कल्याण : कल्याण जवळील मोहने येथील प्रसिध्द रील स्टार प्रेम भाटी (३०) यांचा शनिवारी मध्यरात्री मोहने येथील आपल्या घरी दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर पडलेल्या खडीवर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या सर्व प्रकरणाला मोहने भागात रस्ते काम करणारे पालिका प्रशासन, संबंधित कामाचा ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप करत स्थानिकांनी या अपघात प्रकरणी जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी रिक्षा युनियनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केली आहे.
प्रेम भाटी मृत्युप्रकरणी प्रशासनाने ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर रिक्षा संघटनेचे सर्व सदस्य आपल्या रिक्षा बंद ठेऊन रस्त्यावर आंदोलन करतील. यावेळी प्रवाशांची गैरसोय झाली तर त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिला आहे. रील स्टार प्रेम भाटी आपल्या कुटुंबीयांसह मोहने येथे राहतो. समाज माध्यमातील सध्याचा प्रभावशील व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे विविध प्रकारचे समाज माध्यमातील रील चर्चेचा विषय आहे. या रील्समुळे समाज माध्यमांत त्यांचे लाखो चाहते आहेत.
मोहने भागात रस्त्याची कामे ठेकेदाराकडून सुरू आहेत. या कामासाठी रस्त्याच्या कडेला खडीचे ढीग करण्यात आले आहेत. ही कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांच्या वर्दळीमुळे, भटकी कुत्री या खडीवर येऊन दिवसभर उड्या मारतात. आणि पादचाऱ्यांच्या येण्या जाण्याने खडी रस्त्यावर पसरली आहे.
ही रस्त्यावर पसरलेली खडी पादचारी, वाहन चालक, दुचाकी स्वार, रिक्षा चालक यांना घातक ठरत आहेत. दररोज या भागात खडीवर घसरून अनेक दुचाकी स्वार पडतात. ही खडी दूर करावी किंवा या भागातील रस्ते काम लवकर पूर्ण करावे म्हणून स्थानिकांनी ठेकेदार, प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. पण त्याची दखल घेतली जात नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
रील स्टार प्रेम भाटी शनिवारी मध्यरात्री मुंबई, ठाणे परिसरातील आपले कामे आटोपून दुचाकीवरून मोहने येथील आपल्या घरी परतत येत होता. मोहने येथे रस्ते काम सुरू असलेल्या ठिकाणी त्याची दुचाकी खडीवरून घसरली. दुचाकी वेगात असल्याने प्रेम भाटीला दुचाकीवर नियंत्रण आणता आले नाही. खडीवरून दुचाकीवरून घसरताच दुचाकी दुचाकीच्या वेगामुळे ती रस्त्यावर घसरत ४० फूट पुढे गेली.
