मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांचे मार्गदर्शन
ठाणे, मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्यावतीने शहरातील सावरकर नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यशाळेला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला उपमुख्य अभियंता राजकुमार पवार, सक्षम प्राधिकरण अधिकारी मिनल पालांडे, कार्यकारी अभियंता सलीम सय्यद, सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर, वास्तुविशारद निलेश सावंत यांच्यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे शहरात प्रभावीपणे कार्यरत असून, नागरिकांनी पुनर्वसन योजनेत सक्रिय सहभाग नोंदवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.प्राधिकरणामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची उद्दिष्टे, योजनेचे फायदे, पुनर्वसनाची प्रक्रिया, पात्रता निकष तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत पुनर्वसन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती दिली. तसेच, स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करून योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही प्राधिकरणामार्फत करण्यात आले. या कार्यशाळेत परिसरातील स्थानिक नागरिक, झोपडपट्टीधारक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
