कल्याण: टिटवाळा येथील के.एन.टी. पब्लिक स्कूलतर्फे शालेय साहित्य खरेदी सक्ती केल्या प्रकरणी पालकांचे केडीएमसी शिक्षण विभागाविरोधात शुक्रवारी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. के.एन.टी. पब्लिक स्कूल, टिटवाळा येथील पीडित व त्रस्त पालकांनी शाळेकडून करण्यात येत असलेल्या कथित सक्तीच्या गणवेश विक्री, शैक्षणिक साहित्याबाबतच्या तक्रारी आणि इतर मुद्द्यांसंदर्भात २५ जूनला प्रशासन अधिकारी तथा शिक्षणाधिकारी भारत बोरनारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित कागदपत्रे व उपलब्ध पुरावे सादर केले होते.
पालकांच्या म्हणण्यानुसार, त्या बैठकीत संबंधित प्रकार गंभीर असल्याचे निदर्शनास आले असून, पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल तसेच आवश्यक असल्यास संबंधित प्रस्ताव मा. शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. तसेच काही पालकांना संबंधित गणवेश विक्रेत्याकडे गणवेश परत जमा करण्याबाबत आणि शैक्षणिक साहित्याबाबत पुढील सूचनांची प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतरही कोणताही लेखी निर्णय, बैठक किंवा पालकांना दिलासा देणारी ठोस कार्यवाही न झाल्याने पालकांनी २ जुलैला  स्मरणपत्रही सादर केले. मात्र आजपर्यंत कोणताही अंतिम निर्णय अथवा स्पष्ट आदेश प्राप्त झालेला नसल्याचा पालकांचा दावा आहे.
यामुळे अनेक पालकांनी गणवेश विक्रेत्याकडे परत जमा केले असले तरी त्यांना अद्याप पैसे परत मिळालेले नाहीत. तसेच शैक्षणिक साहित्याबाबतही निर्णय प्रलंबित असल्याने पालक आणि विद्यार्थी संभ्रमाच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून तातडीने निर्णय व्हावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे आणि पालकांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी शुक्रवारी १७ जुलै रोजी शिक्षण मंडळ कार्यालय येथे शांततापूर्ण, लोकशाही व संविधानिक मार्गाने निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *