मिरा -भाईंदर
मीरा रोड येथील शांतीनगर परिसरात फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घर खरेदीसाठी लाखो रुपये भरूनही फ्लॅटचा ताबा न देता तेच फ्लॅट इतर ग्राहकांना विकल्याप्रकरणी मे. श्रीनाथ इंटरप्रायजेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे भागीदार नरेश सुंदरलाल जैन आणि किसनसिंह तुलसीसिंह राजपूत यांच्याविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्लेझंट पार्क परिसरात राहणाऱ्या सुमनबेन विकास यादव (३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी पारसनाथ गार्डन येथील इमारत क्रमांक ४ मधील दोन फ्लॅट एकूण ३७ लाख ९३ हजार ४०० रुपये किमतीला बुक केले होते. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी धनादेश व रोख स्वरूपात मिळून १३ लाख ९७ हजार रुपये विकासकांकडे जमा केले होते. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फ्लॅटचा ताबा देण्याऐवजी विकासकांनी तेच दोन्ही फ्लॅट इतर व्यक्तींना नोंदणीकृत कराराद्वारे विकले.
संबंधित विकासकांनी केवळ एका कुटुंबालाच नव्हे, तर परिसरातील अनेक नागरिकांची अशाच प्रकारे फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, भावेश विजय पटेल, पूनम कनोजिया, सर्वेश यादव, गंगाप्रसाद यादव, नीरज कुमार, चंदन रामचंद्र यादव, उमाशंकर राधेश्याम यादव, चंद्रशेखर यादव, समयलाल यादव, हरिशंकर यादव, बबलू विश्वकर्मा, विमल कुमार यादव आणि अभिषेक यादव यांच्याकडूनही लाखो रुपये स्वीकारून त्यांच्या नावावर बुक केलेले फ्लॅट इतरांना विकण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणामुळे मिरा-भाईंदर परिसरातील घर खरेदीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणूक, विश्वासघात, धमकी आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संविधान चौरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *