महोत्सवातून झालेले निधीसंकलन ‘सीपीएए’ आणि ‘पीएटीयुटी’च्या समाज कार्यासाठी
मुंबई : दिवंगत पद्मभूषण पंकज उधास यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘खजाना – अ फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. २४ आणि २५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलच्या रीगल रूममध्ये हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवातून उभारला जाणारा निधी कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए) आणि पॅरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयुटी) यांच्या समाजोपयोगी कार्यासाठी देण्यात येणार आहे.
दोन दिवसांच्या या महोत्सवात अनूप जलोटा, हरिहरन, विशाल भारद्वाज व रेखा भारद्वाज, सोनू निगम, जावेद अली, सुदीप बॅनर्जी, मधुबंती बागची, सुनील मुंगी, अलेना भारती आणि तेजस गंभीर हे कलाकार सहभागी होणार आहेत. निहिरा जोशी विशेष अतिथी कलाकार म्हणून उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनूप सोनी आणि रक्षंदा खान करणार आहेत. यंदाच्या महोत्सवात आशा भोसले तसेच गेल्या २५ वर्षांत ‘खजाना’ समृद्ध करणाऱ्या दिग्गज गायकांना विशेष आदरांजली वाहण्यात येणार आहे.
गेल्या २५ वर्षांत ‘खजाना’ हा केवळ संगीत महोत्सव न राहता कर्करोग आणि थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी निधी उभारणारा महत्त्वाचा सामाजिक उपक्रम ठरला आहे. यंदाच्या कार्यक्रमात ‘खजाना गझल टॅलेंट हंट २०२६’च्या विजेत्यांचाही गौरव करण्यात येणार असून, महोत्सवातून मिळणारा संपूर्ण निधी गरजू रुग्णांच्या उपचार, देखभाल आणि पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार आहे.
००००००००
