Category: महाराष्ट्र

Maharashtra News

नाट्य संपदा

विनोदाच्या रंगात रंगलेलं रहस्यमय नाटक! ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ मराठी रंगभूमीला विनोदी नाटकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या प्रवाहाला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने समृद्ध करणारे दिग्दर्शक आणि कलाकार लाभले आहेत. त्यामुळे विनोदी नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक रंगमंदिरातून मनमुराद हसून, हलक्याफुलक्या मनाने बाहेर पडतो. विनोदी नाटकाचे दोन हुकमी एक्के—दिग्दर्शक संतोष पवार आणि अभिनेते भाऊ कदम यांचं नवं कोरं नाटक ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ सध्या रंगभूमीवर दाखल झालं आहे. नाटकाचं नाव ऐकल्यावर प्रेम, लग्न आणि विवाहबाह्य संबंधांभोवती फिरणारी कथा असेल,असा अंदाज प्रेक्षक बांधू शकतो. मात्र, नाटकाचं शीर्षक ज्या दिशेने घेऊन जातं, त्यापेक्षा प्रत्यक्ष रंगमंचावर काहीतरी वेगळंच पाहायला मिळतं. विनोदाला रहस्याची जोड देत कथा पुढे सरकते आणि प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.मोहन, त्याची पत्नी स्वाती आणि मुलगी आदिती असं हे कुटुंब. काळाच्या ओघात मोहनच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडते आणि त्याच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं. मात्र, आपल्या मुलीला सांभाळत तो एकटाच आयुष्याचा प्रवास सुरू ठेवतो. वडिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद यावा,  यासाठी आदिती एक   निर्णय घेते. या निर्णया मुळे मोहनच्या आयुष्यातील भूतकाळाचा वर्तमानाशी काय संबंध आहे? आदितीचा निर्णय पुढे काय वळण घेतो?  आणि या सगळ्यामागे दडलेलं गूढ काय आहे? या प्रश्नांची उत्तरं मात्र नाटक पाहतानाच मिळतात.विशेष म्हणजे कथेत जाणवणारी एक अदृश्य उपस्थिती प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करत राहते. तिचं गूढ उलगडणं ही नाटकाची महत्त्वाची रंगत आहे. त्यामुळे कथानकाचा पुढचा भाग सांगून नाटकाची मजा घालवण्यापेक्षा हा रहस्यमय विनोदी  नाट्यप्रवास रंगमंचावर अनुभवणंच अधिक योग्य! संतोष पवार यांनी कौटुंबिक नात्यांमधील भावनिक पदर आणि विनोदाची लय यांचा सुरेख मेळ साधला आहे. भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घालताना प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवणं हे दिग्दर्शनाचं मोठं आव्हान असतं. हे आव्हान पवार यांनी प्रभावीपणे पेललं आहे.प्रत्येक कलाकारानं कडून उत्तम अभिनय करून घेतला आहे भाऊ कदम म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर विनोदाची एक वेगळीच शैली उभी राहते. ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ या नाटकातही त्यांच्या अभिनयाची हीच सहजता प्रकर्षाने जाणवते. मोहन ही व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी केवळ विनोदावर भर न देता त्याच्या मनातील भावनिक कोंडी, एकटेपणा आणि नात्यांमधील गुंतागुंतही प्रभावीपणे उभी केली आहे. त्यांची संवादफेक, प्रसंगानुरूप देहबोली आणि चेहऱ्यावरचे भाव यामुळे विनोदी प्रसंग अधिक खुलतात. भाऊ कदम यांच्या अभिनयातील सहजपणा ही या प्रयोगाची मोठी जमेची बाजू आहे. त्यांच्या रंगमंचावरील उपस्थितीने प्रसंगाला वेगळीच रंगत येते आणि प्रेक्षकांशी त्यांचा सहज संवाद निर्माण होतो.मैथिली वारंग, सुजाता किरण, पूनम सरोदे परब आणि साकार देसाई यांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने व्यक्तिरेखेला योग्य न्याय देत नाटकाच्या एकूण सादरीकरणाला पूरक साथ दिली आहे. लेखक स्वप्नील बारसकर यांनी विषयाची मांडणी हलक्याफुलक्या शैलीत केली आहे. संवादांमधून विनोद निर्माण करतानाच नात्यांमधील बारकावे टिपण्याचा प्रयत्न दिसून येतो. विशेष म्हणजे विनोद आणि रहस्य यांचा समतोल राखत कथा पुढे नेण्यात लेखनाची भूमिका महत्त्वाची ठरते. नाटकाची तांत्रिक बाजूही कथेला पूरक ठरते. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत यांचा योग्य वापर करण्यात आला आहे. प्रसंगानुरूप वातावरणनिर्मिती होत असल्याने नाटकाच्या सादरीकरणाला उठाव मिळतो. पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ हे नावापेक्षा वेगळा अनुभव देणारं, हलक्याफुलक्या विनोदातून प्रेम, लग्न आणि नात्यांकडे पाहणारं मनोरंजनप्रधान रहस्यमय नाटक आहे. गंभीर विषयाचा बोजडपणा न आणता विनोद आणि रहस्य यांची सांगड घालत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न या प्रयोगातून केला आहे. संपदा सावंत

– दक्षिण आफ्रिकेत रंगणार ज्युनिअर इनडोअर क्रिकेटचा विश्वकप!

वर्ल्ड इनडोअर क्रिकेट फेडरेशनच्या मान्यतेने  सात देश, पाच वयोगट आणि युवा क्रिकेटपटूंसाठी जागतिक व्यासपीठ प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका : जगभरातील युवा इनडोअर क्रिकेटपटूंच्या कौशल्याची खरी कसोटी ठरणारी वर्ल्ड इनडोअर क्रिकेट फेडरेशनची ज्युनिअर वर्ल्ड सिरीज २०२६ येत्या २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथील यू-प्रो ॲटरबरी ॲक्शन स्पोर्ट्स एरिना येथे रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) असे सात देश या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने युवा इनडोअर क्रिकेटचा हा जागतिक महाकुंभ ठरणार आहे. वर्ल्ड इनडोअर क्रिकेट फेडरेशन (WICF) मान्यतेने इनडोअर क्रिकेट साऊथ आफ्रिका (ICSA) यांच्या आयोजनातून ही स्पर्धा होत आहे. इनडोअर क्रिकेटमधील बलाढ्य ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांसारख्या मजबूत संघांविरुद्ध खेळाडूंना खेळण्याचा अनुभव मिळणार आहे. भारत, श्रीलंका आणि यूएईचा सहभाग असल्याने प्रत्येक सामना कौशल्य, वेग, रणनीती आणि मानसिक ताकदीची परीक्षा घेणारा ठरणार आहे. जागतिक स्तरावर आपली ताकद सिद्ध करण्यासाठी सातही देशांचे युवा खेळाडू सज्ज झाले आहेत. या जागतिक स्पर्धेत पाच वयोगटांमध्ये सामने खेळविण्यात येणार आहेत. १३ वर्षांखालील मुलांचा, १५ वर्षांखालील मुलांचा व मुलींचा, तसेच १७ वर्षांखालील मुलांचा व मुलींचा समावेश आहे. त्यामुळे विविध वयोगटातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेची प्रशासकीय आणि कार्यकारी राजधानी प्रिटोरिया या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. यू-प्रो ॲटरबरी ॲक्शन स्पोर्ट्स एरिना येथे सात देशांतील युवा खेळाडू आमनेसामने येतील. आपल्या देशाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी हा अनुभव अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण असणार आहे. जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होणे ही निश्चितच मोठी कामगिरी आहे; मात्र खरी परीक्षा प्रिटोरियाच्या मैदानावर होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्य, वेगवान निर्णयक्षमता, सांघिक खेळ, दबाव हाताळण्याची क्षमता आणि निर्णायक क्षणी योग्य खेळ करण्याचे कौशल्य या सर्व बाबींची कसोटी लागणार आहे. सात देश, पाच वयोगट आणि आठ दिवसांचा जागतिक इनडोअर क्रिकेटचा थरार अशी या स्पर्धेची भव्यता आहे. मात्र या स्पर्धेचे खरे महत्त्व पदक किंवा विजेतेपदापलीकडे आहे. युवा खेळाडूंच्या भविष्यातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा पाया मजबूत करण्याची ही मोठी संधी आहे. २६ सप्टेंबरपासून प्रिटोरियात भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे प्रशिक्षक, निवडकर्ते आणि इनडोअर क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक सामना त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची संधी असेल. देशासाठी खेळताना मिळणारा हा अनुभव भविष्यातील मोठ्या स्पर्धांसाठी त्यांना अधिक सक्षम करणार आहे. २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रिटोरिया येथे इनडोअर क्रिकेटच्या युवा विश्वातील सर्वोत्तम प्रतिभेचा सामना पाहायला मिळणार आहे. जागतिक मंच सज्ज आहे, सात देश मैदानात उतरणार आहेत आणि युवा खेळाडूंच्या स्वप्नांना आता प्रत्यक्ष कामगिरीची जोड द्यायची आहे. प्रिटोरियातील ही स्पर्धा अनेक युवा खेळाडूंसाठी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची पहिली मोठी ओळख ठरण्याची शक्यता आहे असे भारतीय आयआयएसएफचे अध्यक्ष सेट्रिक जो, सेक्रेटरी प्रसन्ना कुमार, चेअरमन अजय नाईक व माजी सेक्रेटरी मिलिंद पुंजा यांनी स्पष्ट केले.

जि.प. नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना राज्यस्तरीय एस. एस. गडकरी पुरस्कार

हरिभाऊ लाखे नाशिक : सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (IIPA), महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित एस. एस. गडकरी पुरस्कार २०२५-२६ नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना जाहीर झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या नवचेतना अभियान आणि पोषणदूत या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. समाजातील सर्वात दुर्बल घटकांची ओळख करून त्यांच्यापर्यंत विद्यमान शासकीय योजना व सेवांचा प्रभावी समन्वय साधत प्रत्यक्ष परिणाम घडवून आणणे, हे या उपक्रमांचे वैशिष्ट्य आहे. नवीन योजना निर्माण करण्याऐवजी उपलब्ध शासकीय यंत्रणा, निधी आणि योजनांचा एकत्रित वापर करून गरजू लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमांची आखणी करण्यात आली. नवचेतना अभियानाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील एकल महिला, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व प्रौढ अविवाहित महिलांचे सर्वेक्षण करून १,०६,००० महिलांची माहिती संकलित, वर्गीकृत व मॅप करण्यात आली. या महिलांच्या गरजेनुसार त्यांना रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षण, सामाजिक पुनर्वसन आणि बालसंगोपनाच्या विविध योजनांशी जोडण्यात आले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ३७ बचत गट क्लस्टर्सना शून्य व्याजदराने एकूण १.१८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. सामाजिक पुनर्वसनासाठी तीन मोफत व जातिनिरपेक्ष वधू-वर परिचय मेळावे आयोजित करण्यात आले, त्यातून सात पुनर्विवाह देखील संपन्न झाले आहेत. विधवांच्या सन्मानासाठी सौभाग्य शपथपत्र या उपक्रमातून ९१५ ग्रामपंचायतींनी विधवांबाबत असणाऱ्या असामाजिक प्रथा बंद करण्याबाबत ठराव केले आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात ३१ गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची उच्च शिक्षण शिष्यवृत्ती देण्यात आली. ३२२ मुलींना सायकलींचे वितरण करण्यात आले असून बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून १५,००६ बालकांना दरमहा २,२५० रुपये सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. ००००

आश्रमशाळा-वसतिगृहांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा महामंडळाचे रक्षक नेमा — विवेक पंडित

 मुलींच्या निवासी परिसरात प्रशिक्षित तृतीयपंथीय सुरक्षा रक्षकांना संधी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी योगेश चांदेकर पालघर: राज्यातील शासकीय आश्रमशाळा आणि आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक २४ तास तैनात करावेत आणि मुलींच्या निवासी परिसरात विशेष बाब म्हणून पात्र व प्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना सुरक्षा रक्षक म्हणून रोजगाराची संधी द्यावी, अशी मागणी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी कुटुंबापासून दूर निवासी स्वरूपात राहत असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे सर्व शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांचे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत सुरक्षा लेखापरीक्षण (Security Audit) करून विद्यार्थी संख्या, इमारती, प्रवेशद्वारे व परिसराची संवेदनशीलता लक्षात घेऊन आवश्यक सुरक्षा मनुष्यबळ निश्चित करावे, असे पंडित यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मुलांच्या आश्रमशाळा व वसतिगृहांत पुरुष सुरक्षा रक्षक तैनात करावेत. मुलींच्या निवासी परिसरासाठी विशेष बाब म्हणून इच्छुक व पात्र तृतीयपंथीय व्यक्तींची निवड करून त्यांना प्रशिक्षण, चारित्र्य पडताळणी, समान वेतन व सेवाशर्तींसह सुरक्षा रक्षक म्हणून संधी द्यावी, अशी अभिनव सूचना पंडित यांनी केली आहे. “यातून आदिवासी विद्यार्थिनींची सुरक्षा अधिक सक्षम करण्याबरोबरच तृतीयपंथीय समुदायाला सन्मानजनक व नियमित रोजगाराची संधी उपलब्ध होईल,” असे पंडित यांनी म्हटले आहे. सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी आवश्यक सुरक्षा रक्षकांची संख्या, शिफ्टनिहाय गरज आणि वार्षिक आर्थिक भाराचा प्रस्ताव १५ दिवसांत तयार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 0000

८१ वर्षांच्या वृद्धाची स्वतःच्या जमिनीच्या हक्कासाठी थेट पंतप्रधानांकडे धाव

 मिरा-भाईंदर मनपा नगररचना विभागाचा भोंगळ कारभार उघड! मिरा-भाईंदर मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि स्थानिक नगररचना विभागातील भ्रष्ट कारभाराचा आणि भू-माफियांच्या साखळीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची ‘सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स’ आणि ‘स्वयम बिल्डर्स’ यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे मिरा-भाईंदरमधील एका ८१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला आपली हक्काची जमीन वाचवण्यासाठी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घ्यावी लागली आहे. ८१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक असगरअली व्होरा यांना आपल्या हक्काच्या जमिनीसाठी तब्बल ४० वर्षे संघर्ष करावा लागत आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी न्याय शोधणारे तक्रारदार यांनी नुकतीच पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना पत्र सादर केले आहे. या पत्रातील गंभीर आरोपांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तक्रारदाराने १९८९ मध्ये नवघर रोड, भाईंदर (पूर्व) येथील जुना सर्व्हे क्र. २४० (नवा सर्व्हे क्र. १८५), हिस्सा क्र. ६ मधील सुमारे २,८१० चौ.मी. जागा रीतसर नोंदणीकृत कराराद्वारे खरेदी केली होती. ही जमीन त्यांनी कधीही कोणालाही विकलेली अथवा हस्तांतरित केलेली नाही. असे त्यांनी पत्रात नमूद केलेले आहे. २०११ च्या सुमारास ‘स्वयम बिल्डर्स’च्या संगनमताने या जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले. याप्रकरणी २०१५ मध्ये एफआयआर दाखल झाला; मात्र तब्बल ११ वर्षांनंतर, म्हणजेच २०२६ मध्ये याचा सीआयडी अहवाल प्राप्त झाला. या विलंबामागे पालिकेतील आणि महसूल विभागातील कोणत्या अदृश्य शक्तींचा हात होता, असा सवाल ८१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक असगरअली व्होरा यांनी उपस्थित केला आहे. मूळ मालकाला अंधारात ठेवून या जमिनीचे दोन भाग करण्यात आले, ज्यातील एका भागावर ‘स्वयम बिल्डर्स’ आणि दुसऱ्या भागावर ‘सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स’चा कब्जा दाखवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तक्रारदाराला कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा त्यांची बाजू न ऐकता २०२५ मध्ये त्यांच्यावरच उलट गुन्हा दाखल करण्यात आला. मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि महसूल विभाग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत का? बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी ८१ वर्षांच्या वृद्धालाच छळण्याचे धोरण प्रशासन का राबवत आहे? असा सवाल सध्या मिरा-भाईंदर मनपा नगर रचना विभागाचा भोंगळ कारभारासंदर्भात निर्माण होत आहे. जर एका ज्येष्ठ नागरिकाला स्वतःच्या जमिनीसाठी देशाच्या पंतप्रधानांकडे गाऱ्हाणे मांडावे लागत असेल, तर मिरा-भाईंदरमधील नगररचना विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे, हेच यातून सिद्ध होते. आता या ‘सेव्हन इलेव्हन’च्या संशयास्पद व्यवहारांवर आणि पालिकेच्या भ्रष्ट कारभारावर सीबीआय चौकशीची कुऱ्हाड चालवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 0000

कॅन्सरविरुद्धची लढाई केवळ आजाराशी नसते, तर भीती, एकटेपणा आणि अनिश्चिततेशीही असते

मिरा -भाईंदर कॅन्सरचे निदान झाल्याचे समजताच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात अनेक प्रश्न, भीती आणि अनिश्चितता निर्माण होतात. शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि औषधोपचारांसोबतच रुग्णाला भावनिक बळ, आपलेपणा आणि या लढाईत आपण एकटे नाही, हा विश्वासही आवश्यक असतो. याच भावनेतून वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड यांच्या वतीने भावनिक आधार देणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप मीट-अपचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ४० हून अधिक कॅन्सर रुग्ण, कॅन्सरवर मात केलेले सर्व्हायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला. हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर अशा व्यक्तींसाठी एक विश्वासाचे व्यासपीठ होते, जिथे त्यांनी आपल्या वेदना, अनुभव, भीती आणि आशा एकमेकांशी मोकळेपणाने शेअर केल्या. कोणाच्या अनुभवात संघर्ष होता, तर कोणाच्या कथेत विजयाची आशा होती. अनेक रुग्णांसाठी आपल्यासारख्याच परिस्थितीतून जाणारे इतरही अनेकजण आहेत, ही जाणीव अत्यंत महत्त्वाची ठरली. यावेळी डॉ. अदिती अग्रवाल म्हणाल्या, “कॅन्सरवरील उपचार केवळ आजार दूर करण्यापुरते मर्यादित असू नयेत. रुग्णाला पुन्हा आत्मविश्वासाने सामान्य आयुष्याकडे परतण्यास मदत करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या भावना आणि संघर्ष समजून घेणाऱ्या व्यक्तींशी जेव्हा रुग्ण संवाद साधतात, तेव्हा या प्रवासात आपण एकटे नाही, ही भावना त्यांना मोठे मानसिक बळ देते.” डॉ. प्रियंक चवाथे म्हणाले, “वैद्यकीय विज्ञान कॅन्सरवर उपचार करू शकते; मात्र मानवी नातेसंबंध आणि भावनिक आधार रुग्णाच्या रिकव्हरीच्या प्रवासाला अधिक बळकटी देऊ शकतात. सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांना आपले अनुभव शेअर करण्याची, भीतीवर मात करण्याची आणि नव्या आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी मिळते.” या उपक्रमातून एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला—कॅन्सरवरील वैद्यकीय उपचार हॉस्पिटलमध्ये संपले तरी रुग्णाचा भावनिक प्रवास तिथे संपत नाही. कुटुंबाचा आधार, समुपदेशन, पुनर्वसन आणि समाजाचे सहकार्य यामुळे रुग्णाला उपचारानंतर नव्या आत्मविश्वासाने आयुष्य जगण्याची ताकद मिळू शकते. 0000

 भक्ती, स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासह गणेशोत्सव साजरा करा

एमबीएमसीचे सर्व विभाग सज्ज – आयुक्त राधा विनोद शर्मा मिरा-भाईंदर : आगामी गणेशोत्सव शांततेत, भक्तिभावाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्तांनी सांगितले की, यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या सर्व विभागांची तयारी पूर्ण झाली आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने सुसज्जित व्यवस्था केली आहे. कृत्रिम तलावांची पाहणी: शहरातील विविध विसर्जन स्थळांवर कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. आयुक्तांनी स्वतः पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत या तलावांची पाहणी केली. तलावांची खोली, पाणी, सुरक्षा व्यवस्था तपासण्यात आली. पर्यावरण संरक्षण हा उद्देश: पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी कृत्रिम तलावातच विसर्जन करावे, असे आवाहन त्यांनी केले. कायदा व सुव्यवस्था: विसर्जनाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, लाईट, मंडप आणि क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सव हा भक्तीचा उत्सव आहे, तो स्वच्छता राखून आणि पर्यावरण जपून साजरा करूया, असे आवाहन आयुक्त शर्मा यांनी शेवटी केले.

