बॉडी मसाज सुरू असताना पर्समधील दागिना लंपास; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
कल्याण : डोंबिवली पूर्व येथील एका स्पा सेंटरमध्ये बॉडी मसाजसाठी गेलेल्या महिलेचे ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक ५० वर्षीय महिला ४ जुलैला दुपारी ३.१५ ते ५.०० वाजण्याच्या दरम्यान डोंबिवली पूर्वेतील टिळक रोडवरील स्पार्कल सलून अँड स्पा येथे बॉडी मसाजसाठी गेल्या होत्या. मसाज सुरू करण्यापूर्वी त्यांनी गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र काढून ते पर्समध्ये ठेवले आणि पर्स भिंतीलगत असलेल्या हुकला अडकवली. मसाज संपल्यानंतर पर्स तपासली असता त्यामधील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मंगळसूत्र न सापडल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५ (अ) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप करीत आहेत. स्पा सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
00000000
