Category: Blog

Your blog category

पेन्शन दुरुस्तीसाठी मुंबईत विशाल प्रदर्शन

रमेश औताडे मुंबई : केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या विचारार्थ अटी व शर्तींमध्ये १ जानेवारी २०२६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन दुरुस्तीचा समावेश न केल्याने, देशभरातील केंद्र सरकारी पेन्शनधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याविरोधात ‘रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशन’ व ‘नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शनर्स असोसिएशन’  च्या वतीने २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  येथील मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयावर विशाल प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाद्वारे पेन्शन अधिनियम प्रमाणीकरण कानून तात्काळ रद्द करण्याची, आठव्या वेतन आयोगाच्या (विचारार्थ अटी) मध्ये सुधारणा करण्याची, १ जानेवारी २०२६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनर्सच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्याची, ५० टक्के मूळ वेतन व पेन्शनमध्ये समाविष्ट करण्याची आणि २५ टक्के अंतरिम मदत त्वरित देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या सर्व विभागांतील रेल्वे पेन्शनर्ससह केंद्र सरकारी पेन्शनधारकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जोनल अध्यक्ष एन. हरिदासन, जोनल कार्याध्यक्ष  अरविंद माने आणि जोनल महामंत्री आर. के. सारस्वत यांनी केले आहे. 0000

७ सप्टेंबरला ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे आयोजन

 निवेदन २२ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे नागरिकांना आवाहन ठाणे : ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार, ७ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी म्हणजेच २२ ऑगस्ट पर्यंत त्यांचे अर्ज-निवेदने महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावेत. निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदना सोबत प्रपत्र-१ (ब) सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र-१ (ब) नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक क्र. प्रसुधा-१०९९/सीआर-२३/९८/१८-अ, दिनांक २६ सप्टेंबर २०१२ नुसार माहे डिसेंबर- २०१२ पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचे निवेदन न स्विकारता, हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये, परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत, तसेच ज्या निवेदनावर १ महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी, एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक, विविध न्यायालयात, लोकआयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे, तसेच राजकीय पक्षाच्या, नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी केलेला अर्ज, तक्रार वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

Heading – सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाला महाराष्ट्राचा सलाम

 इंद्रेश कुमार व पाल्गा रिंपोचे यांचा ५ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळ्या’त गौरव मुंबई | प्रतिनिधी दि-४ ऑगस्ट लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक सिंधू महाकुंभात संपूर्ण देशात राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, सर्वपंथ समभाव आणि भारतीय सांस्कृतिक ऐक्याचा प्रभावी संदेश दिला. या ऐतिहासिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार तसेच बौद्ध  आध्यात्मिक धर्मगुरू पाल्गा रिंपोचे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी “राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सन्मान सोहळा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने आज सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत सचिवालय जिमखाना, विधान भवन शेजारी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार असून, त्यांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सिंधू महाकुंभाच्या माध्यमातून देशभरात राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि भारतीय संस्कृतीतील विविधतेतून एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. सिंधू नदीच्या पवित्र तीरावर विविध धर्म, पंथ आणि संस्कृतींच्या प्रतिनिधींनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. बौद्ध आध्यात्मिक गुरू पाल्गा रिंपोचे यांच्या हस्ते संपन्न झालेले सिंधू पूजन आणि इंद्रेश कुमार यांच्या दीर्घकालीन प्रयत्नांमुळे या महाकुंभाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि सर्वपंथ समभावाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचावा, या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला  आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात अधिक दृढ व्हावा, विविध धर्म-पंथांमध्ये परस्पर विश्वास आणि संवाद वाढावा तसेच भारतीय संस्कृतीतील “विविधतेत एकता” हा विचार अधिक बळकट व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा “राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळा” महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Heading – रमेश म्हात्रे यांच्या जामिनावरील स्थगिती कायम

