अटक करण्याच्या मागणीसाठी शिवसेना मैदानात
मुंबई, दि.(प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर बलात्कार, फसवणूकीसारखे गंभीर आरोप असूनही त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही म्हणून त्याच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मैदानात उतरली आहे. सुरज प्रतापसिंग देवडा याच्यावर बलात्कार, फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे असूनही आरोपीस एक महिना उलटून गेला तरी अटक करण्यात आलेली नाही. या आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक १ तर्फे शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागसंघटक शुभदा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दहिसर पोलीस ठाणे येथे मोर्चा काढून जाब विचारण्यात आला.
हा गुन्हेगार भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असल्याने दहिसर पोलीस ठाण्यावर वरिष्ठ राजकारण्यांचा दबाव आहे काय? असा संशय यावेळी महिला विभाग संघटक शुभदा शिंदे यांनी व्यक्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दहिसर पोलीस ठाणे यांनी ह्या संदर्भात त्वरित कार्यवाही करून आरोपीस अटक करावी याकरता शिवसेना महिला आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रवीण कुवळेकर, बापुसाहेब गेजगे, कुंदा भरणे, दीपा चुरी, उषा कोरगावकर, रोशनी गायकवाड, वर्षा चोरगे, शैला गंगावणे, संजना वेंगुर्लेकर, स्वाती बोरकर, स्नेहा कोटकर, दिपाली अवारी, छाया आमरुळे, हेमा मयेकर नंदा वंजारे, फॉरम परमार, युगा राऊत,धनश्री चव्हाण तसेच आदि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
०००००
