खाद्यपदार्थांच्या आड लपवून मद्याची आलिशान वाहनातून तस्करीSlug – उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
 ३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
योगेश चांदेकर
पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट मद्याची वाहतूक करणारी वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे ३४ लाख ८४ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आलिशान वाहनांतून खाद्यपदार्थांच्या आडून अवैध मद्याची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज पालघर जिल्ह्यातील जव्हार खानवेल रोड, विशाल ढाब्याच्या समोर, जव्हार तसेच जव्हार-खंबाळे रोडवर, रातुना फाटया जवळ, रातुना वडवली जव्हार येथे सापळा रचून ही कारवाई केली. गुजरातमधील जवळगाव येथून जव्हारच्या दिशेने येणाऱ्या एका  आलिशान वाहनांतून बनावट मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन  विभागाला मिळाली होती.  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू येथील पथकाने तसेच पालघरच्या भरारी पथकाने या वाहनांची तपासणी केली.
दमणसाठी असलेले मद्य पालघरमध्ये
तपासणीत ट्रकमध्ये विदेशी मद्याचे ४५४ बॉक्स आढळून आले. या मद्यावर ‘फक्त दमण येथे विक्रीसाठी’ असा उल्लेख असूनही महाराष्ट्रात त्याची अवैध वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. कारवाईदरम्यान मॅक्स पिकअप (जीजे-०३/बीझेड-८७८३) आणि फोर्ड कंपनीची इंडेव्हर कार (एमएच-४३/एक्स-१८८९) ही वाहनेही जप्त करण्यात आली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विदेशी मद्याचे ४५४ बॉक्स, मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले पिकअप वाहन आणि इंडेव्हर कार यांचा समावेश असून, एकूण जप्तीची किंमत ३४ लाख ८४ हजार ४० रुपये इतकी आहे. त्यात विदेशी मद्याची किंमत सुमारे १५ लाख रुपये आहे.
‘यां’च्या मार्गदर्शनाखाली कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे उपायुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघरचे अधीक्षक गणेश बारगजे, उपअधीक्षक अविनाश रणपिसे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत डहाणू येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक राजेश शिंदे, डहाणू बीटचे दुय्यम निरीक्षक विश्वजीत आभाळे, विकास आबनावे, अभिजीत मानकर, दुय्यम निरीक्षक टी. व्ही सावेकर, अमोल नलावडे, संदीप अहिरे, ओमकार शेजवळ, दीपक शेवाळे, प्रतिक गांगुर्डे, शशिकांत पाटील आदींनी ही कारवाई केली. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *