शिवनेरी कबड्डी २०२६
अंतिम सामन्यात मुंबई पोस्टलची बाजी, वेस्टर्न रेल्वेला तीन गुणांनी नमवले
इतर गटात गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब आणि विवेक महिला संघाचे विजेतेपदावर शिक्कामोर्तब
मुंबई : शिवनेरी कबड्डी महोत्सवाच्या व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई पोस्टल संघाने वेस्टर्न रेल्वे संघाचा ३०-२७ असा पराभव करत तीन गुणांनी विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांमध्ये झालेल्या या अटीतटीच्या लढतीत चढाया आणि पकडींचा सुरेख खेळ पाहायला मिळाला. वेस्टर्न रेल्वेने मुंबई पोस्टलला कडवी झुंज दिली; मात्र निर्णायक क्षणी सरस खेळ करत मुंबई पोस्टलने विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुंबई पोस्टलच्या अक्षय तावडे याने चढाईत आक्रमक खेळ करत संघाच्या गुणसंख्येत भर घातली. त्याला पकडीत अक्षय बर्डे याने मोलाची साथ दिली. प्रतिस्पर्धी संघाच्या चढाया रोखताना मुंबई पोस्टलच्या बचावफळीने महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे, वेस्टर्न रेल्वेकडून प्रणय राणे याने चढाईत गुण मिळवण्यासाठी प्रयत्न केले, तर विजयंत याने पकडीत आपले कौशल्य दाखवले. वेस्टर्न रेल्वेने अखेरपर्यंत सामना जिंकण्यासाठी संघर्ष केला; मात्र मुंबई पोस्टलने आपली आघाडी कायम राखत ३०-२७ अशा तीन गुणांच्या फरकाने विजय मिळवला. या विजयासह मुंबई पोस्टलने शिवनेरी कबड्डी महोत्सवाच्या व्यावसायिक गटाचे विजेतेपद आपल्या नावावर केले.
कुमार गटाच्या अंतिम सामन्यात गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबने विजय क्लबवर सहा गुणांनी मात केली. गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबकडून चढाईत निलेश मोरे, तर पकडीत आदित्य धुमाळ यांनी प्रभावी कामगिरी केली. विजय क्लबकडून चढाईत दिलीप गुप्ता आणि पकडीत विजेंद्र यादव यांनी विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबने सरस खेळाच्या जोरावर विजेतेपद पटकावले.
दुसरीकडे महिला गटाच्या अंतिम सामन्यात विवेक महिला संघाने शिवशक्ती महिला संघाचा २८-२४ असा पराभव करत चार गुणांनी विजय मिळवला. विवेक महिला संघाकडून चढाईत तनू, तर पकडीत हरजीत कौर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिवशक्ती महिला संघाकडून चढाईत अदिती शिंदे आणि पकडीत पौर्णिमा जेधे यांनी चांगली कामगिरी केली. मात्र, विवेक महिला संघाने अखेरपर्यंत आघाडी कायम राखत विजेतेपदावर कब्जा केला.
संक्षिप्त धावफलक –
1. कुमार गट- गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब ३३ विजयी विरुद्ध विजय क्लब २७
2. महिला गट- विवेक महिला संघ २८ विजयी विरुद्ध शिवशक्ती महिला संघ २४
3. व्यावसायिक गट- मुंबई पोस्टल ३० विजयी विरुद्ध वेस्टर्न रेल्वे २७