एमके इव्हेंटचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उदघाटन!

उलवे :  एमके इव्हेंटचे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांच्या हस्ते मंगळवारी उदघाटन झाले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मुलींनी व्यवसायात पदार्पण करणे, ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. सध्याचा जमाना…

रायगडच्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण-क्रीडेसाठी मदतीचा हात

मराठा वॉरिअर्स गडकिल्ले संवर्धक आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा पुढाकार दिवा : दिव्यातील मराठा वॉरिअर्स गडकिल्ले संवर्धक, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाडे, वाड्या- वस्त्या तसेच शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व क्रीडा साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणे तसेच क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून त्यांच्या शारीरिक आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. उपक्रमादरम्यान अंगणवाडी तसेच प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, कॅमलिन ड्रॉईंग बुक यांसह लहान मुलांसाठी विविध खेळण्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम निर्माण व्हावे आणि त्यांच्या शारीरिक विकासाला चालना मिळावी, यासाठी क्रिकेट बॅट-बॉल, फुटबॉल, बॅडमिंटन किट, कॅरम तसेच स्किपिंग रोप आदी क्रीडा साहित्याचेही वाटप करण्यात आले. उपक्रमाच्या नियोजनानुसार रविवारी सुतारवाडी, वाकी आदिवासी वाडी, कामत आदिवासी वाडी आणि बाईत आदिवासी वाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांसह स्थानिक रहिवाशांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर सोमवारी पातरशेत आदिवासी वाडी, स्थानिक जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्य वितरित करण्यात आले. या सामाजिक उपक्रमासाठी कै. एकनाथ भगत तसेच ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष अजित भगत यांचे विशेष सहकार्य लाभले. संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष राहुल दत्ताराम खैर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व सदस्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी उपाध्यक्ष रोहित जाधव, कार्याध्यक्ष नितीन शिवगण, सेक्रेटरी अमित गुरव, उपसेक्रेटरी रोहित खैर, मीडिया प्रमुख अभिजित गावडे व सुमित गावडे, संपर्कप्रमुख रवींद्र शिंदे तसेच सचिन गावडे, कार्तिक गोसावी, कलाप्पा चौगुले, यश खैर, रोहन खैर आणि रोशन खैर आदी सदस्य उपस्थित होते. उपक्रमावेळी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, स्थानिक ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि क्रीडेसाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला तसेच सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा हा तीन दिवसीय सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला. सर्व नियोजित कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी परतीचा प्रवास केला.

मांडा, टिटवाळा येथील २० वीज चोरांवर गुन्हा दाखल

कल्याण : महावितरण कडून वारंवार आवाहन करूनही चुकीच्या मार्गाने वीज वापरणाऱ्या मांडा, टिटवाळा परिसरातील २० वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरण कडून रितसर मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मांडा, टिटवाळा परिसरात वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी सहायक अभियंता तुकाराम घोडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासणी केली. तपासणी दरम्यान बहुतांश वीज ग्राहक चोरी करुन वीज वापर करीत असल्याचे आढळून आले. महावितरण कडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत पांडुरंग अंगम, प्रविण जा़धव, अमीना बी अख्तर, आरती शर्मा, रेणू शुक्ला, मोहम्मद मलिक अजगर अली, राबिया अन्सारी, रोषन कलसुकर, सुमित्रा भगत, मोहम्मद अयुब, अल्फिया डेव्हलपर, ए.एस.बाबा इलेक्ट्रिकल, जगदीश धुमाळ, सुनील शिंदे, विनायक पाटील, सुनील खरात, जयश्री जाधव, किशोर राठोड, आकाश पाल या वीज ग्राहकांनी महावितरणची ८७८३ युनिटची वीज चोरून वापरली अशी फिर्याद महावितरण कडून देण्यात आली आहे. मुरबाड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.