 फिर्यादीच्या बाजूने नवा ट्विस्ट, उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश कल्याण :  मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर आज सुओ मोटू याचिका क्र. १/२०२६ मध्ये रमेश म्हात्रे प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान रमेश म्हात्रे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. याचवेळी या प्रकरणात प्रथमच मूळ फिर्यादी डॉ. वैभव साळुंखे यांच्या वतीने स्वतंत्रपणे न्यायालयात प्रतिनिधित्व करण्यात आले. फिर्यादीच्या वतीने ॲड. अभिनय रविंद्र अडसूळ, ॲड. अक्षय भालेराव, ॲड. विवेक निशाद, ॲड. श्रीराम चिंदारकर, ॲड. गणेश नागरगोजे तसेच ॲड. गणेश तिवारी यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. फिर्यादीच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. अक्षय भालेराव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, फिर्यादीच्या जीवाला गंभीर धोका असून त्यांना वारंवार बीएनएसएस कलम १८३ अंतर्गत जबाब नोंदविण्यासाठी कल्याण येथे उपस्थित राहण्याचे पोलिसांकडून फोन येत आहेत. आरोपी हा प्रभावशाली राजकीय व्यक्ती असून त्याच्या समर्थकांकडून फिर्यादीला पूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचाही मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला. त्यामुळे फिर्यादीचा जबाब कल्याण येथे नोंदविण्याऐवजी त्यांच्या मूळ गावाजवळील सक्षम न्यायिक दंडाधिकाऱ्यासमोर नोंदविण्यात यावा आणि त्यासाठी आवश्यक पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपासाबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविली. सध्या या प्रकरणाचा तपास विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे सुरू होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून हा तपास काढून घेऊन तो डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार यापुढील तपास डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येणार आहे. याशिवाय, न्यायालयाने फिर्यादी डॉ. वैभव साळुंखे यांचा बीएनएसएस कलम १८३ अंतर्गत जबाब त्यांच्या मूळ जिल्ह्यातील सक्षम मॅजिस्ट्रेट न्यायालयामार्फत नोंदविण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले. तसेच जबाब नोंदविताना फिर्यादीला आवश्यक पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. याप्रसंगी न्यायालयाने फिर्यादीस स्वतःची बाजू मांडण्यासाठी आवश्यक अर्ज  दाखल करण्यासाठी मुदत दिली. तसेच रमेश म्हात्रे यांच्या जामिनावरील यापूर्वीची स्थगिती कायम ठेवत पुढील सुनावणी ३१ जुलै २०२६ (शुक्रवार) रोजी निश्चित केली. या सुनावणीनंतर प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, रमेश म्हात्रे यांच्या जामिनावरील स्थगिती कायम राहणे, तपास डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याचे निर्देश, फिर्यादीचा जबाब त्यांच्या मूळ जिल्ह्यात नोंदविण्याचा निर्णय, फिर्यादीला पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश तसेच फिर्यादीस स्वतःची बाजू मांडण्यासाठी अर्ज दाखल करण्यास न्यायालयाने दिलेली परवानगी यामुळे या प्रकरणाकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. ००००

डोंगरी म्युनिसिपल शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दिंडीत दुमदूमला हरीनामाचा गजर

दिनेश मराठे मुंबई : दक्षिण मुंबईतील डोंगरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त विठू नामाचा गजरकरीत डोंगरी परिसरात दिंडी सोहळा साकारला. या दिंडी सोहळ्यात एका फुलांनी सजविलेल्या एका खास पालखीत श्री हरी विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती विराजित केले होते. यावेळी स्पीकर्सवरील ढोल ताशाच्या वादनाने संगीतमय वातावरणात मुलींनी लेझिम खेळत पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या तसेच रस्त्याच्या धुतर्फा उभे राहून पालखी सोहळ्याचा आनंद घेणाऱ्या लोकांचे लक्ष वेधलेच नव्हे तर त्यांच्या कौतुकाची टाळयांच्या गजरात झालेल्या स्वागतमय  कमान उभारली. यावेळी मुलींनी खास करून जय जय राम कृष्ण हरिचा जप केला.तर काही मुलांनी विठ्ठलाचे अभंग गात वातावरण भक्तीमय केले. या दिंडी सोहळ्यात शाळेतील महिला शिक्षिकांनी विशेष मेहनत घेत मुलींना नटवले होते.प्रत्येक मुलीने नेसलेली नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, गळ्यातील इमिटेशन ज्वेलरी दागिने,कानातील कर्ण फुले, हातातील बांगड्या आणि चेहऱ्यावर साजेसा शृंगार यांच्यासह सादर केलेल्या लेझिम नृत्याचा सुरेख संगम पाहताना एक अनोखा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर होता. डोईवर भरलेल्या पाण्याच्या घागरी, कलश आणि तुळशी वृंदावन, मुलांच्या हातातील भगवी केशरी अशी भागवत संप्रदयाची धर्मध्वजा, मुखाने होणारा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संत शिरोमणीचा जय घोष आणि भेटी लागी जीवा अशी पंढरपूरातील सावळ्या विठ्ठल रखुमाईला घातलेली आर्त साद ही वरुणाच्या वर्षावात जलधारांच्या अभिषेकात  वातावरणात विठ्ठलमय झाले होते.

