
शिवनेरी कबड्डी स्पर्धा २०२६
बीपीटीचा रिजनल स्पोर्ट्स बोर्डावर टायब्रेकरमध्ये सनसनाटी विजय
Slug १- गुड मॉर्निंग, शिवशक्ती, विवेक महिला संघाची विजयी आगेकूच
मुंबई – शिवनेरी सेवा मंडळाच्या ५८ व्या कबड्डी महोत्सवातील व्यावसायिक गटात बीपीटीने टायब्रेकमध्ये रिजनल स्पोर्ट्स बोर्डावर सनसनाटी विजय मिळवित स्पर्धेच्या उपांत्यफेरती धडक दिली. उपांत्य फेरीत बीपीटीचा मुकाबला वेस्टर्न रेल्वेशी होईल.
शिवनेरी सेवा मंडळ, दादर यांच्या वतीने भवानी माता क्रीडांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कबड्डी महोत्सवाचे यंदाचे हे ५८ वे वर्ष आहे. या महोत्सवाला निखिल लॉजिस्टिक्सचे संचालक सुरेशभाई कदम यांचे संपूर्ण प्रायोजकत्व लाभले आहे.
व्यावसायिक गटात बीपीटी आणि रिजनल स्पोर्ट्स बोर्ड यांच्यातील सामना ३८-३८ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या टायब्रेकरमधिल पाच-पाच चढायांमध्ये बीपीटीने ९-३ अशी बाजी मारत विजय मिळवला. बीपीटीकडून चढाईत जयेश महाजन आणि पकडीत आकाश अरसूल यांनी प्रभावी कामगिरी केली. रिजनल स्पोर्ट्स बोर्डकडून चढाईत सुनील दुबळे आणि पकडीत शंकर गदाई यांनी प्रयत्न केले.
व्यावसायिक गटाच्या उपउपांत्य फेरीत वेस्टर्न रेल्वेने सेंट्रल रेल्वे डिव्हिजनचा ४८-२२ असा २६ गुणांनी पराभव केला. वेस्टर्न रेल्वेकडून चढाईत प्रणय राणे आणि पकडीत नितीन कुंभार यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. सेंट्रल रेल्वे डिव्हिजनकडून चढाईत गणेश भोसले आणि पकडीत दिनेश कोळी यांनी प्रयत्न केले.
इतर उपांत्यपुर्व लढतीत मुंबई पोस्टलने सेंट्रल रेल्वेचा ३९-१२ असा २७ गुणांनी पराभव केला. मुंबई पोस्टलकडून चढाईत सौरभ पाटील आणि पकडीत ओंकार मोरे यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. सेंट्रल रेल्वेकडून चढाईत आशीष नरवाल आणि पकडीत अरकम शेख यांनी खेळ केला.
बीपीसीएलने बीएमसीवर ४५-३२ असा १३ गुणांनी विजय मिळवला. बीपीसीएलकडून चढाईत सौरभ राठोड आणि पकडीत हर्ष लाड यांनी प्रभावी कामगिरी केली. बीएमसीकडून चढाईत हर्ष जाधव आणि पकडीत अलंकार चव्हाण यांनी झुंज दिली.
कुमार गटाच्या उपांत्य फेरीत गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबने अंकुर स्पोर्ट्स क्लबचा ३८-२९ असा ९ गुणांनी पराभव केला. गुड मॉर्निंगकडून चढाईत निलेश मोरे आणि पकडीत आदित्य धुमाळ यांनी चांगला खेळ केला. अंकुर स्पोर्ट्स क्लबकडून चढाईत साई खेरूड आणि पकडीत आर्य दळवी यांनी लढत दिली.
महिला गटाच्या उपांत्य फेरीत शिवशक्ती महिला संघाने मुंबई पोलीस महिला संघाचा ३९-२९ असा १० गुणांनी पराभव केला. शिवशक्तीकडून चढाईत शुभदा खोत आणि पकडीत साधना विश्वकर्मा यांनी दमदार कामगिरी केली. मुंबई पोलीस महिला संघाकडून चढाईत तृप्ती लांडगे आणि पकडीत पूजा पाटील यांनी प्रतिकार केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात विवेक महिला संघाने शिरोडकर स्पोर्ट्स क्लबवर ३४-२४ असा १० गुणांनी विजय मिळवला. विवेककडून चढाईत हरजीत संधू आणि पकडीत स्विटी यांनी योगदान दिले. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबकडून चढाईत साक्षी सावंत आणि पकडीत क्षितिजा हिरवे यांनी संघर्ष केला.
संक्षिप्त धावफलक
बीपीटी (९) विजयी विरुद्ध रिजनल स्पोर्ट्स बोर्ड (३) — पाच-पाच चढायांमध्ये.
विजय क्लब ४९ विजयी विरुद्ध अमर सेवा मंडळ २२.
गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब ३८ विजयी विरुद्ध अंकुर स्पोर्ट्स क्लब २९.
शिवशक्ती महिला संघ ३९ विजयी विरुद्ध मुंबई पोलीस महिला संघ २९.
विवेक महिला संघ ३४ विजयी विरुद्ध शिरोडकर स्पोर्ट्स क्लब २४.
वेस्टर्न रेल्वे ४८ विजयी विरुद्ध सेंट्रल रेल्वे डिव्हिजन २२.
मुंबई पोस्टल ३९ विजयी विरुद्ध सेंट्रल रेल्वे १२.
बीपीसीएल ४५ विजयी विरुद्ध बीएमसी ३२.

शिवनेरी कबड्डी स्पर्धा २०२६
शिवनेरी कबड्डी महोत्सवात रिजनल स्पोर्ट्स बोर्डची दमदार कामगिरी
विवेक महिला संघाचाही मोठा विजय
अमर क्रीडा क्लब, विजय क्लब, वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि बीपीटीची प्रतिस्पर्ध्यांवर मात
मुंबई : शिवनेरी सेवा मंडळ, दादर यांच्या वतीने आयोजित शिवनेरी कबड्डी महोत्सवात कुमार, महिला आणि व्यावसायिक गटांतील सामन्यांमध्ये खेळाडूंनी दमदार चढाया आणि भक्कम पकडींच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. व्यावसायिक गटात रिजनल स्पोर्ट्स बोर्डने माटुंगा वर्कशॉपवर ४२-१० असा ३२ गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात रिजनल स्पोर्ट्स बोर्डच्या खेळाडूंनी माटुंगा वर्कशॉपच्या खेळाडूची केलेली पकड विशेष लक्षवेधी ठरली. या गटात वेस्टर्न रेल्वे आणि बीपीटी यांनीही प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
व्यावसायिक गटातील अन्य सामन्यांत वेस्टर्न रेल्वेने नेस्टजेन ॲकॅडमीचा ५३-३३ असा २० गुणांनी पराभव केला. वेस्टर्न रेल्वेकडून प्रणय राणे याने चढाईत, तर आकाश शर्मा याने पकडीत प्रभावी कामगिरी केली. नेस्टजेन ॲकॅडमीकडून निखिल पुजारी याने चढाईत आणि सुशांत वाघमोरे याने पकडीत योगदान दिले. सेंट्रल रेल्वेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर ३४-२० असा १४ गुणांनी विजय मिळवला. सेंट्रल रेल्वेकडून समीर भोगले याने चढाईत, तर राहुल परब याने पकडीत चमक दाखवली. रिझर्व्ह बँकेकडून सुमित मिसाळ आणि शंकर साळुखे यांनी अनुक्रमे चढाई आणि पकडीत प्रयत्न केले.
बीपीटीने मुंबई पोलिसांचा ४५-२० असा २५ गुणांनी पराभव केला. बीपीटीकडून अनुराग सिंग याने चढाईत, तर रूपेश साळुंखे याने पकडीत चांगली कामगिरी केली. मुंबई पोलिसांकडून विजय घाडगे याने चढाईत झुंज दिली.
कुमार गटात अमर क्रीडा मंडळाने श्रीराम क्रीडा मंडळावर ५३-३३ असा २० गुणांनी विजय मिळवला. अमरकडून साहिल बंगर याने चढाईत, तर सागर राजपूत याने पकडीत प्रभावी कामगिरी केली. श्रीरामकडून अमित सिंग याने चढाईत आणि हर्ष काळे याने पकडीत प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या सामन्यात विजय क्लबने नवोदित क्रीडा मंडळाचा ३७-२८ असा नऊ गुणांनी पराभव केला. विजय क्लबकडून श्रेयान पुजारी आणि विजेंद्र यादव यांनी अनुक्रमे चढाई व पकडीत योगदान दिले. नवोदितकडून तनीक्ष चव्हाण याने चढाईत, तर विघ्नेश गुरव याने पकडीत कामगिरी केली.
महिला गटात विवेक महिला संघाने जिजामाता महिला संघावर ४२-७ असा ३५ गुणांनी मोठा विजय मिळवला. विवेककडून हरजीत संधू हिने चढाईत, तर स्विटी हिने पकडीत चांगली कामगिरी केली. जिजामाता संघाकडून वेदिका सावंत हिने चढाईत आणि कृतिका चव्हाण हिने पकडीत प्रयत्न केले. अन्य सामन्यात डॉ. शिरोडकर संघाने स्वामी समर्थ महिला संघावर ४५-२५ असा २० गुणांनी विजय मिळवला. डॉ. शिरोडकर संघाकडून साक्षी सावंत हिने चढाईत, तर श्रावणी घाडीगावकर हिने पकडीत प्रभावी कामगिरी केली. स्वामी समर्थ संघाकडून साक्षी जंगम हिने चढाईत आणि सई शिंदे हिने पकडीत योगदान दिले.
शिवनेरी कबड्डी महोत्सवातील या सामन्यांमध्ये चढाईतील चपळाई, प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी केलेल्या अचूक पकडी आणि संघांच्या एकजुटीमुळे कबड्डीप्रेमींना रंगतदार खेळाचा अनुभव मिळाला.
संक्षिप्त धावफलक
अमर क्रीडा मंडळ (५३) विजयी विरुद्ध श्रीराम क्रीडा विश्वस्त (३३)
विजय क्लब (३७) विजयी विरुद्ध नवोदित संघ (२८)
विवेक महिला संघ (४२) विजयी विरुद्ध जिजामाता संघ (०७)
शिरोडकर स्पोर्ट्स क्लब (४५) विजयी विरुद्ध स्वामी समर्थ (२५)
वेस्टर्न रेल्वे (५३) विजयी विरुद्ध नेक्जीन अकादमी (३३)
सेन्ट्रल रेल्वे (३४) विजयी विरुद्ध रिजर्व बँक ऑफ इंडिया (२०)
रिजनल स्पोर्ट्स बोर्ड (४२) विजयी विरुद्ध माटुंगा वर्क शॉप (१०)
बीपीटी (४५) विजयी विरुद्ध मुंबई पोलीस (२०)

शिवनेरी कबड्डी स्पर्धा २०२६
अमर हिंदच्या विजयात सेजलची चमक
जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच
मुंबई : शिवनेरी सेवा मंडळाच्या कबड्डी महोत्सवात महिला गटात सेजल कांबळेच्या आक्रमक चढायांच्या चमकदार खेळाच्या जोरावर अमर हिंद मंडळाने भारतमाता महिला संघाचा ४५-३० असा १५ गुणांनी पराभव केला. सेजल कांबळेने चढाईत, तर सलोनी नाक्तीने पकडीत प्रभावी कामगिरी करत अमर हिंदच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतमाता महिला संघाकडून पायल कांचनने चढाईत, तर दृष्टी कुंभारने पकडीत चांगला खेळ केला. मात्र, अमर हिंदने सामन्यावर वर्चस्व राखत विजय मिळवला.
कुमार गटात जय भारत सेवा मंडळाने आकांक्षा क्रीडा मंडळाचा ३६-२४ असा १२ गुणांनी पराभव केला. जय भारतकडून आर्यन बावडेकरने चढाईत, तर तन्मय बावकरने पकडीत प्रभावी कामगिरी केली. आकांक्षाकडून ओमकार पवार आणि स्वप्निल पाटील यांनी अनुक्रमे चढाई व पकडीत योगदान दिले. याच गटात यश क्रीडा मंडळाने पंचगंगा सेवा मंडळावर ३५-३१ अशी चार गुणांनी मात केली. यशकडून केतन चौघुलेने चढाईत, तर विवेक पवारने पकडीत चांगला खेळ केला. पंचगंगाकडून शिवांश मगर आणि सक्षम सूर्यवंशी यांनी प्रतिकार केला.
महिला गटातील दुसऱ्या सामन्यात विश्वशांती क्रीडा मंडळाने गोल्फादेवी प्रतिष्ठानचा ३२-२५ असा सात गुणांनी पराभव केला. विश्वशांतीकडून रोझी डिसोझाने चढाईत, तर शितल मेरांडेने पकडीत कामगिरी केली. गोल्फादेवी प्रतिष्ठानकडून रचना म्हात्रेने चढाईत, तर जागृती घोसाळकरने पकडीत योगदान दिले.
व्यावसायिक गटात बेस्ट संघाने टीबीएमवर ३६-३१ अशी पाच गुणांनी मात केली. बेस्टकडून सुरेश पाटीलने चढाईत, तर राहुल परबने पकडीत कामगिरी केली. टीबीएमकडून पारस शिर्के आणि विकास जोगले यांनी अनुक्रमे चढाई व पकडीत प्रयत्न केले. दुसऱ्या सामन्यात पी. डी. हिंदुजा संघाने आरबीएससीचा ४५-३७ असा आठ गुणांनी पराभव केला. हिंदुजाकडून जतिन विंदेने चढाईत, तर संतोष वारकरीने पकडीत प्रभावी खेळ केला. आरबीएससीकडून सोहम मोरे आणि लौकिक कदम यांनी योगदान दिले.
व्यावसायिक गटातील आणखी एका सामन्यात मुंबई पोस्टलने माझगाव डॉकचा २५-१० असा १५ गुणांनी पराभव केला. मुंबई पोस्टलकडून अभिषेक भोजनेने चढाईत, तर ओमकार मोरेने पकडीत चांगली कामगिरी केली. माझगाव डॉककडून भावेश भोईरने चढाईत प्रयत्न केले. या सर्व सामन्यांमुळे शिवनेरी कबड्डी महोत्सवातील कुमार, महिला आणि व्यावसायिक गटांतील स्पर्धेची रंगत वाढली.
संक्षिप्त धावफलक –
व्यावसायिक गट
बिईएसटी (३६) विजयी विरुद्ध टीबीएम (३१)
पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल (४५) विजयी विरुद्ध आरसीएफ (३७)
मुंबई पोस्टल (२५) विजयी विरुद्ध माझगाव डॉक (१०)
महिला गट
विश्वशांती क्रीडा मंडळ (३२) विजयी विरुद्ध गोल्फादेवी प्रतिष्ठान (२५)
अमर हिंद मंडळ (४५) विजयी विरुद्ध आकांक्षा स्पोर्ट्स क्लब (३०)
कुमार गट
यश क्रीडा मंडळ (३५) विजयी विरुद्ध पंचगंगा सेवा मंडळ (३१)
जय भारत सेवा मंडळ (३६) विजयी विरुद्ध आकांक्षा स्पोर्ट्स क्लब (२४)
फोटोओळ
शिवनेरी कबड्डी महोत्सवात भारतमाता क्रिडा मंडळाच्या महिला खेळाडूंनी अमरहिंद मंडळाच्या खेळाडुची केलेली पकड आजच्या दिवसातील एक उत्कृष्ट पकड ठरली.

शिवनेरी कबड्डी स्पर्धा
रुपाली ज्वेलर्स, मुंबई पोलीसांचे व्यावसायिक गटात दणकेबाज विजय
मुंबई : दिवसातील सर्वोत्तम पकडींचा नजराना पेश करणाऱ्या रुपाली ज्वेलर्सच्या खेळाडूंनी शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित शिवनेरी कबड्डी महोत्सवात व्यावसायिक गटात रिजनल बोर्डाचा खेळ पहिल्या फेरीतच खल्लास केला. रूपाली ज्वेलर्ससह मुंबई पोलिसांनीही व्यावसायिक गटात दणकेबाज विजयाची नोंद केली.
