डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा अजब कारभार
कल्याण : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या हॉस्पिटलमध्ये चाललय तरी काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. दोन वर्षांच्या वेदांश राठोड या चिमुकल्याला त्वचेचा त्रास असल्याने त्याचे वडील जगदीश राठोड उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन आले होते. डॉक्टरांनी तपासणीनंतर वेदांशसाठी तब्बल १२ औषधे लिहून दिली आणि ती रुग्णालयातील मेडिकलमधून घेण्यास सांगितले. मात्र, मेडिकलमध्ये एकही औषध उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व औषधे बाहेरून खरेदी करण्यास सांगण्यात आल्याने रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना आवश्यक औषधेच उपलब्ध नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी उपचारासाठी कुठे जावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराबाबत वेदांशचे वडील जगदीश राठोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, महापालिका प्रशासनाने रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.
