विरार : महावितरणच्या विरार विभागामार्फत नालासोपारा (पूर्व) व आचोळे शहर परिसरातील वीज ग्राहकांसाठी १६ जुलैपासून सलग ३ दिवस स्मार्ट मीटर जनजागृती मेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे. हा मेळावा महावितरणच्या नालासोपारा पूर्व उपविभागीय कार्यालयात सकाळी ११ वाजता सुरू होईल.
या मेळाव्यात वीज बिल, स्मार्ट मीटर, मीटर रीडिंग, जास्त वीज बिल, स्मार्ट मीटरवरील वीज वापराची माहिती, विविध ऑनलाइन सेवा, वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारी तसेच इतर शंकांचे प्रत्यक्ष निराकरण करण्यात येणार आहे. या मेळाव्यात महावितरणचे अधिकारी, बिलिंग विभागाचे कर्मचारी तसेच स्मार्ट मीटर विषयक तज्ज्ञ उपस्थित राहून ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करतील. तसेच स्मार्ट मीटरबाबत असलेले गैरसमज दूर करून त्याची कार्यपद्धती, वीज वापराची माहिती, बिल तयार होण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध डिजिटल सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ग्राहकांनी मेळाव्यास उपस्थित राहताना अद्ययावत वीज बिल, ग्राहक क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक तसेच आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. नालासोपारा पूर्व, आचोळे शहर व परिसरातील सर्व वीज ग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घेऊन आपल्या वीज बिल, स्मार्ट मीटर व वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे प्रत्यक्ष निराकरण करून घ्यावे, असे आवाहन महावितरणच्या विरार विभागातर्फे करण्यात आले आहे.
0000000
000000000
0000