महिला गटात मुंबई पोलीस महिला संघ आणि विवेक महिला संघाने, तर कुमार गटात अंकुर क्रीडा मंडळ व यश क्रीडा मंडळाने विजय मिळवला. व्यावसायिक गटात बीएमसी संघाने न्यू इंडिया इन्शुरन्स संघावर मात केली.
महिला गटात मुंबई पोलीस महिला संघाने चंद्रोदय क्रीडा मंडळाचा ४२-१३ असा २९ गुणांनी पराभव केला. मुंबई पोलीस महिला संघाकडून चढाईत तृप्ती लांडगे, तर पकडीत साक्षी भोईर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. चंद्रोदय क्रीडा मंडळाकडून तीर्था कोलगे हिने चढाईत चांगला खेळ केला. दुसऱ्या सामन्यात विवेक महिला संघाने शताब्दी स्पोर्ट्स क्लबचा ५०-१७ असा ३३ गुणांनी धुव्वा उडवला. विवेक महिला संघाकडून चढाईत संजना पोळ, तर पकडीत हरजीत कौर यांनी प्रभावी खेळ केला. शताब्दी स्पोर्ट्स क्लबकडून चढाईत नंदिनी मौया आणि पकडीत अनघा गायकवाड यांनी प्रयत्न केले.
कुमार गटात यश क्रीडा मंडळाने पंचगंगा सेवा मंडळावर ३५-३१ अशी चार गुणांनी मात केली. यश क्रीडा मंडळाकडून चढाईत नवनाथ चौघुले, तर पकडीत विवेक पवार यांनी चमक दाखवली. पंचगंगा सेवा मंडळाकडून चढाईत सोमनाथ यादव आणि पकडीत सक्षम सूर्यवंशी यांनी चांगली कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात अंकुर क्रीडा मंडळाने बंड्या मारुती सेवा मंडळाचा ५२-२५ असा २७ गुणांनी पराभव करत दमदार विजय नोंदवला.
व्यावसायिक गटात बीएमसी संघाने न्यू इंडिया इन्शुरन्स संघाला ३५-२५ असे पराभूत करत दहा गुणांनी विजय मिळवला. बीएमसीकडून चढाईत हर्ष जाधव, तर पकडीत कृष्णा पवार यांनी उत्कृष्ट खेळ केला. न्यू इंडिया इन्शुरन्सकडून चढाईत जयेश यादव, तर पकडीत यश बागल यांनी चांगली कामगिरी केली.
दरम्यान, शिवनेरी कबड्डी महोत्सवात कुमार गटातील दुसऱ्या फेरीचे सामने सुरू झाले असून, महिला आणि व्यावसायिक गटातील पहिल्या फेरीचे सामने रंगत आहेत.
संक्षिप्त धावफलक :
मुंबई पोलीस महिला संघ (४२) विजयी विरुद्ध चंद्रोदय क्रीडा मंडळ (१३)
विवेक महिला संघ (५०) विजयी विरुद्ध शताब्दी स्पोर्ट्स क्लब (१७)
यश क्रीडा मंडळ (३५) विजयी विरुद्ध पंचगंगा सेवा मंडळ (३१)
अंकुर स्पोर्ट्स क्लब (५२) विजयी विरुद्ध बंड्या माऊली सेवा मंडळ (२५)
बीएमसी (३५) विजयी विरुद्ध न्यू इंडिया इंशूरंस (२५)
PHOTO CAPTION
शिवनेरी कबड्डी स्पर्धेतील व्यावसायिक गटात रूपाली ज्वेलर्सच्या खेळाडूंनी रिजनल बोर्ड संघाच्या चढाईपटूची यशस्वीरीत्या केलेली पकड आजच्या दिवसाची सर्वोत्तम पकड ठरली.