Heading – ठाणे जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास सुरुवात

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक अशोक गायकवाड ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सन २०२६-२७ या वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास औपचारिक सुरुवात झाली असून, या स्पर्धांचे बिगुल वाजले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा क्रीडा परिषदेची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे अत्यंत प्रभावी आयोजन, सुटसुटीत नियोजन व कडक अंमलबजावणी करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी स्पर्धा सर्व दृष्टीने यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करणे, विविध सरकारी व क्रीडा विभागांमध्ये उत्तम समन्वय राखणे, स्पर्धास्थळांची योग्य तयारी करणे आणि सहभागी खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवणे या बाबींना प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. तसेच सर्व स्पर्धा वेळेत आणि अत्यंत नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्याबाबत त्यांनी उपस्थित अधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी-खेळाडूंना या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा संघटना आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आयोजनाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील क्रीडापटूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. या बैठकीस जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, ठाणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती निलम वाव्हळ, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी भाऊराव मोहिते, प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी अनिल कुऱ्हाडे, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर, जिल्हा खो-खो संघटनेचे प्रतिनिधी विकास कोळी व कमलाकर कोळी, जिल्हा क्रीडा परिषदेचे सर्व सदस्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘वेक अप ठाणेकर’चा आज डेटा सेंटरविरोधात एल्गार

अनिल ठाणेकर ठाणे, जनमत न घेता नागरी वस्तीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डेटा सेंटरविरोधातील ठाणेकरांचा संताप आता रस्त्यावर दिसणार आहे. वेक अप ठाणेकर या संघटनेच्या पुढाकाराने शनिवारी सकाळी १० वाजता प्रस्तावित डेटा सेंटरच्या भूखंडासमोर, बाळकूम येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. पूर्णपणे अराजकीय असलेल्या या आंदोलनात हजारो ठाणेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती वेक अप ठाणेकर या संस्थेच्या वतीने देण्यात आली. बाळकूम येथील ५३ एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज १२ दशलक्ष लिटर्स शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, या डेटा सेंटरमधून वर्षाचे ३६५ दिवस, दिवसाचे २४ तास ९० डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती  महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे.  युरोप अमेरिकेतून हद्दपार केलेला हा प्रकल्प ठाण्यात आणण्यामागे नक्की कारण काय आहे, असा सवाल करून या प्रकल्पाविरोधात शनिवारी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय ठाणेकरांनी घेतला आहे, असे वेक अप ठाणेकरचे दयानंद नेने, साधनाताई प्रधान,  राजेश कदम, मेघना शेट्टी, हिमानी वर्मा, जतीन कोठारे,  गुरासिस बुमरा, लावण्या पाटील यांनी सांगितले. शनिवारी सकाळी १०.०० वाजता कल्पतरू, बाळकूम येथील डेटा सेंटरबाहेर परिसरातील नागरिक निदर्शने करणार आहेत. या आंदोलनात किमान १ हजार नागरिक सहभागी होतील, असे वेक अप ठाणेकरच्या वतीने सांगण्यात आले. ००००००००००० ००००००००

Heading – इनरव्हील क्लब चा ‘अन्नपूर्णा: हॅप्पी हंड्रेड’ कार्यक्रम

 विमानतळ कर्मचारी आणि तृतीयपंथीयांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप मुंबई दि. (प्रतिनिधी): प्रयास एक कोशिश या संस्थेच्या सहकार्याने दि इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तियारा यांनी ‘अन्नपूर्णा : हॅप्पी हंड्रेड’ हा प्रकल्प…

वरुन कुणाचा दबाव आहे का? भाजप पदाधिकाऱ्यावर बलात्कार, फसवणूकीसारखे गंभीर आरोप

 अटक करण्याच्या मागणीसाठी शिवसेना मैदानात मुंबई, दि.(प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर बलात्कार, फसवणूकीसारखे गंभीर आरोप असूनही त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही म्हणून त्याच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब…