मिरा –भाईंदर : पावसाळा ओसरत असताना मुंबईसह मिरा -भाईंदर आणि वसई-विरार परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच टायफॉइड, हिपॅटायटिस-ए आणि गॅस्ट्रोएन्टेरायटिससारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अपेक्स हॉस्पिटल्स समूहाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आणि सुरुवातीची लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
मुसळधार पावसानंतर अनेक भागांमध्ये साचलेले पाणी डासांच्या उत्पत्तीस पोषक ठरत आहे. त्याचबरोबर दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे जलजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता वाढली आहे. ताप, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या, पोटदुखी, जुलाब, त्वचेवर पुरळ, अशक्तपणा अशी लक्षणे दुर्लक्षित करू नयेत.
अपेक्स हॉस्पिटल्स समूहाचे डॉ. करण ठक्कर, कन्सल्टंट फिजिशियन, म्हणाले, “पावसाळ्यानंतरचा काळ संसर्गजन्य आजारांसाठी अत्यंत संवेदनशील असतो. अनेक रुग्ण डेंग्यू किंवा मलेरियाची सुरुवातीची लक्षणे साधा व्हायरल ताप समजून उपचार उशिरा घेतात. वेळेत तपासणी, पुरेसे द्रवपदार्थ आणि योग्य उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते. घर आणि परिसरातील साचलेले पाणी हटवणे, स्वच्छता राखणे, शुद्ध पाणी पिणे आणि डासांपासून संरक्षण करणे हीच सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे.”
तज्ज्ञांनी नागरिकांना फक्त उकळलेले किंवा शुद्ध पाणी पिण्याचा, उघड्यावरचे अस्वच्छ अन्न टाळण्याचा, हात स्वच्छ धुण्याचा, पाण्याच्या टाक्या झाकून ठेवण्याचा, पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करण्याचा आणि डासप्रतिबंधकांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. आठवड्यातून किमान एकदा घर व परिसरातील साचलेल्या पाण्याची तपासणी करून ते हटवणे अत्यंत आवश्यक आहे.
