलेली कार्यवाही, संभाव्य निष्काळजीपणा किंवा प्रशासकीय त्रुटी यांची स्वतंत्र चौकशी करण्याचा आग्रह आंदोलकांनी धरला आहे. परीक्षेतील प्रत्येक टप्प्यासाठी जबाबदारी निश्चित करावी. प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेसाठी स्वतंत्र व अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा निर्माण करावी. गोपनीय माहिती बाहेर जाण्याचे मार्ग ओळखून त्यावर नियंत्रण ठेवावे. प्रश्नपत्रिका अभ्यासक्रमाधारित, तथ्यात्मकदृष्ट्या अचूक आणि त्रुटीविरहित राहण्यासाठी प्रश्ननिर्मिती ते अंतिम मंजुरीपर्यंत बहुस्तरीय तपासणी करावी, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली. क्रीडा, अपंग, टायपिंग व इतर विशेष कोट्यांतर्गत होणाऱ्या निवडीसाठी पात्रता निकष स्पष्ट करावेत. परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार, प्रश्नपत्रिकेतील त्रुटी, परीक्षा केंद्रातील समस्या, तांत्रिक अडचणी अथवा अन्य तक्रारींची दखल घेण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल तयार करावे. प्रत्येक तक्रार निवारणाची जबाबदारी निश्चित अधिकाऱ्यावर सोपवावी. यावर निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करून विद्यार्थ्यांना उत्तर देणे बंधनकारक करावे. आयोगाच्या सदस्य नियुक्तीत पारदर्शकता, परीक्षा गैरप्रकारांच्या चौकशीसाठी निश्चित कालमर्यादा, परीक्षा केंद्रातील सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याची गरज विद्यार्थ्यांनी मांडली. मुलाखतीसाठी स्पष्ट, पूर्वनिश्चित, वस्तुनिष्ठ मूल्यांकन निकष जाहीर करावेत. राज्यसेवा मुख्य परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व गुणदान या प्रक्रिया कोणत्या निकषांवर आधारित आहेत, याबाबत आयोगाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत, अशी मागणी करण्यात आली. निकालानंतरची निवड व नियुक्ती प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील गुणांतील तफावत व मूल्यांकन प्रक्रियेची तपासणी करावी. एखाद्या परीक्षेतील गैरप्रकारावर तात्पुरती कारवाई करण्यापेक्षा संपूर्ण परीक्षा व्यवस्थेचे संस्थात्मक पुनरावलोकन करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मजबूत यंत्रणा निर्माण करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी शासनाकडे केली आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वास्तूंची जतन-संवर्धन कामे दर्जेदार करावीत – अण्णा बनसोडे

मुंबई, दि. ९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई’ अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांच्या जतन व संवर्धनाची कामे सुनियोजित, दर्जेदार आणि या वास्तूंच्या ऐतिहासिक महत्त्वाला साजेशी व्हावीत, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी सामाजिक न्याय विभागाने मंजूर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या विशेष निधीच्या अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्ष  बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.  सोसायटीच्या माध्यमातून राज्यातील नऊ शैक्षणिक संस्था व दोन वसतिगृहाचे जतन व संवर्धनाच्या कामांचा व प्रशासकीय मान्यतेचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव सो. ना. बागूल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सह सचिव पु. प्र. साबणे, वित्त विभागाच्या अवर सचिव शि. भा. भोगटे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. वासुदेव गाडे व चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत. ज्या कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, त्या प्रस्तावांना प्राधान्याने मान्यता देण्याची कार्यवाही शासनस्तरावर करावी. सामाजिक न्याय विभागाने कामांच्या स्वरुपानुसार मंजूर निधी आणि प्रशासकीय मान्यतेबाबतची माहिती तसेच इतर अनुषंगिक बाबींसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीशी समन्वय साधावा. तसेच शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहांच्या नियोजित कामांचा सद्यस्थिती अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, असे निर्देश बनसोडे यांनी दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे हा ऐतिहासिक वारसा आहे. या वास्तूंच्या संवर्धनाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सदैव प्रेरणा आणि मार्गदर्शन देत राहील. ऐतिहासिक संदर्भांच्या दृष्टीनेही या इमारतींना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभाग आणि संस्थांनी समन्वयातून जतन व संवर्धनाची कामे करावीत, अशा सूचनाही विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी दिल्या.

केडीएमसी महासभा तहकूब, भाजपा-मनसेत राजकीय धुमश्चक्री

आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय कलगीतुरा; काँग्रेस-उबाठाकडूनही सवाल कल्याण : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविण्याच्या वादाचे पडसाद बुधवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत उमटले. भाजपा गटनेते शशिकांत कांबळे यांनी या मुद्द्यावरून महासभा स्थगित करण्याची मागणी केली. त्यानंतर महापौर हर्षाली थवील चौधरी यांनी बुधवारीची महासभा संपूर्ण दिवसासाठी तहकूब केली. महासभा तहकूब होताच भाजपा आणि मनसेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. केडीएमसीमध्ये शिवसेना आणि भाजपाची युती असून मनसेही शिवसेनेसोबतच्या आघाडीमुळे सत्तेचा भाग आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि मनसेमध्ये राजकीय संघर्ष वाढताना दिसत आहे. भाजपाकडून मनसेला सत्तेतून बाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. त्यावर मनसेकडून भाजपानेच सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान दिले जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. मनसे गटनेते प्रल्हाद म्हात्रे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. “इतका विरोध आहे तर सत्तेतून बाहेर पडा. सत्तेची मलाई खाण्यासाठी सत्तेत राहिला आहात. महापौर आम्ही बसवला आहे. आमच्याकडे बहुमत आहे, तुम्ही सत्तेतून बाहेर पडा,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजपा-मनसेच्या राजकीय वादावर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही प्रश्न उपस्थित केले. महासभेत नागरिकांच्या समस्या, शहरातील विकासकामे आणि महत्त्वाच्या नागरी प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असते. त्यामुळे राजकीय वादामुळे संपूर्ण दिवसाची महासभा तहकूब करणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. नागरी प्रश्न बाजूला ठेवून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना महत्त्व दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. भाजपा आणि मनसेमधील वाढता संघर्ष पाहता आगामी काळात केडीएमसीच्या सत्तासमीकरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः अडीच वर्षांनंतर सत्तेचे समीकरण काय राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भाजपा आणि मनसेमधील मतभेद वाढत राहिल्यास शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सध्या शिवसेनेकडून या घडामोडींवर लक्ष ठेवले जात असून ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र आहे. भाजपा-मनसेतील संघर्ष असाच वाढत राहिला, तर आगामी काळात केडीएमसीतील सत्तेचे समीकरण बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.