सासवड येथे चहा, बिस्कीट व पाण्याचे मोफत वाटप
दिवा :“जीवनातला एक दिवस चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करावी” हा भाव मनात ठेवून दिव्यातील भराडी देवी सेवा मंडळाने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रम राबविला. मंडळाच्या चौथ्या वर्ष उपक्रमा निमित्त पुणे जिल्ह्यातील सासवड येथे वारकऱ्यांना मोफत चहा, बिस्कीट आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.
या सेवा उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांना अल्पोपहाराचे वाटप करून त्यांच्या सेवेत सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याची भावना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच सर्व वारकऱ्यांना सुखरूप व आनंददायी वारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
मंडळाचे संस्थापक रुपेश काशिराम दुखंडे, अध्यक्ष कृष्णा चौगुले, सचिव अरविंद घोगळे आणि खजिनदार देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. तसेच अमोल दळवी, संभाजी कणसे, ओमकार चव्हाण यांच्यासह मंडळाचे सहकारी सहभागी झाले होते. समाजसेवा आणि वारकरी परंपरेप्रती असलेली श्रद्धा जपत भराडी देवी सेवा मंडळ, दिवा भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
