रस्त्यावर कचरा टाकल्यास दुकानदारांना बसणार दंड
 नगरसेवक ऍड. आदेश भगत यांच्या मागणीला यश
दिवा,: मागील काही वर्षांत दिवा शहराचे झपाट्याने शहरीकरण झाले असून स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आपला दिवा शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक घटकांनी आपलं योगदान दिलं पाहिजे. ह्यासाठी शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी सहायक आयुक्त यांची भेट घेऊन लेखी स्वच्छता राखण्यासाठी व्यापाऱ्यांना निर्देश देण्याची लेखी मागणी केली होती. त्यानुसार आज महापालिकेचे सहाय्यक आयुक्तांनी दिवा शहरातील दुकाने, हॉटेल, स्नॅक्स कॉर्नर यांना जाहीर आवाहन करत लेखी सूचना देण्यास सुरुवात केली आहे.
दिवावासियांना व पंचक्रोशीतील इतर गावांना दिवा शहर हे मुख्य बाजारपेठ ठरली आहे. खरेदीदार वाढल्याने इथे लहान- मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, हॉटेल, स्नॅक्स कॉर्नर, गोडाऊनस थाटली आहेत. दिवा शहरात स्वच्छतेचा प्रश्न फार गंभीर असून दिवा शहरातील बहुतेक लाहन- मोठया दुकानात कचरापेटी (डस्टबीन) ची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी ग्राहकांतर्फे फेकायचा कचरा व व्यापाऱ्यांकडून दुकानातील कचरा हा रस्त्यावर फेकला जातो. त्यामुळे अस्वच्छते मध्ये आणखी भर पडते.
दिवा शहरात स्वच्छतेचा विषय गंभीर असला तरी प्रशासनाबरोबरच शहरातील सर्वच घटकांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. लहान मोठे दुकानदार, व्यापारी, हॉटेल यांनी आपल्या दुकानात छोटीशी कचरापेटी ठेवली पाहिजे. दुकानात कचरापेटी नसल्याने ग्राहक कचरा बाहेर रस्त्यावर फेकतात या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे असे मत ऍड. आदेश भगत यांनी व्यक्त केले. याशिवाय महत्वाचे म्हणजे ज्या दुकानाबाहेर, हॉटेल बाहेर कचराकुंडी आहे अशा वेळी नागरिकांनी देखील कचरा उपलब्ध कचरापेटीत टाकून रस्त्यावर फेकणे बंद केले पाहिजे असे आवाहन ऍड. भगत यांनी नागरिकांना केले आहे.
नागरिकांची साथ लाभली तर आपण नक्कीच स्वच्छ दिवा सुंदर दिवा निर्माण करू शकतो असे मत व्यक्त करत ठाणे महानगर पालिकेने मागणी मान्य केल्याबद्दल नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी महापालिकेचे देखील आभार मानले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *