ठाणेः ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या दोन महत्वाच्या नेत्यांमधील वाद ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहेत. कपिल पाटील यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीत उतरले आहेत. तर त्यांच्यासमोर आमदार किसन कथोरे यांचे सहकार पॅनल असणार आहेत. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप विरूद्घ भाजप असाच सामना रंगत असल्याचे चित्र आहे.
सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची संस्था समजल्या जाणाऱ्या दि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालवधीसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिकृत सुरूवात झाली आहे. २७ जून २०२६ रोजी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर २८ जून रोजी मतमोजणी होईल.
बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी वेगवेगळ्या मतदारसंघांनुसार प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत नुकतीच संपली. सध्या अर्ज मागे घेण्याची मुदत सुरू आहे. या दरम्यान राजकीय खेळी करत अनेक अर्ज मागे घेतले गेले असून काही पदांसाठी अवघे एकच अर्ज आल्याने जवळपास १० ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे.
मात्र बिनविरोध निवडणुकीच्या निमित्ताने ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अनोखे राजकारण पाहायला मिळते आहे. २१ पैकी १० ठिकाणी बिनविरोध सदस्य निवडून आल्यानंतर आता या निवडून आलेल्या सदस्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू असून त्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील भाजपातील पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भाजपचे आमदार किसन कथोरे हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कपिल पाटील यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.
त्यांनी या पॅनलला महायुतीचे पॅनल म्हणून घोषीत केले आहे. तर दुसरीकडे आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचे सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. आतापर्यंत दहा पैकी ८ जागांवर सहकार पॅनलचे सदस्य निवडून आल्याचा दावा केला जातो आहे. तर दोन ठिकाणी परिवर्तन पॅनलचे सदस्य निवडून आल्याचा दावा केला गेला आहे.
त्यामुळे २१ सदस्यांच्या या बॅंकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलले आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मात्र या निमित्ताने भाजपातील दोन नेत्यांचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या निवडणुकीतही किसन कथोरे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या सोबतीने कपिल पाटील यांच्या आघाडीला धक्का दिला होता. यंदा त्यांना शिवसेनेची साथ मिळणार आहे.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कथोरे आणि पाटील संघर्ष पाहायला मिळाला होता. लोकसभेत पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. त्यात कथोरेंचा हात होता असा उघड दावा अनेकदा पाटील यांनी केला होता. त्यानंतर या दोघांतील वाद वाढला आहे. आता विधानसभेनंतर जिल्हा निवडणुकीत पाटील आणि कथोरे एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुणाची सरशी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *