१२ अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे शहर वाहतूक विभागातील पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदलीचे आदेश पोलिस उपआयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी जारी केले आहेत. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांनुसार एकूण १२ पोलिस निरीक्षकांना विविध वाहतूक उपविभागांमध्ये नव्याने नियुक्त करण्यात आले आहे. हे आदेश ८ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आले असून तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत.
बदल्यांनुसार पोनि. संजय महादेव जाधव यांची कळवा वाहतूक उपविभागातून राबोडी वाहतूक उपविभागात, पोनि. विजयकुमार देशमुख यांची वाहतूक नियंत्रण कक्षातून वागळे वाहतूक उपविभागात, तर पोनि. मिलिंद झांजे यांची कल्याण वाहतूक उपविभागातून कोळसेवाडी वाहतूक उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पोनि. राजू पिंगारे, पोनि. जयपालसिंग राजपूत, पोनि. कृष्णदत्त डखोळे, पोनि. उमेश सावंत, पोनि. युवराज म्हसे, पोनि. दामोदर घने, पोनि. विजय अहिरे, पोनि. अंकुश हुल्के आणि पोनि. रणजित नलवडे यांच्या देखील विविध वाहतूक उपविभागांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. पोनि. रणजित नलवडे यांची प्रशासन शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू होऊन कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आणि प्रशासकीय गरज लक्षात घेऊन या बदल्या करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
